एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
पुणे : पुण्यातील पोर्शे अपघातामुळे (Pune Porshe Accident) राज्यभराचं वातावरण अजूनही तापलेलं आहे. यामध्ये मद्यधुंद अवस्थेत कार चालवून दोघांना चिरडणाऱ्या धनिकपुत्राला वाचवण्यासाठी अख्खी यंत्रणाच कशी कामाला लागली आहे, याची उदाहरणे वारंवार समोर येत असतात. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात न्याय मिळण्याविषयी भीती निर्माण झालेली असतानाच आता पुण्यात आणखी अशाच एका अपघाताची घटना घडली आहे. एका तरुणाने बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना गाडीखाली चिरडल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे हा तरुण पुण्यातील आमदाराचा पुतण्या आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांच्या पुतण्याकडून अपघात झाला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) आज मध्यरात्रीच्या सुमारास कळंब येथे झालेल्या अपघातात आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडल्याची माहिती मिळत आहे. मयूर मोहिते असं आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयुर हा पुणे-नाशिक महामार्गावरून कारने पुण्याच्या दिशेने येत होता. तो विरुद्ध दिशेने सुसाट गाडी चालवत होता. त्यावेळी समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना त्याच्या भरधाव कारने धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकी हवेत उडाली आणि दुचाकीवरील तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. यापैकी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे ओम सुनिल भालेराव या १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातावेळी आरोपी आमदार पुतण्यानं मद्य प्राशन केलेले का? याचाही तपास सुरू आहे.