बच्चू कडू करणार नेतृत्व; काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
ठाणे : कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत असलेल्या अनेक समस्या तसेच भरती प्रक्रिया अशा अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या (Maharashtra Gram Panchayat Employee Union) वतीने विधानभवनावर (Vidhanbhavan) आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील २७ हजार ९२० ग्रामपंचायती मधील ६० हजार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शुक्रवार, २८ जून रोजी हा मोर्चा काढणार असल्याची माहिती कर्मचारी युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय भोईर यांनी भिवंडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. कर्मचारी युनियनचे प्रदेशाध्यक्ष आमदार बच्चू कडू या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.
काय आहेत कर्मचारी संघटनेच्या मागण्या?
- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करावी.
- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करावे.
- किमान वेतनाच्या अनुदानाची १९ महिन्यांची थकीत रक्कम तात्काळ मिळावी.
- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत असलेली वसुलीची अट रद्द करावी. ग्रामपंचायत
- कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करावी.
- ग्रामपंचायत कर्मचारी दहा टक्के आरक्षणानुसार भरती करत असताना दरवर्षीच्या रिक्त पदावर अनुकंपाचे धरतीवर करावी.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने करण्यात आलेल्या विविध मागण्या या अद्याप प्रलंबित आहेत. युनियनच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी केलेल्या आंदोलन प्रसंगी शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे या आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे असं संघटनेचं म्हणणं आहे. यानंतरही आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आंदोलन अधिक उग्र करीत मुंबई येथे आमरण उपोषण सुरू करून राज्यातील ग्रामपंचायती कर्मचारी बेमुदत संप पुकारतील असा इशारा दत्तात्रय भोईर यांनी दिला आहे.