राशींच्या १२ तारकासमूहांप्रमाणे आणखी ३६ तारकासमूह पृथ्वीवरील प्राचीन ज्योतिर्विदांनी शोधले होते. अशा एकूण ४८ तारकासमूहांना प्राचीन तारकासमूह म्हणतात, तर त्यानंतर शोधलेल्या तारकासमूहांना आधुनिक तारकासमूह म्हणून ओळखतात.
कथा – प्रा. देवबा पाटील
आज यशश्री परीताईची खूपच उत्सुकतेने प्रतीक्षा करत होती. तिला आज परीताईला तारकासमूहाची माहिती विचारायची होती. परीताई आल्यानंतर तिने परीताईला चहाऐवजी कॉफी दिली. कॉफी पिऊन झाल्यावर, तिने आपली प्रश्नावली सुरू केली.
“परीताई, मग आकाशात तारकापुंज कसे असतात?” यशश्रीने प्रश्न केला. परी म्हणाली, “रात्री आकाशात
ताऱ्यांचे जे अनेक वेगवेगळे गट किंवा समूह दिसतात, त्यांना तारकापुंज म्हणतात. हे तारकापुंज एकमेकांपासून लाखो मैल दूर असतात; पण प्रत्यक्षात त्यांची रचना एका विशिष्ट आकाराची असते. आकाशात ध्रुवमत्स्य, सप्तर्षी, त्रिशंकू, मृगनक्षत्र, शर्मिष्ठा असे अनेक तारकापुंज आहेत.”
“काही तारकासमूहांना तारकागुच्छ का म्हणतात परीताई?” यशश्रीने विचारले.
“आकाशगंगेत ताऱ्यांचे प्रमाण सर्वत्र सारखे नाही. केंद्रामध्ये ते घनदाट आहेत, तर काही ठिकाणी खूप विरळ आहे. तसेच आकाशगंगेत काही ठिकाणे अशी आहेत की, त्या ठिकाणी असंख्य तारे अगदी लहान जागेत दाटीवाटीने एकवटलेले दिसतात. अशा लहान जागेत एकवटलेल्या ताऱ्यांच्या समूहांना तारकागुच्छ म्हणतात,” परीने सांगितले.
“राशी म्हणजे काय असतात?” यशश्रीने शंका उकरली.
“सूर्य हा स्थिर असून पृथ्वी त्याभोवती फिरते; परंतु आपणास सूर्य फिरताना दिसतो. सूर्याच्या मार्गक्रमणाच्या भासमान मार्गाला क्रांतिवृत्त असे म्हणतात. या क्रांतिवृत्ताचे आरंभस्थानापासून शेवटपर्यंत बारा भाग कल्पिलेले आहेत. या प्रत्येक भागास राशी असे म्हणतात. आकाशातील या बारा भागांच्या ठिकाणी काही ठरावीक १२ तारकासमूह विशिष्ट ऋतूत त्या विशिष्ट ठिकाणीच दिसतात. त्यांचे आकारही ठरावीकच असतात व ते लाखो वर्षांपासून न बदलता तसेच दिसतात. त्यांच्या आकारावरून त्यांना तुमच्या पृथ्वीवरील त्या काळातील खगोल निरीक्षकांनी व ज्योतिर्विदांनी वेगवेगळी विशिष्ट अशी नावे दिली आहेत. त्यांनाच राशी म्हणतात. मेष (मेंढा), वृषभ (बैल), मिथुन (स्त्री-पुरुष), कर्क (खेकडा), सिंह, कन्या, तुळा (तराजू), वृश्चिक (विंचू), धनू (धनुष्य), मकर (मगर), कुंभ (कलश) व मीन (मासा) अशी त्यांची त्यांच्या आकारानुसार नावे आहेत. एका वर्षात सूर्य या १२ राशींतून जातो म्हणजे सूर्याची १२ संक्रमणे होतात. त्यापैकी पौषातले मकर संक्रमण हे उत्तरायणाचा व आषाढातील कर्क संक्रमण हे दक्षिणायनाचा आरंभ करतात” परीने उत्तर दिले.
“प्राचीन तारकासमूह व आधुनिक तारकासमूह म्हणजे काय आहेत?” यशश्रीने माहिती विचारली.
“राशींच्या १२ तारकासमूहांप्रमाणे आणखी ३६ तारकासमूह तुमच्या पृथ्वीवरील प्राचीन ज्योतिर्विदांनी शोधले होते. अशा एकूण ४८ तारकासमूहांना प्राचीन तारकासमूह म्हणतात, तर त्यानंतर शोधलेल्या तारकासमूहांना आधुनिक तारकासमूह म्हणून ओळखतात. आतापर्यंत एकूण ८८ तारकासमूह खगोल शास्त्रज्ञांना दिसले आहेत. पृथ्वी सतत सूर्याभोवती फिरत असल्याने, हे सारे तारकासमूह पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणाहून दिसत नाहीत. काही उत्तर गोलार्धातून दिसतात, तर काही दक्षिण गोलार्धातून दिसतात. काही फक्त हिवाळ्यात दिसतात, तर काही केवळ उन्हाळ्यातच दिसतात. मात्र ध्रुव ताऱ्याभोवती फिरणारे तारकासमूह वर्षभर दिसू शकतात,” परीने खुलासा केला.
“आकाशात नक्षत्रं कसं असतात गं ताई? यशश्रीचा प्रश्न.
“आकाशातील भासमान स्थिर तारकांच्या गटास नक्षत्र असे म्हणतात. या नक्षत्रांचे काही विशिष्ट असे निश्चितसे आकार बनलेले असतात. हजारो वर्षांत तरी त्यांचे आकार बदललेले नाहीत. म्हणून त्यांना नक्षत्रे म्हणजे “न क्षरति इति” असे म्हणतात. हजारो वर्षांपूर्वीच्या खगोल निरीक्षकांनी त्यावेळी या नक्षत्रांचे जसे आकार काढून ठेवले होते, ते तसेच्या तसेच आजतागायत कायम आहेत. म्हणून आपणास आकाशाचे चित्र कायम न बदलणारे दिसते. एकूण २७ नक्षत्रे आहेत,” परीने स्पष्ट केले.
“आकाशात ध्रुवमत्स्य म्हणजे काय असते?” यशश्रीने विचारले.
परी म्हणाली, “आकाशातील काही तारकासमूहांना विशिष्ट अशी नावे दिली आहेत. त्यांपैकी सात ताऱ्यांच्या एका गटाला ध्रुवमत्स्य असे नाव आहे. त्यातील सात ताऱ्यांपैकी समोरचे चार तारे पतंगाच्या आकारात आहेत, तर त्यामागचे तीन तारे पतंगाच्या शेपटीप्रमाणे दिसतात. त्याच्या शेपटीतील सर्वात शेवटचा तारा म्हणजे ध्रुव होय. हा ध्रुवमत्स्य ध्रुवाभोवती सारखा फिरत असतो. अशी त्यांची चर्चा मस्त रंगात आली असताना, परीला काही तरी गुप्त संदेश प्राप्त झाला व ती यशश्रीची रजा घेऊन, आपल्या ग्रहाकडे निघाली.