सत्ताकारणात सामान्य माणूस कुठे?

Share

मेधा इनामदार

लोक राज्यकर्त्यांबद्दल उदासीन झालेत. कुणीही सत्तेत येवो, सामान्य माणसाकडे कुणाचेही लक्ष नाही. आपण नुसतेच ‘राजे’ नाही, तर हवे तसे बदल घडवून आणू शकतो, हे मात्र लोकांना कळायला लागले आहे; पण ही बाब आपल्या राजकारण्यांच्या नीट लक्षात आलेली नाही. पण लक्षात ठेवा, मतदार जागा झालाय. सामान्य माणूस समजदार झालाय. यापुढे तो दिलेल्या आश्वासनांचा आणि केलेल्या कामांचा हिशेब मागणार आहे.

लोकसभेच्या निवडणुकांचे सूप वाजले. सत्तेची माळ एनडीएच्या गळ्यात पडली. आता अगदी लवकरच विधानसभांच्या निवडणुका जाहीर होतील. महाराष्ट्राच्या दृष्टीने लोकसभेच्या निकालाकडे विधानसभेची ब्ल्यू प्रिंट म्हणूनच पाहिले जात होते. एकूण निकाल पाहून सगळेच पक्ष जागे झाले आहेत. टिकून राहायचे असेल, तर आपल्याला बदलायला हवे, हे त्यांना कळून चुकलेय. इतकी वर्षे राजकारण केवळ आश्वासनांपुरते असायचे. निवडणुकीपूर्वी मतदार ‘राजा’ असायचा. त्याला अजूनही बरेच काही मिळालेले नाही, याची जाणीव उमेदवारांना व्हायची आणि मग ‘हे देऊ… ते देऊ…’ असे सांगून गेलेल्या ‘त्या’ उमेदवारावर विश्वास ठेवून मतदार निवडून द्यायचा. मग तो उमेदवार दिलेली आश्वासने विसरून जायचा. त्याला स्वत:चेही काही तरी बघायचे असायचे ना आणि शेवटी लोकांना सगळेच दिले, तर मग पुढच्या वेळी कशाच्या जोरावर मते मागायची, हा प्रश्नही असायचाच. त्यामुळे एकदा आश्वासने देऊन गेलेला उमेदवार पुन्हा पुढच्या पाच वर्षांनीच दृष्टीला पडायचा. तोवर आपल्याला नक्की काय हवे होते, हे लोक विसरून गेलेले असत.

अर्थात तरीही अगदीच काहीच होत नव्हतं असं मात्र नाही. खरे तर सामान्य माणसाच्या अपेक्षा अगदी मर्यादित असतात. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि सुरक्षित आणि सुखाने जगणे एवढेच सामान्य माणसाला हवे असते. देश स्वतंत्र होऊन ७७ वर्षं झाली आणि तेव्हापासून लहान -मोठ्या प्रत्येक गावातून नगरसेवक, आमदार, खासदार अशी वरपर्यंत पोहोचलेल्या आणि लोकांनीच निवडून दिलेल्या नेत्यांची साखळी आहे; पण तरीही इतक्या वर्षांनंतरही ‘स्त्रियांना संरक्षण, प्रत्येक हाताला काम, प्यायला शुद्ध पाणी, विनाशुल्क शिक्षण, स्वयंपाकासाठी गॅस, गरिबांना राहायला घरे, इतकेच नव्हे तर, प्रत्येक घराला शौचालयासारख्या प्राथमिक गरजाही पूर्ण झाल्या नाहीत आणि आजही हीच आश्वासनं देऊन, नेते पुन्हा पुन्हा मतदार‘राजा’ला भेटायला जातात. आधी त्यांचे आजोबा जात असत. मतदारसंघ तोच. आश्वासने तीच. फक्त देणारे आणि घेणारे यांच्या पिढ्या बदलल्या. मग या ७७ वर्षांमध्ये या नेत्यांनी आपल्या गावासाठी नक्की काय केले? गेली अनेक वर्षे पाणी, घर, शिक्षण, रस्ते या मूळ गरजा पुरवण्याची आश्वासने देऊन, हे नेते निवडून येत आहेत. मात्र प्रत्यक्षात आजही कोणत्याही लहान गावातच नव्हे, तर मध्यम किंवा जिल्ह्याच्या गावात गेले तर गावापर्यंत जाणारा धूळ उडवणारा कच्चा रस्ता, सुकत चाललेल्या नद्या, खोल गेलेल्या विहिरी, उघडी गटारे, रिकाम्या शाळा आणि पोट खपाटीला गेलेली अशक्त जनावरे. स्वातंत्र्यपूर्व काळात दिसणाऱ्या या चित्रात आजही फारसा फरक पडलेला नाही.

एक मात्र झाले. या काळात खेड्यातला मतदार शहरात आला. शेतीचे पडत चाललेले तुकडे त्यात कष्टाच्या मानाने हाती फार काही लागत नाही, हे कळले तशी शहरे फुगू लागली आणि खेडी ओस पडू लागली. शहरातल्या सुशिक्षित मतदाराला आता बरेच काही कळायला लागले. आपल्याला नक्की काय हवे आहे आणि ते मिळतेय की नाही आणि कोण देऊ शकेल याबद्दल लोकही जागरूक झाले. त्यातूनच आपल्यावर ‘राज्य’ करणाऱ्याला बदलू शकतो, हे लोकांच्या लक्षात आलं. खरे सांगायचे तर स्वार्थकेंद्रित झालेल्या या राज्यकर्त्यांना तळागाळात राहणाऱ्या गोरगरीब माणसांना आणि शिकून नोकरी करून मोजक्या उत्पन्नात जगणाऱ्या सामान्यांना नक्की काय हवेय, हे माहीतच नाहीये. किंबहुना माहीत असूनही त्यांना त्याच्याकडे लक्ष द्यायची इच्छाच नाही. त्यामुळेच ते अजूनही झोपलेलेच आहेत. किंबहुना सामान्य लोकांचं लक्ष त्यांच्या गरजांपासून विचलित करून, नको त्या गोष्टीकडे वळवत राहण्याचा सर्वच राजकारण्यांचा प्रयत्न दिसतो. गेल्या काही वर्षांमध्ये एकूणच राजकारणाला एक गलिच्छ रूप आले आहे. त्यातच या सगळ्यांवर मीडियाचा प्रचंड प्रभाव आहे. प्रत्येक पक्षाने स्वत:च्या प्रसारासाठी, प्रचारासाठी आणि जाहिरातीसाठी एक किंवा अधिक चॅनेल्समध्ये पैसा गुंतवला आहे, हेदेखील अगदी उघड गुपित आहे.

राजकारणाचं गुन्हेगारीकरण, अत्यंत खालच्या भाषेमध्ये आरोप-प्रत्यारोप, सत्तेसाठी होणारे पक्षबदल हे जे काही चालू आहे, त्यात देश आणि देशातला सामान्य माणूस नक्की आहे तरी कुठे? प्रत्येक क्षणाला ‘महाराष्ट्रातल्या जनतेच्या’ नावाखाली स्वत:चे मत मांडणाऱ्या या राजकीय पक्षांना त्याचा विचार करायची खरोखर इच्छा आहे का आणि खरोखरीच सामान्य माणसाला याबद्दल काय वाटते याची जाणीव या नेत्यांना आहे का? आजही पाऊस पडला किंवा नाही पडला तरी सामान्य माणसांचे हाल होतात. आजही आपण दिलेल्या कराचा योग्य उपयोग होत नाही, याची खंत प्रत्येक करदात्याच्या मनात आहे. ‘हा देश कुणीच चालवत नाही. तो आपोआप चालतो,’ कारण खरोखरीच राज्यकर्ते आणि जनता एकमेकांना समांतर चालतात. जाती-धर्माच्या भेदभावांनी राज्यकर्त्यांनी देश पोखरून टाकला आहे. तसे पाहिले तर नव्या पिढीतली मुले आडनाव वापरतच नाहीत; फक्त नाव सांगतात. त्यांना या जातींच्या राजकारणामध्ये खरोखरीच रस नाही; पण राजकारण अजूनही तिथेच आहे. शिवाय जातीच्या नावावर प्रत्येक गोष्ट विनाकष्ट आणि फुकट मिळवण्याची सवय पुढील काळात घातक ठरणार आहे.

राजकारणाचे गुन्हेगारीकारण इतक्या प्रचंड प्रमाणात झाले आहे की, स्वच्छ चारित्र्याचा आणि देशासाठी निष्ठेने काम करणारा उमेदवार शोधावा लागतो. खरे तर, देशाच्या हिताच्या गोष्टींसाठी सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन योग्य निर्णय घ्यायला मदत करायला हवी. पण आम्ही विरोधी पक्षात बसतो म्हणून आम्ही विरोध करणार, असा विडाच जणू हे पक्ष स्वीकारतात आणि कोणतेही काम होऊ न देण्यात धन्यता मानतात. संसदेच्या अधिवेशनात काम होऊ द्यायचे नाही, फक्त गोंधळ करायचा, आरडाओरडा करायचा, जमलेच तर धक्काबुक्की करायची; निदानपक्षी सभात्याग करायचा. बहिष्कार घालायचा! एकूण काय, तर काम होऊ द्यायचं नाही. लोकप्रतिनिधींच्या पगाराचा किंवा पेन्शन वाढवायचा ठराव असला की, हेच सगळे अगदी एकमताने अनुमोदन देतात. ते गेली ७७ वर्षे सगळे सहनही करत आहेत. ते कर भरत आहेत. टोल भरत आहेत. देशाप्रति असलेले कर्तव्य मनापासून बजावत आहेत. आपल्या मुलांना योग्य प्रकारचे, जीवनात उपयोगी पडेल असे शिक्षण मिळेल असे स्वप्न पाहत आहेत. मला सहज कर्ज मिळेल, सरकारदरबारी लायसन्स आणि इतर परवानग्या मिळण्यासाठी असंख्य हेलपाटे घालावे लागणार नाहीत, अशी त्यांची इच्छा आहे.

लोकांना हवे आहे भ्रष्टाचारमुक्त आणि सुखी सुरक्षित जीवन. जे आणि जेवढे कष्ट करू, त्याचे योग्य फळ देणारे आणि कसलीही भीती नसलेले जगणे त्यांना हवे आहे. म्हणूनच लोक आजच्या राज्यकर्त्यांबद्दल उदासीन झालेत. कुणीही सत्तेत येवो, पक्ष कोणताही असो, सगळेच एकमेकांना मिळालेले आहेत. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. सामान्य माणसाकडे कुणाचेही लक्ष नाही राज्यकर्ते आपल्यासाठी काही करतील, असे आज कुणालाही वाटत नाही. आपल्याला काय हवे आहे, ते त्यांना समजायला लागले आहे. नक्की कोण काय करतेय, हेदेखील लोकांना कळायला लागलेय. आपण नुसतेच ‘राजे’ नाही, तर हवे तसे बदलही घडवून आणू शकतो, हे लोकांना कळायला लागले आहे. पण ही बाब आपल्या राजकारण्यांच्या नीट लक्षात आलेली नाही. अजूनही ते पुरेसे जागे झालेले नाहीत. लोकांना नक्की काय हवे आहे आणि ते देण्यासाठी ते आपल्याला निवडून देत आहेत, ही गोष्ट अजूनही बऱ्याच जणांच्या लक्षात आलेली नाही; पण लक्षात ठेवा, मतदार जागा झालाय. सामान्य माणूस समजदार झालाय. आता समज वाढायला हवी ती ‘त्यांची.’

Recent Posts

Ravindra Jadeja : रोहित-विराटनंतर रविंद्र जडेजानेही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती!

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे (ITC T20 World cup) विजेतेपद पटकावल्याने देशवासीयांमध्ये आनंदाची…

9 hours ago

Lonavla news: भुशी डॅममागील धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले!

पर्यटनासाठी आले आणि... पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र,…

10 hours ago

Belapur News : बेलापूर गावात भाजपाचा विकास कामाचा पाहणी दौरा!

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनामार्फत बेलापूर गावात होत असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा भाजपाच्या आमदार…

10 hours ago

New Rules : सामान्यांच्या खिशावर परिणाम होणार; जुलैपासून नियमावली बदलणार!

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच…

10 hours ago

Sujata Saunik : इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी महिला विराजमान!

सुजाता सौनिक यांची झाली नियुक्ती मुंबई : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary…

11 hours ago

Pune news : अंगणवाडीच्या पोषण आहारात सापडल्या अळ्या आणि उंदराच्या लेंड्या!

पुण्यात धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचे (Pune crime) प्रमाण चिंताजनक झाले असतानाच…

12 hours ago