माणूस आणि बाहेरचे जग यांत एक सीमारेषा असते. जो आवडतो तो या सीमेतून आपल्या आतल्या जगात येतो, आपण त्याला आत घेतो; पण अज्ञ माणूस या सीमारेषेला देखील शास्त्र व गुरू यांच्या नावाचा वारा लागू देत नाही. त्या अडाण्याची ही पराकोटीची नावड! त्यांच्या अचूक दाखल्यांतून ज्ञानदेव ‘अज्ञ दृष्टीपासून आपण लांब कसे राहायचं’ हे सुचवित असतात.
ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
आपलं शरीर हे नाशवंत तर आत्मा अमर आहे’ हे गीतेत सांगितलेलं तत्त्व! पण अज्ञानी माणूस देहालाच आत्मा समजतो. तिथूनच साऱ्या दुःखांचा आरंभ होतो. यातून माणसाला बाहेर काढण्यासाठी, त्याचं खरं स्वरूप आपलं संतसाहित्य सांगतं. यातील ‘ज्ञानेश्वरी’चा विचार आपण सध्या करतो आहोत. यातील अठराव्या अध्यायात अशा अज्ञानी माणसांविषयी बोलताना माऊली किती नेमके दाखले देतात!
‘जोपर्यंत कावीळ झालेली आहे, तोपर्यंत चंद्राचा रंग पिवळा दिसतो. अरे, मृगांनी मृगजलाला भुलू नये? (तर मग कोणी भुलावे?) ओवी क्र. ३८९
त्याप्रमाणे शास्त्र आणि गुरू यांची नावे उच्चारल्याबरोबर तो त्यांचा वाराही आपल्या शिवेस लागू देत नाही. कारण तो मूर्खपणाच्या जोरावर वाचलेला असतो.’ ओवी क्र. ३९०
या ओव्या अशा –
‘जंव कवळ आथि डोळां।
तंव चंद्र देखावा कीं पिंवळा।
काय मृगींही मृगजळा। भाळावें नाही?॥ (३८९)
तैसा शास्त्रगुरूचेनि नांवे। जो वाराही टेंकों नेदी शिवे।
केवळ मौढ्याचेनिचि जीवें। जियाला जो॥’ (३९०)
‘कवळ’ या शब्दाचा अर्थ ‘कावीळ’ असा आहे, तर ‘मौढ्य’चा अर्थ मूर्खपणा आहे. कावीळ हा आजार होतो, तेव्हा सारं जग पिवळं दिसू लागतं. जगाचे मूळ रंग अशावेळी कळत नाहीत. त्याप्रमाणे अज्ञान हा जणू आजार आहे. अशा माणसाला आत्म्याचं खरं स्वरूप कळत नाही, तो शरीरालाच आत्मा समजून चालतो. इथे ज्ञानदेवांची अज्ञानी माणसाकडे पाहण्याची नितळ दृष्टी दिसते. कावीळ हा शरीराला होणारा रोग तर अज्ञान हा मनाचा रोग. अशा दृष्टीने ते पाहतात. म्हणून पुढच्या दृष्टांतात म्हणतात, ‘मृगांनी मृगजळाला भुलू नये’, म्हणजे अशा अज्ञ माणसांनी देहाला भुलून जावं यात आश्चर्य ते काय?
पुढील दाखल्यात ते या अडाणीपणाची तीव्रता दाखवतात. असा अज्ञ माणूस शास्त्र आणि गुरू यांच्यापासून शेकडो योजने दूर असतो. हा दूरपणा दाखवणारा दाखला आणि शब्दयोजना तर पाहावी अशी! ‘शास्त्र आणि गुरू यांच्या नावाचा वाराही आपल्या शिवेस लागू देत नाही.’ आपल्याला एखाद्या माणसाचं दुसऱ्यापासून लांब जाणं सांगायचं असेल, तर आपण काय म्हणतो? ‘अमूक तमूकच्या वाऱ्याला सुद्धा उभा राहत नाही.’ ज्ञानदेव इथे त्याची परिसीमा योजतात. प्रत्यक्ष गुरू आणि शास्त्र तर लांबची गोष्ट! त्यांच्या नावाचा वारादेखील नको असतो, या अडाण्यांना! तोही कुठे? तर त्यांच्या सीमेला.
माणूस आणि बाहेरचं जग यांत एक सीमारेषा असते. जो आवडतो तो या सीमेतून आपल्या आतल्या जगात येतो, आपण त्याला आत घेतो. पण अज्ञ माणूस या सीमारेषेला देखील शास्त्र व गुरू यांच्या नावाचा वारा लागू देत नाही. त्या अडाण्याची ही पराकोटीची नावड ! ज्ञानदेव अशा वर्णनातून ती आपल्यापर्यंत पोहोचवतात. त्यातून अज्ञानी माणसाचं चित्र ठसठशीत होतं. सर्व श्रोत्यांना सहजतेने उमगतं. आधी डोळ्यांपुढे, मग मनात मूर्त होतं.
अशा अचूक दाखल्यांतून ज्ञानदेव आपल्याला सावध करीत आहेत. ते सांगत आहेत, सुचवत आहेत की, ‘अशा अज्ञ दृष्टीपासून आपल्याला लांब राहायचं आहे.’ ‘दाखल्यांची ही सृष्टी उघडी आपली दृष्टी’