Tuesday, October 8, 2024
Homeसाप्ताहिककोलाजप्रेम-प्रतीक राजहंस

प्रेम-प्रतीक राजहंस

निसर्गवेद – डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख,
होते तयांत एक पिल्लू कुरूप वेडे.

आपण लहानपणापासून कायमच हे गीत ऐकत आलो आहोत आणि शेवटी शेवटी तो राजहंस आहे हे समजल्यावर आपला आनंद द्विगुणित होऊन आत्मीक समाधान आपल्याला कायमच होत आले आहे. या प्रेमळ सुंदर आकर्षक राजहंसाबद्दल आज आपण जाणून घेऊ या.

अ‍ॅन्सर आणि ब्रँटा या दोन प्रमुख जाती आहेत. खरं तर काळा आणि पांढरा अशा दोन प्रकारचे हंस आढळून येतात. आता यांच्यामध्ये अनेक प्रजाती आपल्याला दिसतात. या जवळजवळ १९ प्रजाती आणि उपजाती आहेत. बारय-हेडेड, पिंक फुटेड, स्वान, बिन, ग्रेलॅग, व्हाईट फ्रंटेड, श्वेत, रॉस अशा अनेक हंसाच्या जाती आहेत. वैज्ञानिकांनी फ्लेमिंगो आणि राजहंस या दोघांच्या साम्यांमध्ये बराच गोंधळ घालून ठेवलाय. ते म्हणतात की, फ्लेमिंगो कबुतराच्या जातीतील आहेत. पण हे समजत नाही की, कुठल्या संशोधनाने ते म्हणतात. आफ्रिका आणि अंटार्टिका सोडून हे पक्षी जगात सगळीकडे आढळतात. सगळ्यात महत्त्वाचं कोणताही पक्षी त्याच्या जवळपास असणाऱ्या पक्ष्यांशी संबंध ठेवत असतो. हे यापूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितले आहे. याचाच अर्थ फ्लेमिंगोने बदकाशी संबंध ठेवल्यानंतर राजहंसाची निर्मिती झाली असावी. कारण राजहंस हा बदकासारखा असला, तरी त्याची मान फ्लेमिंगोसारखी उंच असते. बदकं काळी, पांढरी, तपकिरी, राखाडी रंगांची असतात. फ्लेमिंगो गुलाबी, पांढरा किंवा इतर रंगाचा असू शकतो. एकंदरीत माझ्या संशोधनाअंतर्गत राजहंस हा बदक आणि फ्लेमिंगो या पक्ष्याचे मिश्रण असावे. दहा ते बारा किलो वजनाचे या पक्ष्याचे आयुर्मान पाच ते सात वर्षे असते.

पांढऱ्या शुभ्र राजहंसाच्या गुलाबी चोचीवर पुढच्या बाजूला थोडासा काळ्या रंगाचा तिरकस डाग असतो. लालसर, केशरी चोच, डोळ्यांपर्यंत काळा त्रिकोण, पांढरशुभ्र पंखांचे मलमली शरीर, अतिशय आकर्षक दिसतो. काळ्या हंसाचा डोळा लालसर असतो. त्याच्या पंखांमध्ये तपकिरी, राखाडी आणि काळ्या रंगाचा समावेश असतो. फिकट तपकिरी रंगाची किनार असणारे गडद काळपट तपकिरी गोलाकार पंख त्याच्या दोन्ही बाजूच्या पाठीवरच्या पंखांमध्ये असतात, तर शेपटीकडील भागात थोडे लांबट पंख असतात. प्रत्येक प्रजातीतील हंसाची चोच ही वरून गोलाकार, थोडीशी निमुळती आणि खालच्या बाजूने चपटीच असते. पूर्ण काळे मखमली पंख असणाऱ्या हंसाची चोच लाल असून, टोकाला पांढरा रंग असतो. यांच्या तोंडात दात नसतात. यांचे पाय राखाडी, गुलाबी, काळपट असून तीन बोटांच्या मध्ये त्यांना जोडणारा काळपट तंतुमय पडदा असतो. यांना उत्तमरीत्या पोहता यावे, यासाठी परमेश्वराने यांची रचना अतिशय अद्भुतरीत्या संतुलितपणे केली आहे. यांचे शस्त्र म्हणजे चोच आणि पंख.

राजहंसाचा पांढराशुभ्र रंग हा आपल्याला जास्तीत जास्त दिसतो. फ्लेमिंगो आपल्याला कधीही पाण्यात पोहताना दिसत नाही; परंतु राजहंस हा बदकासारखा पाण्यात पोहतो. त्याची लांब मान खूप आकर्षकरीत्या फिरवतो. रंगांसंबंधित खूप खोलवर संशोधन केल्यामुळे, इतकेच सांगू शकते की, राजहंसाचा शुभ्र पांढरा रंग हा नैसर्गिकरीत्या पावित्र्याचे लक्षण असते, त्याच्यातील गुणांमुळे याला ‘राजहंस’ असे नाव दिले गेलेले असावे.

तसं आपल्याकडे स्त्रियांमध्ये गरोदरपणापासून ते बाळंत होईपर्यंत जो काही फरक पडतो, तसाच फरक या पशु-पक्ष्यांमध्ये सुद्धा मादीत पडत असतो. जो निरीक्षणाअंतर्गत मला जाणवतो. चोचीपासून ते शेपटापर्यंत मादीमध्ये होणारा
बदल हा खोलवर संशोधन केल्यानंतरच आपल्याला समजतो.

या राजहंसांचे घरटे हे जमिनीवरच तळ्याजवळच्या आसपास असणाऱ्या गवतांमध्ये असते. सुकलेल्या गवताच्या काड्या, मऊ गवत याचा उपयोग घरटी बांधण्यासाठी करतात. पिल्लांना जवळच तळ्यात पोहायला शिकवता यावे, पिल्लाने सहज तिथपर्यंत पोहोचावं म्हणून ही सर्व तजवीज. मादी तीन ते नऊ अंडी देतात. यांची सात ते नऊ पिल्लं असतात. त्यांची गोंडस राखाडी रंगाची गुबगुबीत पिल्लं अतिशय हुशार असतात. अगदी शिस्तीत राहणारे. जोपर्यंत ते स्वतःवर अवलंबून राहू शकत नाहीत, तोपर्यंत ते काय आईचा पिच्छा सोडत नाहीत. आश्चर्य याचं वाटतं की, अतिशय शिस्तीत तिच्यामागोमाग चालतात, पाण्यात पोहतात, तिच्या पंखांमध्ये घुसून बसतात, जशी लहान मुलं आपल्या आईच्या कडेवर सतत बसत असतात, तसेच ही पिल्लंसुद्धा पाण्यात बऱ्याचदा आईच्या पंखांमध्ये ऊबेसाठी आणि संरक्षणासाठी बसतात, तर कधी आईच्या पंखाखालून बाहेरचे निरीक्षण करत असतात. त्यांनाही आपल्या आईच्या पंखांमध्ये बसून पाण्यात पोहण्याचा आनंद मिळत असतो. कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत पिल्ले पालकांसोबत राहतात. जन्मतात तेव्हा यांची पिल्लं बदकासारखी दिसतात; परंतु यांची मान थोडी मोठीच असते. हळूहळू ती उंच व्हायला लागते. जसजशी पिल्लं मोठी होतात, तस तशी सूर मारायला शिकतात. ही पिल्लं तरुण होईपर्यंत आपल्या पालकांच्या सोबतच राहतात. यांची कौटुंबिक व्यवस्था खरंच वाखाणण्यासारखी आहे. नर मादीतील एकमेकांवरचं प्रेम, वात्सल्य अवर्णनीय आहे.

या पक्ष्यांचे पेंटिंग करत असताना, खूप बारीक निरीक्षण त्यांच्या संदर्भात केल्यावर एक गोष्ट लक्षात आली की, त्यांच्या पंखांखाली अजून एक पातळ मलमली नरम लहान अशा पंखांचा थर असतो. म्हणजे वरून दिसणारे पंख वेगळे आणि आतील पंख. शरीरावरील आवश्यक ठिकाणी म्हणजे जिथे मोठे पंख आहेत, तिथे असणारे हे वेगळे असतात. आधी मला वाटलं होतं की, हे पंख त्यांच्या शरीरावरील वरचे पंख गळल्यानंतर आतील शरीराचे रक्षण करण्यासाठी असावेत. पण जेव्हा एका मादीचं आई झाल्यावर निरीक्षण केलं, तेव्हा बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या की, आई-बाबा म्हणून हे पक्षी आपल्याच शरीरावरील आतील पंखांचा उपयोग अंडी ऊबवताना त्या अंड्याच्या आणि पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या ऊबेसाठी स्वतःच्या शरीरावरील मऊ पंख बाहेर काढून घरट्यामध्ये पसरतात. गवताच्या सुकलेल्या काड्या कुठेही पिल्लांना टोचू नयेत म्हणून आपल्या या मऊ पिसांचा उपयोग ते गादीसारखे करतात. एक मातृत्व आपल्या पिल्लांसाठी पोटात असल्यापासून किती काळजी घेत असतं.

आध्यात्मिकदृष्ट्या हा हंस आपल्या उद्याची देवता सरस्वतीचे वाहन मानले जाते. तसा हा खूप शांत, विवेकी, शुद्ध, पवित्र, एकनिष्ठ, कौटुंबिक, प्रेमळ पक्षी मानला जातो. कौटुंबिक व्यवस्था सांभाळत असताना, जर त्यांच्या कुटुंबाला कोणी हानी पोहोवणारे शत्रू आले, तर हे खूप आक्रमकसुद्धा होतात. यांची जोडी एकमेकांशी खूपच एकनिष्ठ असते. यांची स्मरणशक्ती आणि बुद्धी खूप तल्लख असते. यांच्या मानेचा आकार हा गोलाकार वळणदार एखाद्या मुक्तहस्त चित्रासारखा असतो. नरमादी जोडीत असताना अतिशय प्रेमाने एकमेकांजवळ येताना, तेही मान विविध पद्धतीने फिरवतात. बऱ्याचदा यांचा मानेचा आकार हा आपल्या हृदयासारखा होतो म्हणून यांना ‘प्रेमाचे प्रतीक’ मानले जाते. नर आणि मादी यांची जोडी शेवटपर्यंत एकमेकांची सोबत करते. जर एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा अत्यंत केविलवाणा झाल्याचे पाहण्यात आले आहे. राजहंस उडताना वी आकारात उडतात. हे पक्षी स्थलांतर करीत असताना, पुढच्या बाजूला जो हंस असेल, तो थकला की, मागचा हंस पुढे येतो. हे एका विशिष्ट ध्वनीद्वारे एकमेकांशी संवाद साधतात. ते दिवस-रात्र केव्हाही उडतात. त्यांच्या दिशा या चंद्र-तारे यावरून ठरलेल्या असतात.

दुर्दैवाने हंसांचा पाळीव पक्षी म्हणून व्यापार केला जातो. त्यांची पिसं नरम, मऊ, ऊबदार असल्यामुळे त्याचा उपयोग उशा, रजया, कोट यांमध्ये करतात. उत्तर अमेरिकेमध्ये मध्यंतरी शिशामुळे विषबाधा झाली होती. बऱ्याचदा पक्षी, प्राणी शिकार करण्याच्या नादात मानव सर्वच काही प्रदूषित करतो. परिणामी पशुपक्षी आणि कीटक नामशेष होत आहेत. मानवाचे जंगलाच्या दिशेने उचलले गेलेले एक एक पाऊल या प्रकृती संवर्धन कार्यरत असणाऱ्या जीवांसाठी धोकादायक होत चालले आहे, किमान याचा आता तरी विचार करावा.

dr.mahalaxmiwankhedkar @gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -