कुठूनशी, एक थंडगार वाऱ्याची झुळूक आली
मंजुळ स्वरे, कानी हळुवार गुणगुणली
छम छम नृत्य करी, वर्षा राणी अंगणी
अलिंगता धरेला, दरवळे आसमंत मृदगंधानी.
तडक उठूनी खिडकी जवळी, आले पाहाण्या
खट्याळ वारा, खुणावी मजसी, अंगणी येण्या.
निलांबर हे सजल घनांनी, कृष्णवर्णी जाहले
शितल वारा स्पर्शता तनुला, मन मयूर नाचू लागले.
वरूण कृपेने शमली, वैशाखी काहीली,
मोदभरे नृत्य करी वसुंधरा अवघी.
चिंबता पाखरे, गारव्याने थरथरती
पिल्लांना उब देण्या, पंखाखाली घेती.
कोकीळ आळवी सुस्वरे, राग मेघ मल्हार
प्रसन्न होऊनी वरूण, करी रिते जल कुंभ झरझर.
कडाडता दामिनी, नजर गेली वाळक्या वृक्षावरी
फांद्यांवरील वर्षा बिंदू,जणू सहस्त्र चंद्रच उतरले भुवरी.
तृप्त झाली वसुंधरा, मेघ राजाच्या मनसोक्त बरसल्याने
वरूण धरेचे झाले मिलन, सहस्त्र चंद्राच्या साक्षीने.
– वर्षा लोवलेकर, मुंबई
रंग सावळा…
रंग सावळा हा उधळीत आला
भुलली सावळ्या रंगाला ही बाला
गड, गड, गड हा नाद गुंजला
गूढ मनीचे उकलले अचला
हृदय कवाडे अशी करता खुली
रोमांचित होई राधा ही बावरी
सावळा करी किमया अशी न्यारी
अचंबित होई नगरी ही सारी
आता नको असे ते वाट पाहणे
आस एकच ही तुझ्यात रंगणे
सूर, तुझे रिमझिम बरसणे
राधा गुणगुणते हिरवे गाणे…
या गाण्याची रीत असे हो निराळी
रीत निराळी अन् प्रीत निराळी
राधेला वेडी करी अशी मुरळी
बासुरी संगे सृष्टी नाचे सगळी
– सुजाता स. घाडीगावकर, करी रोड