क्राइम – अॅड. रिया करंजकर
महाराष्ट्रामध्ये नव्हे, तर पूर्ण भारतामध्ये आदिवासी लोकं आहेत. ते भारतातले मूळ रहिवासी आहेत, असं इतिहास आपल्याला सांगतो. या आदिवासींचं वास्तव्य हे जंगलात असल्यामुळे, निसर्ग त्यांना आपल्या जवळचा वाटतो. निसर्गातील खडानखडा त्यांना ज्ञात असतात. निसर्गही आपली मुलं असल्याप्रमाणे त्यांचं पालनपोषण करतो आणि आदिवासी लोक निसर्गाचे तेवढेच जतन करतात. विरार, नालासोपारा, वसई या बाजूला आदिवासी जमात जास्त असल्यामुळे, त्यांच्या जमिनी त्या बाजूला भरपूर आहेत. काही लोकांनी या जमिनी विकल्या, तर काही लोकांनी या जमिनीवर चाळी बांधून, त्या भाड्याने दिल्या किंवा विकल्या आहेत. पण या आदिवासींना आणि घेणाऱ्यांना आदिवासी जमिनीबद्दल कायदेच माहीत नसल्यामुळे, हा सर्व प्रकार आजपर्यंत झालेला आहे.
रामलाल चव्हाण हे उत्तर प्रदेशातून मुंबईला काही वर्षांपूर्वी राहायला आले होते. इथे स्वकष्टाने आणि ओळखीने त्यांनी संपत्ती गोळा केली. ठरावीक रक्कम त्यांच्याकडे जमा असल्याने, त्यांनी मित्राच्या सांगण्यातून विरारला असणाऱ्या जमिनीची पडताळणी केली. भविष्यात आपण या ठिकाणी फार मोठं रिसॉर्ट करू शकतो, या विचाराने त्यांनी त्या आदिवासींकडून ती जमीन विकत घेतली. त्यावेळी जमिनीची रक्कम ३५ लाख होती. जिथपर्यंत नजर पोहोचेल, तिथपर्यंत जमीन त्यांच्या ताब्यात आली. पण ते रिसॉर्ट बांधू शकले नाही; कारण त्यांच्याकडे तेवढी रक्कम नव्हती. भविष्यात आपला मुलगा तिथे रिसॉर्ट बांधेल, या विचाराने ती जमीन त्यांनी तशीच ठेवली.
रामलाल यांनी जमिनीच्या बेकरीकेसाठी तिथल्या मूळ आदिवासी लोकांना देखभालीसाठी पाच-पाच गुंठा जमीन दिली. देखभालीसाठी आदिवासींना दिलेली जमीन विकली होती. त्याच्या पुढच्या पिढीला काही कायदे ज्ञात झाल्यामुळे, रामलालकडून आदिवासी लोकं आपली जमीन परत मागू लागले. पण रामलालने त्याच्यातील एक एकर जमीन एका व्यक्तीला विकली होती आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीने गाळे तयार केलेले होते. आदिवासींची पुढची पिढी आपल्या जमिनीवर ताबा मिळू लागली होती. आपल्या जमिनीत जी विकलेली जमीन होती, रामलालला त्याच्यामध्ये त्यांनी शेती गाळे, चाळ अशी बांधायला सुरुवात केली. ज्यावेळी रामलाल आणि त्याच्या मुलाला हे सर्व समजलं, त्यावेळी त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं. ही जमीन आदिवासी यांनी विकलेली होती. एवढेच नाही तर त्याचे ३५ लाख ही त्यांनी घेतलेले होते. आदिवासी लोक ब्राह्मणाला सांगू शकत होते की, आदिवासी जमीन आहे ती, विकली जाऊ शकत नाही ती, भाड्याने दिली जाऊ शकते; पण रामलाल आणि त्याचा मुलगा म्हणत होता; पण तुम्ही तर काही वर्षांपूर्वी जमीन विकलेली आहे आणि त्याचे पैसेही घेतलेले आहेत. हा वाद विकोपाला गेला होता; कारण रामलाल यांनी ज्यावेळी जमीन घेतली, त्यावेळी जमिनीला चांगली चिरांची बॉर्डर केलेली होती. त्यासाठी त्यांनी भरपूर पैसा खर्च केलेला होता.
आपली जमीन आहे म्हणून त्यांनी तिथे खर्चही केला होता. मात्र आता आदिवासी आपली जमीन आहे म्हणून दावा करत होते. स्थानिक नेत्याच्या मध्यस्थितीने आम्ही रामलालला पैसे परत करतो, असं सांगून एक समझोता करार त्यांच्यात झाला आणि त्याच्यामध्ये रामलाल याला आदिवासी लोकांनी ३५ लाखांपैकी अर्धी रक्कम म्हणजे १८ लाख रुपये अगोदर दिले आणि उरलेले नंतर देतो असे सांगितले. रामलाल चव्हाण याला १८ लाख मिळाल्यावर, २० वर्षांनंतर ही लोकं आम्ही रामलालला जमीन खरेदी करण्यासाठी पैसे दिले होते, असं सांगू लागली. रामलाल यांना जे पैसे दिले होते, त्याची पुराव्यासाठी कुठेही कागदपत्रे तयार नव्हती. एवढेच नाही तर रामलाल यांनी देखभालीसाठी जमीन दिलेले आदिवासीदेखील दावा करू लागले होते की, देखभालीसाठी जी जमीन रामलाल यांनी आम्हाला दिली, त्याची कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. जमीन देताना त्यांच्यात तोंडी व्यवहार झाला होता. जी जमीन देखभालीसाठी दिली, ती विकली कशी जाऊ शकते, असा प्रश्न रामलालच्या मुलाला पडला. १० ते १२ आदिवासी लोकांना ती जमीन देखभालीसाठी दिली होती.
आदिवासी लोकांकडून अर्धी रक्कम मिळाल्यावर नको नको ती पण लोकं आम्ही पैसा गुंतवला होता, असं सांगण्यासाठी पुढे आली होती. ज्यावेळी रामलाल आणि त्याचा मुलगा आदिवासींकडून आमची रक्कम परत द्या, असं सांगत होती, त्यावेळी मात्र कोणीच आलेलं नव्हतं. एका माणसाला जमीन विकली होती, त्याला परत पैसे देऊन, ती जमीन ताब्यात घेतली होती आणि ती आदिवासींना परत केली होती, तरी तो माणूस तिथे बांधलेले गाळे तोडायला तयार नव्हता. एक-दोन वर्षं होऊन गेले, तरी आदिवासी पुढची उरलेले १७ लाख रक्कम देण्याचं नाव काढत नव्हते. जमीन मात्र सर्व ताब्यात घेतली होती. त्यासाठी आता वयस्कर असलेले चव्हाण आणि त्यांचा मुलगा हा कायदेशीर लढा देत आहे. कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे विकणारा आदिवासी आणि घेणारा रामलाल चव्हाण. कायदेशीर बाबींमध्ये आता अडकले होते. यात रामलाल चव्हाण याला काहीच माहीत नसल्यामुळे, त्याचे अनेक वर्षं ३५ लाख आणि त्याचा देखभालीसाठी त्यांनी बांधलेली भिंत याचा जो खर्च झाला होता, ते अनेक लाखो रुपये त्याचे तिथेच अडकून पडले होते. जी रक्कम जमिनीत गुंतवलेली होती, ती अर्धीच रक्कम त्याला मिळाली होती, बाकीची रक्कम तर बाकीच होती. या जमिनीचा विकास करून, तिथे रिसॉर्ट करून, तिथल्या आदिवासी लोकांना नोकरी देण्याचे रामलालचे स्वप्न पूर्णपणे भंग झाले होते.
कारण (आदिवासी लॅण्ड) जमीन ही खरेदी होत नाही, ती ९९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतली जाते. त्या जमिनीचे आपण मालक बनू शकत नाही, हे रामलाल यांना माहीतच नव्हतं. त्यामुळे रामलालची मोठी फसवणूक
झाली होती.
(सत्यघटनेवर आधारित)