Wednesday, April 23, 2025
Homeब्रेकिंग न्यूजVersova surya project : वर्सोवा जेसीबी दुर्घटनेतील मृत चालकाच्या कुटुंबाला ५० लाखांची...

Versova surya project : वर्सोवा जेसीबी दुर्घटनेतील मृत चालकाच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत सुपूर्त

भावालाही दिली नोकरी; मात्र मृतदेह बाहेर काढण्यात २५ दिवसांनंतरही यश नाही

ठाणे : अनेकदा दुर्घटना घडल्यानंतर पीडितांच्या कुटुंबियांस सरकारी मदत जाहीर केली जाते मात्र ती पोहोचली की नाही याबाबत शाश्वती मिळत नाही. यावेळेस मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वतः फाउंटन हॉटेलजवळ वर्सोवा खाडीपाशी झालेल्या दुर्घटनेत जेसीबीसह अडकलेल्या मजूर राकेश यादव (Rakesh Yadav) यांच्या कुटुंबियांस ५० लाख रुपये मदतीचा धनादेश सुपूर्द केला आहे. शिवाय राकेश यांच्या भावाला नोकरीही मिळवून दिली आहे. मात्र, दुर्दैवाची गोष्ट अशी की या घटनेला २५ दिवस उलटल्यानंतरही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या राकेश यांचा मृतदेह बाहेर काढण्यात अद्याप यश आलेलं नाही. यासाठी एनडीआरएफ (NDRF) व एसडीआरएफचे (SDRF) जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

राकेश यादव यांच्या कुटुंबियांना आज मुख्यमंत्र्यांच्या ठाणे (Thane) येथील निवासस्थानी बोलावून धनादेश देण्यात आला. यावेळी राकेश यांच्या पत्नी सुशीला यादव, वडील बालचंद्र यादव, मुली रिशु आणि परी यादव, मुलगा रिंकू यादव आणि भाऊ दुर्गेश यादव तसेच एमएमआरडीए आणि एल अँड टीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्सोवा खाडीजवळील घटनास्थळी भेट दिली होती. त्यावेळी, पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करत मदतीनिधीची घोषणाही केली. त्यानुसार, आज मदत करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

एमएमआरडीएच्या वतीने वसईतील वर्सोवा येथे सूर्या प्रकल्पाचे काम सुरू असताना ५० फूट खोल खड्ड्यात पोकलेन काम करत असताना त्यावर सिमेंटचा गर्डर कोसळून दुर्घटना झाली होती. यावेळी जेसीबी ऑपरेटर असलेले राकेश यादव हे जेसीबीसकट मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी १७ दिवस प्रयत्न करूनही त्याचा तपास होऊ शकला नाही. अखेर याठिकाणी सैन्यदल, तटरक्षक दल, एनडीआरएफ एसडीआरएफच्या जवानांना एकत्रितपणे मदतकार्यासाठी पाचारण करण्यात आले. मात्र वरून कोसळणारा पाऊस आणि त्यात सुरू असलेल्या बचावकार्यामुळे त्यात अनेक अडचणी येत होत्या. या दुर्घटनेत २५ दिवस उलटले तरी राकेश यांचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

तत्पूर्वी कुटूंबाला मदत म्हणून मदतनिधी आज त्यांच्या कुटुंबीयांच्या हाती सुपूर्द करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला दिलेल्या निर्देशानुसार एल अँड टी कंपनीच्या वतीने ३५ लाख रुपये तर १५ लाख विम्याचे असे एकूण ५० लाख रुपये आज राकेश यादव यांच्या कुटुंबीयांना देण्यात आले. तसेच, राकेशचा भाऊ दुर्गेश याला एल अँड टी कंपनीमध्ये नोकरीही देण्यात आली आहे.

दरम्यान, यावेळी एमएमआरडीएचे सह- आयुक्त राधबिनोद शर्मा, एमएमआरडीएचे मुख्य अभियंते श्री चामलवार, एमएमआरडीएचे वरिष्ठ अभियंते हनुमंत सोनवणे, एल अँड टीचे प्रकल्पप्रमुख श्री कॉलिन, माजी नगरसेवक एकनाथ भोईर हेदेखील यावेळी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -