Tuesday, October 8, 2024

मन रे…

हलकं-फुलकं – राजश्री वटे

मन रे… तू काहे ना धीर धरे…
जरा ढील द्या याला… बेफाम वाऱ्यापेक्षा वेगाने पळत सुटतं हे मोकाट… बे लगाम… आवरता आवरत नाही मग ते! फार कठीण असतं त्याला जागेवर आणणं जेव्हा ते असं उधाणतं… आणि कधी इतकं शांत असतं ते गोजिरवाणं…
कुरवाळावं त्याला जवळ घेऊन, कसं दिसतं ते केविलवाणं!

मनाच्या मनात काय चालतं,
कधी कळतच नाही!
मन का होते सैरभैर…
कुणावर त्याचा जीव तर
कुणाशी हाडवैर!
लहान मुलासारखं वागतं ते,
कधी स्वछंद बागडतं…
कधी खट्याळ हसवतं…
कधी तरुण होत तरंगत असतं…
कधी स्वतःलाच थोपटतं…
कधी धुंद स्वप्नात रमतं…
कधी आतल्या आत आक्रंदतं!!
नाण्यासारख्या मनालाही दोन बाजू असतात…
एक मन… दुसरं अंतर्मन!!
मन आणि अंतर्मन नेहमीच
लपंडाव खेळतात…
कठीण प्रसंगी मात्र एकमेकांना सावरतात!!
मनामध्ये विचारांची नेहमीच दाटी असते, भिरभिरत असतं इथून तिथे… कधी ते जमिनीवर असतं… कधी अवकाश फिरून येतं… कुठे कुठे जाऊन येतं ते कल्पनेच्या पलीकडे… आणि त्रास करून घेतं थकल्या जीवाला!
मृगजळामागे धावणाऱ्या मनाला अंतर्मन ओढत असतं…
तुझं माझं पटेना तरी एकत्र नांदत असतं!
मनाला विचार असतो, तसा आकारही असतो… कुणाचं मन मोठं… तर कुणाचं??
फार हळवं असतं ते… कुणाला दुखावलं चुकून तर हेच रडतं… आतल्या आत…
कुठे गुंतायचं, कुठे रमायचं
हे मनानेच ठरवायचं…
पण, घसरलंच कधी तर…
अंतर्मनाने सावरायचं!
मनाचं जीव लावणं… अंतर्मन सगळं जाणतं…
कधी तुटलंच तर…
फार भारी पडतं मनाला…
झेपतच नाही!!
खोल हृदयात झिरपत जातं
ते तुटणं…
अन अंतर्मनाला कायमचं जळू सारखं चिकटतं!
हे मना, हळवेपणा सोड तू… जरा कठोर बनून पहा… हा अंतर्मनाचा आवाज!
हे अंतर्मना… कसं सांगू तुला… नाही रे जमणार मला… मी मनमोराचा पिसारा… मऊ, रंगबिरंगी, आनंदी रंग उधळणारे माझं मन हे असंच राहील… कोमल प्रेमळ, त्याला कठोर होताना नाही बघवणार…
करीन ते मनापासून…
हेच माझे मनाचे श्लोक!!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -