
आरोग्य यंत्रणेचा अलर्ट
कोल्हापूर : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार (Maharashtra Rain) पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस कोसळत असला तरीही वातावरणातील उष्णता कमी झाली नाही. या बदलत्या वातावरणाचा फटका नागरिकांच्या आरोग्याला बसला आहे. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया अशा अनेक आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. अशातच सध्या डेंग्यूने (Dengue) राज्यभरात थैमान घातले आहे.
पुणे, नाशिक, नागपूर, अमरावतीनंतर आता कोल्हापूरमध्येही डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सातत्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून (Health Department) सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूरात ३०० हून अधिक रुग्ण
कोल्हापूर जिल्ह्यातील हणमंतवाडी गावात डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. एकाच गावात तब्बल ३००हून अधिक ग्रामस्थांना डेंग्यूची लागण झाली आहे. प्रत्येक घरात २ ते ३ ग्रामस्थांना डेंग्यूची लागणी झाली आहे. हणमंतवाडी परिसरातील अनेक खाजगी रुग्णालयामध्ये ग्रामस्थांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान उपचारासाठी ग्रामस्थांची रुग्णालयात गर्दी झाली आहे. परंतु याबाबत जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
अमरावतीत पाच दिवसात ६ रुग्ण
अमरावतीच्या अनेक भागात पाऊस बरसत आहे. पावसाळ्यामुळे अनेक भागांत पाणी साचून त्यातून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत आहे. अमरावतीमध्ये पाच दिवसात सहा डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत. अमरावतीमध्ये २१ जून रोजी डेंग्यूच्या २ रुग्णाची नोंद करण्यात आली. तर २५ जून रोजी डेंग्यूच्या ४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नारिकांमध्ये खळबळ उडाली असून आरोग्य विभाग देखील सतर्क झाला आहे. आरोग्य विभागाने जिल्ह्यात सर्वेक्षणाला सुरवात केली आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहेत. तसेच नागरिकांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
'अशी' घ्या काळजी
वारंवार ताप येणे, थंडी भरून येणे, डोके दुखणे, हाडांचे दुखणे, उलट्या होणे, अंगदुखी, अशक्तपणा, तोंडाला कोरड पडणे, त्वचेवर लाल व्रण उठणे, ही डेंग्यूच्या आजाराची लक्षणे आहेत. ही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरीच डॉक्टरशी संपर्क साधावा, तसेच खिडक्यांना जाळ्या बसवून घरात किंवा कार्यस्थळी डासांच्या शिरकावास प्रतिबंध करावा. आपल्याला डास चावणार नाहीत यासाठी सर्वतोपरी बंदोबस्त करावा, आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.