Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे शहरात तीन महिन्यांमध्ये ६९ बारचे परवाने रद्द

पुणे शहरात तीन महिन्यांमध्ये ६९ बारचे परवाने रद्द

उत्पादन शुल्क विभागाकडून १८८ ठिकाणी कारवाई

पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्विड, लिजर, लाऊंज (एल ३) बारमधील अमली पदार्थ सेवन आणि अवैध मद्य विक्रीच्या प्रकरणाचा व्हीडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बारवर छापा टाकला आणि यात सहा जणांना अटक करण्यात आल्यानंतर आता विभागाने (एल ३) बारचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, विभागाकडून दि. १ एप्रिलपासून आतापर्यंत १८८ ठिकाणी कारवाया करण्यात आल्या असून, शहरातील ६९ बारचे परवाने तत्काळ रद्द करून बार सीलबंद करण्यात आले आहेत.

एल ३ बारमध्ये रात्री दीड नंतर अवैध पार्टी झाली. त्यात पब चालविणाऱ्यांनी बेकायदेशीरपणे केलेला मद्याचा साठा, अमली पदार्थांचे सेवन, अल्पवयीन मुलांचा सहभाग या सर्व गोष्टी समोर आल्या. समाज माध्यमावर एल थ्री बारमधील पार्टी आणि प्रसाधनगृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस यंत्रणांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आणि पुणे पोलिसांनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानेही एल ३ पबवर कारवाईचा बडगा उगारला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानेही रविवारी सायंकाळी एल थ्री बारमध्ये छापा टाकून सव्वातीन लाख रुपयांचा बेकायदा मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने सहा कर्मचाऱ्यांना (वेटर) अटक केली.

फर्ग्युसन रस्त्यावरील इमारतीतील तळमजला आणि पहिल्या मजल्यावर संतोष कामठे यांच्या नावाने हाॅटेल रेनबोला मद्य विक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. सध्या रेनबो हॉटेलचे नाव बदलण्यात आले असून, एल थ्री बार नावाने तेथे व्यवसाय सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी छुपा मार्ग काढून मंजूर नकाशात बदल करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाहणी केली. तेव्हा परवाना कक्षात गंभीर स्वरूपाचे फेरबदल करण्यात आले आहे. परवाना कक्षात अंतर्गत बदल करण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने परवाना तत्काळ रद्द करून बार सीलबंद करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -