विशेष – भालचंद्र ठोंबरे
श्री कृष्णाच्या द्वारकेत सत्राजित व प्रसेनजित नावाचे दोन यादव बंधू होते. सत्राजित हा सूर्याचा उपासक होता. त्याने सूर्य देवाची भक्ती व आराधना केली. त्यामुळे सूर्य देवाने प्रसन्न होऊन त्याला स्यमंतक नावाचा तेजस्वी मणी दिला. हा मणी सुंदर तर होताच पण मागितल्याप्रमाणे दररोज तो मणी आपल्या वजनाच्या आठपट सोने देत असे. मणी पाहून कृष्णाने तो मणी सुरक्षित राहावा म्हणून उग्रसेन महाराजांना देण्यास सांगितले; परंतु सत्राजिताने या गोष्टीला नकार दिला व तो मणी आपला भाऊ प्रसेनजित याला दिला. प्रसेनजित तो मणी घालून एकदा शिकारीला गेला असता वाघाने त्याला ठार केले. त्याचवेळी तेथे आलेल्या जांबवंत अस्वलाने वाघाला ठार करून तो मणी घेऊन आपल्या गुहेत गेला व तो मणी आपल्या मुलीसाठी खेळण्याला दिला.
बराच वेळ प्रसेनजित न आल्याने कृष्णानेच मण्यासाठी प्रसेनजितचा घात करून मणी घेतला असावा अशा आरोप सत्राजितने केला. प्रसेनजितचा वध व मण्याची चोरी श्रीकृष्णानेच केली असे आपल्यावरील आरोप ऐकून कृष्णाने हा लोकापवाद दूर करण्याचे ठरवले. स्वत: कृष्ण काही नागरिकांसोबत मणी व प्रसेनजितचा शोध घेण्यासाठी निघाला. तेव्हा एका ठिकाणी त्याला प्रसेनजितचे शव दिसले, थोड्या दूर अंतरावर मेलेला वाघ दिसला व तेथेच एका अस्वलाची पावलेही दिसून आली. ती पावले एका गुहेत गेल्याचे दिसले. यावरून वाघाने प्रसेनजितला तर अस्वलाने वाघाला मारले असावे असा अंदाज काढून ते सर्व गुहेजवळ आले. कृष्ण त्या गुहेत शिरले व सोबतचे सहकारी बाहेर थांबले. श्रीकृष्णाला आत जाताच एक लहान बाळ पाळण्यात त्या मण्याशी खेळताना दिसले. श्रीकृष्ण मणी घेण्यासाठी पाळण्याजवळ जाताच त्यांना जांबवंताने अडवले. तेव्हा जांबवंत व कृष्ण यांचे २८ दिवस युद्ध झाले. दहा-बारा दिवसांनंतरही कृष्ण न आल्याने त्यांचे सोबती परत गेले. अठ्ठावीस दिवसांच्या युद्धानंतर थकलेल्या जांबवंताला आपला प्रतिस्पर्धी हा अवतारी पुरुष भगवंत विष्णूच आहे हे ओळखून त्याचे गुणगान केले. तेव्हा श्रीकृष्णाने आपण या मण्यासाठीच येथे आलो असून या मण्याच्या चोरीचा आळ माझ्यावर असून तो दूर करण्यासाठी मला हा मणी हवा आहे असे सांगितले. तेव्हा जांबवंताने स्यमंतक मणी कृष्णाला दिला व आपली मुलगी जांबवंतीचा विवाहही कृष्णासोबत लावून दिला. कृष्णाने परत येऊन तो मणी सत्राजिताला परत केला. आपल्यावरील चोरीचा आळ दूर केला तेव्हा चुकीचा आरोप लावणाऱ्या सत्राजितने श्रीकृष्णाची क्षमायाचना करून आपली कन्या सत्यभामाचा विवाह कृष्णाशी लावून दिला.
कालांतराने एकदा कृष्ण कौरव पांडवांच्या भेटीला गेले असता शतधन्वा नामक यादवाने सत्राजितला ठार करून त्याच्याकडून मणी घेऊन तो मणी अक्रुराला देऊन स्वतः तीर्थयात्रेसाठी निघून गेला. कृष्ण परत आल्यावर कृष्णाला हे कळले तेव्हा ते बलरामला सोबत घेऊन शतधन्वाच्या मागावर गेले. कृष्णाने तेज गतीने पुढे जावून शतधन्वाला गाठले व त्याला ठार केले. पण त्याच्याजवळ मणी मिळाला नाही मागवून येणाऱ्या बलरामाला कृष्णाने मणी न मिळाल्याचे सांगितले. बलराम तेथून विदर्भाकडे निघून गेले. कृष्ण परत आल्यावर कृष्णाच्या सोबत बलराम नसल्याचे पाहून नागरिकांनी कृष्णाबद्दल अनेक प्रकारच्या आशंका व्यक्त केल्या ते पाहून कृष्ण अत्यंत दु:खी झाले. त्याच कालावधीमध्ये जगभ्रमणावर असलेल्या नारदाची व त्यांची भेट झाली.
आपल्यावर विनाकारण चोरीचा व खुनाचा आळ का यावा याबाबत श्रीकृष्णाने नारदाला विचारले. तेव्हा तुम्ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला चंद्राचे दर्शन केले असावे त्यामुळेच हे होत असल्याचे नारदांनी सांगितले. कृष्णाने याचे कारण विचारले असता नारद म्हणाले, त्याची एक कथा आहे. एकदा गणपती आपले वाहन उंदरावर बसून जात असताना गणपतीचे शरीर व त्याचे वाहन पाहून चंद्र त्यांच्या रूपाला हसला. (काही ठिकाणी उंदरावरून गणपती पडल्याने चंद्र हसला असाही उल्लेख आहे.) त्यामुळे क्रोधीत होऊन गणपतीने चंद्राला तुझे तोंड कोणीही पाहणार नाही असा शाप दिला. तेव्हा चंद्राने क्षमा मागून शाप मुक्तीची याचना केली असता गणपतीने त्यांना शाप मुक्त केले; मात्र भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थीला जो चंद्र पाहिल त्याला अनेक आरोपांना सामोरे जावे लागून संकटाचा सामना करावा लागेल, असे सांगितले. मात्र सिद्धी विनायकाचे (उजवेल गणपतीचे) व्रत केल्यास या चंद्रदर्शनाच्या परिणामाला सामोरे जावे लागणार नाही असाही उ:शाप दिला. अशी कथा नारदाने कथन केली.
अक्रुराने आपल्याकडील मणी कृष्णाला आणून दिला. मात्र कृष्णाने अक्रुराच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून तो मणी अक्रुराकडे ठेवण्याची विनंती केली.