नॉस्टॅल्जिया – श्रीनिवास बेलसरे
रंजिताने (रंजिता कौर) सिनेसृष्टीत पदार्पण केले तो सिनेमा होता १९७६ सालचा हरनामसिंग रावल यांचा ‘लैला-मजनू’! सिनेमाच्या नावाच्या उर्दूसारख्या काढलेल्या अक्षरांच्या पार्श्वभूमीवर रंजिता व ऋषीकपूरच्या अस्वस्थ मिठीचे छायाचित्र असलेले पोस्टर आजही आठवते. खलनायक होता डॅनी डेन्ग्झोपा आणि इतर कलावंत होते इफ्तेखार, अरुणा इराणी, प्रीती गांगुली, असरानी, पेंटल, रझा मुराद, अचला सचदेव आणि टॉम अल्टर. सिनेमाचे संवादलेखक अब्रार अल्वीही पाहुणा कलाकार म्हणून दिसले होते.
‘बॉबी’(१९७२) मधून पदार्पण केल्यानंतर ऋषी कपूरला १९७६ पर्यंत ‘कभी कभी’ शिवाय विशेष यश मिळाले नव्हते. नवी हिरॉईन रंजिताने ते मिळवून दिले. सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला.
खरे तर लैला-मजनू ही अरबस्थानातली एक लोककथा. तिथल्या ‘अमारीस’ आणि ‘शर्वारीस’ या परस्परांना शत्रू मानणाऱ्या जमातीत जन्मलेली लैला आणि कैस ऊर्फ मजनू ही मुले. त्यांचे बालपणापासून एकमेकांवर जीवापाड प्रेम असते. इतके की मदरशात शिकताना एकदा मौलवी मजनूला अल्लाचे नाव लिहून दाखवायला सांगतो, तेव्हा लैलाच्या आठवणीत हरवलेला मजनू तिचेच नाव लिहून दाखवतो. संतापलेला मौलवी त्याच्या हातावर छडी मारतो मात्र रक्त येते ते लैलाच्या हातातून!
ही खळबळजनक बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरते. लैलाचे वडील तिला मदरशातून काढून घेतात. दोन्ही काबिल्यांचे प्रमुख या दोघांना एकत्र ठेवणे अयोग्य ठरवून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून देतात. मोठे झाल्यावर योगायोगाने त्यांची बाजारात भेट होते आणि त्यांच्याही नकळत आंतरिक प्रेम उफाळून येते. लैलाचा भडक माथ्याचा भाऊ तबरेज आणि मजनूचे वेगळ्याच कारणासाठी वैर होते. त्यातून तिथल्या संस्कृतीप्रमाणे बराच रक्तपात होतो आणि मजनूला वाळवंटात हद्दपार केले जाते. तो विरहात तडफडत असताना लैलाचे लग्न राजकुमाराशी लावून दिले जाते.
लैलाला मजनूकडून आलेले एक पत्र त्याच्या हाती पडते. लैलाच्या प्रेमाचे सत्य कळल्यावर तो उमदा राजा तिला त्या पत्राचे तू काहीही उत्तर देऊ शकतेस, इतकेच नाही तर ते मीच कैसपर्यंत पोहोचवेन, असे आश्वासनही देतो. पत्र वाचताना तिचे अश्रू पत्रावर पडून काही भाग ओला होतो. लैला म्हणते, ‘हे पत्र असेच परत पाठवा, कैसला उत्तर समजेल.
तिच्या सौंदर्याने घायाळ झालेल्या राजाला अजूनही आशा असते. तो तिचे प्रेम जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न करतो पण सगळे अपयशी ठरतात. शेवटी अनेक नात्यमय घटना घडून लैलाचा आणि मजनू अशा दोघांचा अतिदु:खाने मृत्यू होतो. अशी ही दिग्दर्शक आणि लेखकांनी भरपूर स्वातंत्र्य घेऊन रचलेली शोकांतिका! संगीतकर होते मदनमोहन. त्यांनी सर्व गाणी महंमद रफीसाहेबांना दिली. कारण त्यावेळी किशोरकुमारच्या प्रभावामुळे हा गुणी कलावंत झाकोळला गेला होता. लैला-मजनूनंतर रफीसाहेब पुन्हा चमकू लागले. दुर्दैवाने हे पाहायला मदनमोहन हयात नव्हते. त्यांचा स्वर्गवास झाल्याने मग उरलेले संगीत दिग्दर्शन जयदेव यांनी सांभाळले. सिनेमातले ‘हुस्न हाजीर हैं मुहब्बतकी सजा पानेको, कोई पत्थरसे ना मारे मेरे दिवानेको’ हे मदनमोहन यांनी संगीत दिलेले गाणे त्यावर्षी ‘बिनाकाला’चे सरताज गीत ठरले!
प्रसंग असा होता-लैलाचे वडील धर्मगुरूकडे त्याची तक्रार करतात. त्याला गावातून हद्दपारीची शिक्षा होते. त्यानेही तो बधत नाही. त्याला मृत्यूदंड घोषित झाल्यावर मजनूला दगडमार करून ठार केले जाणार असल्याने त्यावेळी प्रियकराच्या वेदना असह्य होऊन लैला गावकऱ्यांना विनंती करते. तुम्ही याला शिक्षा देऊ नका. त्याच्याऐवजी मी तुमच्यासमोर हजर आहे. शिक्षाच द्यायची तर मलाच द्या.
“हुस्न हाज़िर है मुहब्बतकी सज़ा पानेको,
कोई पत्थरसे ना मारे मेरे दीवानेको.”
लैला कबिलेवाल्यांना कळवळून सांगते, ‘कैस शुद्धीत नाही. त्याला खरोखर काही समजत नाहीये. पण तुम्ही तर शुद्धीत आहात ना, मग कृपाकरून त्याची अगतिकता समजावून घ्या. तो दु:खात बुडाला आहे. किमान परमेश्वराचं तरी भय धरा. एखाद्या अगतिक माणसावर सूड उगवू नये, दया करावी असे धर्मशास्त्रातही सांगितले आहे ना? मग एका हतबल, शुद्ध हरपलेल्या माणसावर अत्याचार करायला तुम्ही सगळे का जमला आहात?
‘मेरे दीवानेको इतना न सताओ लोगों,
ये तो वहशी है, तुम्हीं होशमें
आओ लोगों.
बहुत रंजूर है ये, गमोंसे चूर है ये,
खुदाका ख़ौफ़ खाओ, बहुत
मजबूर है ये.
क्यो चले आये हो बेबसपे
सितम ढानेको,
कोई पत्थरसे न मारे…’
साहिरची लैला वेगळी आहे. तिचे प्रतिपादन तर्कशुद्ध आहे. ती म्हणते, ‘अहो, ही तर माझीच चूक म्हणावी लागेल ना. त्याच्या अपराधाचे कारण तर माझे सौंदर्य आहे. माझ्या सुंदरतेवर भाळून तो प्रेमात पडला. त्यातून त्याच्याकडून तुम्हाला जी चूक वाटते, अपराध वाटतो, तो घडला. पण खरे कारण मीच आहे. शिक्षा मला द्या. मला सुळावर द्या किंवा निखाऱ्यांवर ठेवून जाळून टाका. मी काहीही तक्रार करणार नाही. तुम्हाला हवी ती शिक्षा द्या पण ती मला द्या.
‘मेरे जलवोंकी खता है जो ये दीवाना हुआ
मैं हूँ मुजरिम ये अगर होशसे बेगाना हुआ
मुझे सूली चढ़ा दो, के शोलोंपे जला दो,
कोई शिकवा नहीं है, जो जी चाहे सजा दो’
बख्श दो इसको, मैं तैयार हूँ मिट जानेको
कोई पत्थरसे न मारे…’
शेवटी लैलाला लोकांच्या निष्ठुरपणाची खात्री होते. मग अगदी अगतिक होऊन बिचारी स्वत:चेच समाधान करून घेताना लोकांना म्हणते, ‘तुम्हाला कल्पना नसेल, आमचे सच्चे प्रेम तुम्ही फेकलेल्या दगडांना सुद्धा फुले मानेल. उचला ते दगड आणि फेका माझ्या अंगावर. तुम्ही तर धरतीवरचे ईश्वरच आहात ना! मग करा माझा न्याय. तुम्ही माझा संयम आणि निष्ठा बघा मी तुमचे पोथीनिष्ठ धर्माचरण बघते. पण लक्षात घ्या माझी प्रार्थना वर आकाशापर्यंत जाईल, ती त्या परमपित्याकडून ऐकली जाईल. तुम्हाला आली नाही तरी त्या दयाघनाला नक्की माझ्या प्रेमिकाची दया येईल. कृपाकरून त्याला ठार मारू नका.’
‘पत्थरोंको भी वफ़ा फूल बना सकती है,
ये तमाशा भी सर-ए-आम दिखा सकती है
लो अब पत्थर उठाओ, जमानेके खुदाओं,
तुम्हे मैं आजमाऊँ, मुझे तुम आजमाओ
अब दुआ अर्शपे जाती है असर लानेको,
कोई पत्थरसे न मारे…’
साहीरमधला स्वप्न पाहणारा, आदर्शवादी, बंडखोर आणि कमालीचा रोमँटिक कवी अद्वितीयच म्हणावा लागेल. त्याचे प्रत्येक गाणे ऐकताना एखादा वेगळा विचार मिळतो. म्हणून तर कधी कधी इतिहासाच्या जुन्या तिजोरीत या मनस्वी कवीने ठेवून दिलेल्या अशा झगमगत्या हिऱ्या-माणकांचे दर्शन घ्यायचे!