भीषण दुर्घटनेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू
मुंबई : गेल्या काही दिवसांत अपघात व दुर्घटनांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईच्या वांद्रे पश्चिम परिसरातून आणखी एक धक्कादायक दुर्घटना समोर आली आहे. एका मालवाहू ट्रकवर बांधलेल्या लोखंडी सामानाची दोरी सुटली आणि त्यातील लोखंड रस्त्याच्या कडेने फुटपाथवर चाललेल्या एका पादचाऱ्याच्या डोक्यात पडलं. यामध्ये पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विजय असराणी (वय ४०) असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित ट्रक हा रविवारी रात्री लोखंडी साहित्य घेऊन मुंबई कोस्टल रोडच्या कामासाठी निघाला होता. हा ट्रक वांद्रे येथील टर्नर रोड (Turner Road) परिसरात आला तेव्हा झाडाच्या एका खाली आलेल्या फांदीला वाहन घासले गेले. त्यामुळे ट्रकवर बांधलेली दोरी अचानक तुटली. यावेळी विजय असराणी हे शेजारच्या फुटपाथवरुन चालत होते. ट्रकची दोरी तुटल्यानंतर त्यामधील लोखंडी साहित्य आणि लोखंडाचे भाग सुटे झाले. यापैकी एक लोखंडी भाग रस्त्यावरुन चालत असलेल्या विजय असराणी यांच्या अंगावर पडला.
विजय असराणी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आजुबाजूच्या लोकांनी विजय असराणी यांना तातडीने भाभा रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी या अपघातप्रकरणात ट्रक चालक आलम अन्सारी याला अटक केली आहे.