कथा – रमेश तांबे
आज जंगलात नुसती धामधूम सुरू होती. त्याला कारणही तसेच होते. आज चिमणा-चिमणीचे लग्न होते. वेली-फुलांचा मंडप उभारला होता. आजूबाजूच्या झाडांवर फुलांच्या माळा लावल्या होत्या. कावळे काका आपल्या मोठ्या आवाजात सुहास्यवदने सर्वांचे स्वागत करीत होते. मंडपाच्या एका दिशेला रंगमंच उभा केला होता. तिथल्या एका मंचकावर बसून मैना, साळुंक्या गोड आवाजात गाणं गात होत्या. गाण्याच्या मैफलीसाठी कोकीळभाऊंना खास आमंत्रण देण्यात आले होते.
रंगमंचासमोर पहिल्या रांगेत पक्षीराज गरुड सहकुटुंब उपस्थित होते. आता पक्षीराजच लग्नाला आले आहेत, म्हटल्यावर समस्त पक्षीगणांची तेथे गर्दी झाली. सगळा मंडप चिवचिवाट आणि कलकलाटाने भरून गेला होता. सूत्र निवेदक कावळे काकांचा ओरडून ओरडून घसा आणखीनच खराब झाला होता. त्यामुळे नाईलाजाने पोपटरावांनी माइक हातात घेतला. आता पोपटराव आपल्या गोड आवाजात आलेल्या पाहुणे मंडळींशी वार्तालाप करू लागले. तिकडे सुगरण भाऊंची उडाउड सुरू होती. कारण खानपानाची सर्व सोय त्यांच्याकडेच होती. चिमणीच्या लग्नाचा मेन्यू भलताच भारी होता. शाकाहारी पक्ष्यांसाठी विविध प्रकारच्या फळांचे छोटे छोटे तुकडे करून ठेवले होते. त्यात लालभडक कलिंगड, खरबूज, केळी, फणस होते. द्राक्ष, आंबे, लालभडक चेरीदेखील होती. मांसाहारी जेवणात विविध प्रकारचे छोटे-मोठे कीटक, सरपटणारे प्राणी पकडून आणले होते.
आता लग्नघटिका जवळ येत होती. चिमणा नवरदेव धोतर, सदरा, जॅकेट, डोक्यावर मोरपिसाची टोपी घालून तयार होता. त्याच्यासोबत दोन-चार चिमण्या करवल्यादेखील तयार होऊन आल्या होत्या. बदक भटजीबुवा बनले होते. ते ठुमकत ठुमकत रंगमंचावर फिरत होते. सगळ्यांना विविध सूचना देत होते. चिमणा नवरदेव चिमण्या नवरीची वाट बघून दमून गेले. बऱ्याच वेळानंतर चिमणी नवरी नटून-थटून मंडपात आली. ती आज खूपच छान दिसत होती. तिने रंगीबिरंगी फुलांची छान साडी नेसली होती. कपाळावर गडद हिरव्या गवताची मुंडावळी बांधली होती. पायात वडाच्या पानापासून बनवलेल्या सुंदर चपला घातल्या होत्या. ओठांना आणि गालावर करवंदाचा लाल रंग हळुवारपणे लावला होता. चिमण्या नवरीचे सुंदर रूप बघून चिमणा नवरदेव लाजून चूर झाला होता. भटजीबुवांनी सांगितल्याप्रमाणे दोघेही पाटावर उभे राहिले. भल्या मोठ्या केळीच्या पानाचा अंतरपाट मध्ये धरला होता. रंंगमंचावर करवल्यांची फारच गर्दी झाली होती. त्यांच्या किलबिलाटात भटजीबुवा काय सांगतात, हेच कळत नव्हतं. मग पोपटरावांचा माइक बदकबुवांंनी घेतला आणि शुभमंगल सावधान म्हणत लग्नाला सुरुवात केली. फोटोग्राफी करण्यासाठी कबुतरांचा ड्रोन कॅमेरा साऱ्या मंडपात खालीवर फिरत होता. लग्नाला आलेल्या पोरा-बाळांचे लक्ष त्या ड्रोन कॅमेऱ्याकडेच होते. अक्षता म्हणून रानातली छोटी-छोटी पिवळी फुलं गोळा करून आणली होती.
मंगलाष्टके संपली आणि पंखांचा एकच फडफडाट सुरू झाला. नवरा- नवरीने एकमेकांना गवत फुलांचे हार घातले. इकडे मंडपात वऱ्हाडी मंडळींच्या पंक्ती सुरू झाल्या. पत्रावळ्या म्हणून झाडांची पाने वाढली होती. पदार्थांचे वाटप सुरू असतानाच, गरुड राजांच्या गुप्तहेर प्रमुख टिटवी बाईंनी धोक्याचा इशारा दिला. सावधान सावधान… सिंह महाराज आपल्या भल्या मोठ्या कळपासह मंडपाच्या दिशेने येत आहेत. ही बातमी ऐकताच, मंडपात एकच गोंधळ उडाला. सगळे पक्षी उडण्याचा प्रयत्न करू लागले; पण लग्नाला गर्दीच इतकी होती की, अनेकांना भरारी घेता येत नव्हती. त्यामुळे चेंगरा-चेंगरीदेखील झाली. तिकडे चिमण्या नवरदेवाने कसाबसा चिमण्या नवरीचा हात धरला आणि गर्दीतूून वाट काढत उडून गेला. दोन-चार मिनिटांतच सगळा मंडप खाली झाला. पत्रावळीत वाढलेले जेवण तसेच मागे राहिले. यानंतर पक्षीराज गरुडाने सर्व पक्ष्यांच्या सुरक्षिततेसाठी एक हुकूम जारी केला. यापुढे लग्न समारंभ करायचा नाही. तेव्हापासून पक्ष्यांची लग्ने कधी होतात, ते कुणालाच कळत नाही!