Friday, June 28, 2024
HomeदेशPM Narendra Modi : २०४७ पर्यंत विकसित भारताचं ध्येय समोर ठेवून १८...

PM Narendra Modi : २०४७ पर्यंत विकसित भारताचं ध्येय समोर ठेवून १८ व्या लोकसभेची सुरुवात!

पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं ‘१८’ या अंकाचं भारताच्या परंपरेतलं महत्त्व

नवी दिल्ली : नवे सरकार स्थापन झाल्यानंतर १८ व्या लोकसभेच्या (18th Loksabha) पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. नवे सरकार बनल्यानंतर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नवनिर्वाचित खासदार आज शपथ घेणार आहेत. या अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माध्यमांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी संसदीय लोकशाहीसाठी आजचा दिवस गौरवशाली असल्याचं म्हटलं. आजचा दिवस वैभवाचा आहे. स्वातंत्र्यानंतर आपण स्वत: बांधलेल्या नव्या संसदेत खासदारांचा शपथविधी सोहळा करत आहोत. आतापर्यंत ही प्रक्रिया जुन्या संसद भवनात होत होती, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, आजच्या महत्त्वाच्या दिवशी नवनिर्वाचित खासदारांचं मनापासून स्वागत करत आहोत. संसदेची ही निर्मिती भारताच्या सामान्य माणसांच्या संकल्पांच्या पूर्ततेसाठी करण्यात आली आहे. नवा उत्साह, नव्या गतीसह नवी उंची प्राप्त करण्याची ही संधी आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताच्या निर्मितीचं ध्येय समोर ठेवत १८ व्या लोकसभेची सुरुवात होत आहे. जगातील सर्वात मोठी निवडणूक शानदार, गौरवशाली पद्धतीने पार पडली. भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. ६५ कोटी मतदारांनी मतदानात भाग घेतला, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.

स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा एखाद्या सरकारला सलग तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी जनतेने दिली आहे. हे ६० वर्षांनंतर घडलं आहे, ही मोठी गोष्ट आहे. देशातील जनतेने एखाद्या सरकारला तिसऱ्यांदा निवडलं आहे. म्हणजे जनतेने त्या सरकारच्या धोरणांना मान्यता दिली आहे, असं मोदी म्हणाले. सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक असतं, मात्र देश चालवण्यासाठी सहमतीची गरज असते, असं नरेंद्र मोदी म्हणाले. आमचा नेहमी प्रयत्न राहील की प्रत्येकाची सहमती घेत, सर्वांना सोबत घेत भारताची सेवा करावी.

१८ वी लोकसभा भारताच्या अमृतकाळात होतेय हा शुभसंकेत

आम्हाला सर्वांना सोबत घेऊन पुढं जायचं आहे. संविधानाच्या मर्यादांचं पालन करुन निर्णयांना गती द्यायची आहे. १८ व्या लोकसभेत युवा खासदारांची संख्या अधिक आहे. १८ क्रमांकाला भारताच्या परंपरेत महत्त्व आहे. आपल्याकडे १८ अंकाला सात्विक मूल्य आहे. गीतेचे अध्याय १८ आहेत. कर्म, कर्तव्य आणि करुणेचा संदेश तिथून मिळतो. आपल्याकडे पुराणं आणि उपपुराणांची संख्या १८ आहे. १८ चा मूलांक ९ आहे. ९ पूर्णतेचं प्रतीक आहे. १८ व्या वर्षी आपल्याकडे मताधिकार मिळतो. १८ वी लोकसभा भारताच्या अमृतकाळात होतेय हा शुभसंकेत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

संविधान आणि लोकशाहीचं संरक्षण करणार

देशात आणीबाणी लावली गेली होती त्याची ५० वर्षे होत आहेत. देशाला तुरुंग बनवण्यात आलं होतं. लोकशाहीला दाबवण्यात आलं होतं. आम्ही संविधानाचं संरक्षण करत, लोकशाहीचं संरक्षण करत पुन्हा असा प्रयत्न होणार नाही याचा संकल्प करत आहोत, असं मोदी म्हणाले.

देशाला चांगल्या विरोधी पक्षाची अपेक्षा

जनहित, लोकसेवेसाठी या संधीचा वापर करा, असं खासदारांना आवाहन करतो, असं मोदी म्हणाले. देशातील जनता विरोधी पक्षांकडून चांगल्या कामाची अपेक्षा ठेवत आहे. विरोधी पक्ष देशातील सामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करेल. लोकशाहीची प्रतिष्ठा कायम ठेवण्याची अपेक्षा जनता ठेवते, ती ते पूर्ण करतील, असं मोदी म्हणाले. लोकांना हे अपेक्षित नाही नखरे होत राहतील, नाटकं होती, लोकांना घोषणा नको आहेत. देशाला चांगल्या विरोधी पक्षाची, जबाबदार विरोधी पक्षाची अपेक्षा आहे. १८ व्या लोकसभेत विजयी होऊन आलेले खासदार सामान्य नागरिकांची स्वप्न पूर्ण करतील, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -