मुंबई: टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध शानदार कामगिरी करताना विजय मिळवला. भारताने टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सुपर ८मध्ये हा सलग दुसरा विजय मिळवला. टीम इंडियासाठी हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी दमदार कामगिरी केली. भारताने या विजयासोबतच एक रेकॉर्डही आपल्या नावे केला. टीम इंडिया टी-२० वर्ल्डकपमध्ये बांगलादेशला सलग सर्वाधिक हरवण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आली आहे.
खरंतर, टी-२० वर्ल्डकपमध्ये कोणत्याही एका संघाला सलग हरवण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर आहे. त्यांनी बांगलादेशला सलग ६ वेळा हरवले आहे. तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनीही बांगलादेशला ६ वेळा हरवले आहे. या यादीत भारताचेही नाव जोडले गेले आहे. टीम इंडियाने बांगलादेशला टी-२० वर्ल्डकपमध्ये सलग ५ वेळा हरवले आहे.
शनिवारी रंगलेल्या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १९६ धावा केल्या होत्या. यात रोहित शर्माच्या २३, विराट कोहलीच्या ३७,ऋषभ पंतच्या ३६, त्यानंतर शिवम दुबेच्या ३४ आणि हार्दिक पांड्याच्या नाबाद ५० धावांचा समावेश होता.
प्रत्युत्तरादाखल बांगलादेशच्या संघाला २० षटकांत ८ बाद १४६ धावाच करता आल्या. यावेळी कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट घेतले तर अर्शदीप आणि बुमराह यांना प्रत्येकी २ विकेट मिळाल्या.