मुंबई: बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी १५ सदस्यी भारतीय संघाची घोषणा सोमवारी करण्यात आली आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना ६ जुलैला हरारेमध्ये खेळवला जाईल.
रियान पराग, अभिषेक शर्मा, नितीश कुमार आणि तुषार देशपांडे यांना पहिल्यांदा संघात संधी दिली जात आहे. या खेळाडूंना बीसीसीआयने आयपीएल २०२४मध्ये शानदार कामगिरीचे बक्षीस दिले आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या स्क्वॉडमध्ये वेगवान गोलंदाज मुकेश कुमार सगळ्यात वयस्कर खेळाडू आहे. यशस्वी जायसवाल, ऋतुराज गायकवाड, रिंकु सिंह, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई आणि कर्णधार शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल या स्क्वॉडमध्ये अनुभवी खेळाडूंना सामील करण्यात आले आहे. जुरेलने वर्षाच्या सुरूवातीला कसोटीत पदार्पण केले होते.
भारत वि झिम्बाब्वे टी-२० वेळापत्रक
भारतीय संघाचा झिम्बाब्वे दौरा ६ जुलैपासून सुरू होत आहे. या दिवशी दोन्ही संघ हरारेमध्ये पहिल्या टी-२०मध्ये आमनेसामने असतील. दुसरा टी-२० सामना ७ जुलैला हरारेमध्ये असेल. तिसरा टी२० सामना १० जुलैला, चौथा १३ जुलैला तर पाचवा आणि शेवटचा टी-२० सामना १४ जुलैला खेळवला जाणार आहे.