Wednesday, July 24, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यकोकण रमलंय शेतीत...!

कोकण रमलंय शेतीत…!

माझे कोकण: संतोष वायंगणकर

महाराष्ट्रात पावसाळा सुरू झाला तरीही काही भागांमध्ये फारसा बदल घडत नाही; परंतु आपल्या कोकणात मात्र अंतरंग आणि कोकणचे बाह्यरूप पूर्णपणे बदललेले असते. मे अखेरीस किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साधारणत: मृग नक्षत्राला म्हणजे मालवणी मुलखात त्याला मिरग म्हणतात. हा मिरग सुका गेला की पाऊस कोसळला यावर मग कोकणातील गावा-घरात, वाडी-वस्तीवर हा मिरग साजरा होतो. मृग नक्षत्राच्या दिवशी कोकणात संततधार कोसळणारा पाऊस आणि वातावरणातील गारवा कोकणात मग आताच्या भाषेत चिकन-वडे यावर ताव मारूनच साजरा होत असतो.

आर्थिक स्थिती कशीही असली तरीही सण साजरा करण्यात जो उपजत उत्साहीपणा असतो तो संपूर्ण कोकणात असतोच. त्याला सणवार असेल तर तो उत्साहाने साजरा करण्यात कोकणवासीयांचा हात धरणारा मराठी मुलखात दुसरा कोणी नाही असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. तर अखंड कोकणात पूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात भात पेरणी आणि शेतीच्या कामांना सुरुवात असायची. इतर दिवसांमध्ये गजालींमध्ये असणारा कोकणवासीय शेतात शेत नांगरण्यात, पेरणी करण्यात दंग असायचा. अगदी दीड-दोन महिने कोकणातील शेतकरी शेतीच्या कामातच असायचे; परंतु पूर्वी मोठी एकत्र कुटुंब शेतात राबणारे वीस-पंचवीस हात तेवढीच चार-पाच औत त्यामुळे शेती करण्याचाही तो खऱ्या अर्थाने मोठा उत्सवच असायचा. पावसाची रिपरिप सुरूच असायची. या अशा थंड वातावरणात शेतकऱ्याला त्याच्या घरातून आलेली गरम-गरम पिठलं-भाकरी आणि गोलमा-भाकरी बांधावर बसून खाण्यात पंचतारांकित हॉटेलच्या डिशला लाजवणारी ही डिश होती. पूर्वी हा गोलमा म्हणजे ‘जवला’ शेतकरीच शेती कामात भाकरीसोबत खायचे.

अलीकडे गेल्या पाच-दहा वर्षांत हाच जवला नॉनव्हेज डिशमध्ये मानाने मिरवत असत आणि बड्या श्रीमंतानाही या जवळ्याच्या डिशच भारी अप्रुप असते. या शेती हंगामाच्या कामात पूर्वीही फार काही जेवणाचे नखरे नसायचे. याचं कारण जेवण बनवायचे शेतात, काम करायचे ही खरं तर तारेवरची कसरत कोकणातील जवळपास प्रत्येक घरातील महिलांना करावी लागत असे. भात(तरवा) लावणी आटोपली की सर्वांना चिखलधुणीची एक कमालीची उत्सुकता असायची. कारण चिखलधुणीला तेच मृग नक्षत्रासारखे तिखट जेवण असायचे. आजही ते असतेच, त्यात आनंद घेणारे अनेकजण आहेत. विशेषत: भातशेतीत होणारा खर्च आणि मिळणारे भात याचा पूर्वी ताळमेळच बसत नसायचा; परंतु वर्षभर कुटुंबाला लागणारे तांदूळ मिळतात याचा आनंद त्या कुटुंबाला असायचा. मधल्या काळात गावातून मोठ्या प्रमाणावर लोक स्थलांतरीत झाली आणि भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही मर्यादित झाली. पारंपरिक भात बियाण्यांचा वापर करून शेती व्हायची. त्यातही भरडी शेती तर अनेक शेतकऱ्यांनी सोडलीच आणि याच भरडांवर मग काजू बागायतीची लागवड होऊ लागली. फलोद्यान क्षेत्र गेल्या पंचवीस वर्षांत अधिक वाढले.

भातशेतीचे मळे गावो-गावी ओस पडलेले दिसू लागले; परंतु कोरोना काळात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक भागात नोकरी-व्यवसायात असणारे मोठ्या संख्येने कोकणवासीय गावाकडे आले. ते शेतीत रमले. चार वर्षांत भातशेतीचे क्षेत्र दरवर्षी वाढत आहेत. आधुनिक, पारंपरिक, संकरीत अशी सर्व प्रकारची शेती सध्या कोकणात होते. भातशेतीचे क्षेत्र फार मोठ्या प्रमाणाम वाढत आहे. काही भागातील भातशेती पडीक असल्याचे जरी दिसून येत असली तरीही कोकणात भातशेतीचे क्षेत्र दरवर्षी वाढत आहे. भात बियाण्यांची जी कृषी विक्री करणाऱ्या दुकानातून होणाऱ्या भात विक्रीतूनही लक्षात येऊ शकते. आज बहुतांशी भातशेती करणारा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसतो.

पारंपरिक भात बियाण्यांची पेरणी न करता बाजारात ७०-८० रुपये किलो दराने मिळणारा बारीक तांदूळ भात पेरणी केली जाते. काल-परवाच आधुनिक तंत्राचा आणि यंत्राचा वापर करून शेती करणारा शेतकरी भेटला की, मी त्या शेतकऱ्याला सहज म्हणून अहो, शेतीचा गणित काय जुळता ना! त्यावर तो शेतकरी मला म्हणाला, ह्या बघा शेतीचा गणित खूप काय जमता आणि जुळता अशातलो भाग नाय! पण जो वाडा कोलंब तांदूळ ६०-७० रुपयांत बाजारातून घेण्यापेक्षा आम्ही आमच्या कष्टान पिकवलेला भात म्हणजे तांदूळ ३० रुपये किलोन पडता. याच काय ता समाधान, हे सर्व सांगत असताना त्या शेतकऱ्याच्या बोलण्यातून जाणवलं ते पूर्वी भातशेतीत राबणारी माणसं आपल्याच कुटुंबातील असायची; परंतु आज रोजंदारीवर काम करणारी माणसं कामाला बोलवावी लागतात. त्यांची मजुरी, त्यांचं जेवण, खाणं हा सगळा जरी खर्च फार परवडणारा नसला तरीही या भातशेतीत गवत घेणारे शेतकरीही आता तयार आहेत. त्या गवताच्या बदल्यात भातशेतीची कापणी करून द्यायला तयार असतात. अशा काही नवीन गोष्टी या नव्या शेती तंत्रामध्ये येत आहेत.

कोकणातील तरुण शेतात काम करत नाही असेही नाही. तो शेतातही राबतो आहे. भातशेती, बागायतीतून नवनवीन प्रयोग करणारा इथला तरुण आहे तो आता बऱ्यापैकी शेतीत दिसतो. कृषी क्षेत्राविषयीची सकारात्मकता आता समाजमनामध्ये रुजत आहे. ती सकारात्मकता प्रत्यक्षात फळा फुलायला काही कालावधी निश्चित जाईल; परंतु हा सारा होणारा बदल शाश्वत असा आहे. या बदलाने कोकणातील शेतीत जरी बैलांची जोत दिसली नाहीत. ट्रॅक्टरची धड-धड वाढली तरीही पूर्वीसारखीच किंबहुना त्यापेक्षा थोडी अधिक भरडधान्याची चटणी-भाकरी आनंदाने खाणारी समाधानी माणसं शेताच्या बांधावर दिसू लागतील. त्याची निश्चितच सुरुवात झाली आहे. कोकणवासीय सध्या शेतीत बऱ्यापैकी रमलाय.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -