
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) खेड तालुक्यातील कशेडी बोगद्यातून (Kashedi tunnel) वाहतुकीसाठी परवानगी दिल्यानंतर पहिल्याच पावसाळ्यात त्यामध्ये पाण्याच्या धारा लागल्याने धोकादायक बनला आहे. बोगद्यात पाच ते सह ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंगरातून पाझर लागला असून त्याकडे तातडीने लक्ष न दिल्यास मोठा अनर्थ ओढवू शकतो.
कशेडी बोगद्यातून लहान वाहनांनी प्रति तास ३० किलोमीटर मर्यादा घालण्यात आली आहे. परंतु काही ठिकाणी धबधब्यासारखे पाणी छतातून कोसळत असल्याने प्रवाशांच्या उरात त्यामुळे धडकी भरत असून वेगाने बोगदा पार करण्यासाठी वाहनचालक वेगाची मर्यादा पाळताना दिसत नाहीत.
बोगद्यातून वाहतूक सुरू झाल्यानंतर हा पहिलाच पावसाळा आहे. त्यातच आता कशेडी भोगद्यात पाण्याचे फवारे उडत असल्याने भितीचेही वातावरण आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तांत्रिक सल्लागार धर्माधिकारी व आय. आय. टी. मुंबई येथील तज्ज्ञांनी बोगद्याच्या पाहणी केली असून त्यांनीही तूर्तास कोणताही धोका नसल्याचे सांगितले आहे.