छत्रपती शाहू महाराज हे काळाला वेगळे वळण देणाऱ्या आणि इतिहास घडवणाऱ्या अशा मोजक्या संस्थानिकांपैकी एक नाव आहे. राज्याला प्रतिगामी विचारांच्या दलदलीतून बाहेर काढत, पुरोगामी विचारांच्या मुशीत तयार करण्याचे काम करणाऱ्या या राजाचे स्मरण आजही अनेकांमध्ये काही तरी नवे, समाजाभिमुख करण्याची प्रेरणा देऊन जाते.
विशेष – सायली शिगवण
महाराष्ट्राला पुरोगामी विचारांच्या मुशीत घडवणाऱ्या अनेक थोर नावांमध्ये छत्रपती शाहू महाराजांचे नाव अग्रणी आहे. आजही हे राज्य छ. शाहूंच्या विचारांचा आदर्श ठेवत पुढे जात आहे. छत्रपती शाहू महाराजांनी एका वर्गाचा एकछत्री अंमल संपवून सर्व वर्गाला शिकवण्याची, संस्कारित होण्याची संधी देऊ केली. सर्वांसाठी शिक्षणाची कवाडे उघडल्यामुळे, नानाविध ज्ञानदालने खुली झाली. जयंतीनिमित्त त्यांचे हे पुण्यस्मरण…
छत्रपती राजर्षी शाहू महाराज (शाहू महाराज) यांचे नाव अतिशय आदराने महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यांत दुमदुमत असते. राज्याला प्रतिगामी विचारांच्या दलदलीतून बाहेर काढत, पुरोगामी विचारांच्या मुशीत तयार करण्याचे काम करणाऱ्या या राजाचे स्मरण आजही अनेकांमध्ये काही तरी नवे, समाजाभिमुख करण्याची प्रेरणा देऊन जाते. म्हणूनच जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विलक्षण कामाचा धांडोळा घेणे उचित ठरेल.
छत्रपती शाहू महाराज हे काळाला वेगळे वळण देणाऱ्या आणि इतिहास घडवणाऱ्या अशा मोजक्या संस्थानिकांपैकी नाव आहे. ज्यांनी सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांसाठी अस्पृश्यांच्या चळवळीचे क्षितीज विस्तृत करण्याचा खरोखर प्रयत्न केला. केवळ त्याचा प्रचार करून थांबले नाहीत, तर त्यांनी महाराष्ट्रात आणि त्या पलीकडेही काही शाश्वत आणि दीर्घकालीन बदल घडवून आणले. २६ जून १८७४ रोजी यशवंत घाटगे म्हणून त्यांचा जन्म झाला. १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूरच्या महाराणी आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक घेतले आणि ‘शाहू’ असे नाव दिले. शाहू २ एप्रिल १८९४ रोजी कोल्हापूरच्या गादीवर आरूढ झाले. ही जबाबदारी स्वीकारताच, ब्राह्मण कर्मचाऱ्यांकडून राज्याचा कारभार अत्यंत निकृष्ट पद्धतीने चालवला जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. राज्यातील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्व सत्ता पदांवर हा वर्गच विराजमान झाला होता. त्यामुळेच ही मक्तेदारी संपवण्यास, शाहू महाराजांनी प्राधान्य दिले. शास्त्र आणि ज्ञानावर मक्तेदारी असल्यामुळे सर्व ब्राह्मणांमध्ये साक्षरता आणि शिक्षण चांगले पसरले होते.
याच बळावर पेशव्यांच्या काळापासून त्यांनी प्रशासनात आपले स्थान मजबूत केले होते. स्वाभाविकच ब्राह्मणेतरांचे शिक्षण आणि परिणामी प्रशासनात कमी प्रतिनिधित्व होते. खरे पाहायचे तर ते केवळ रक्षक किंवा संदेशवाहक म्हणून खालच्या पदांपुरते मर्यादित होते. हे लक्षात घेता ब्राह्मणेतर लोकांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता पसरवणे, हाच एकमेव उपाय असल्याचे राजांनी ओळखले. यामार्गेच ब्राह्मणेतर समाज राज्याच्या सेवा आणि कारभारात शिक्षण आणि रोजगार मिळवू शकणार होता. त्यामुळे आपल्या या विचाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी, त्यांनी वैयक्तिकरीत्या राज्यव्यापी दौरे सुरू केले.
हे काम सुकर व्हावे आणि जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळावा या हेतूने शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली. त्यांच्यासाठी ठिकठिकाणी वसतिगृहे बांधली आणि राज्याच्या निधीतून त्यास पाठबळ देऊ केले. १९०१-०४ मध्ये त्यांनी जैन वसतिगृह बांधले, १९०६ मध्ये मुस्लीम वसतिगृह, १९०८ मध्ये अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क वसतिगृह, १९१७ मध्ये लिंगायत समाजासाठी वीरशैव वसतिगृह, तर १९२१ मध्ये संत नामदेव वसतिगृह इत्यादींच्या माध्यमातून त्यांनी सर्व ब्राह्मणेतर समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याचा मार्ग प्रशस्त केला. अर्थातच यासाठी नियमित अनुदान दिले जाऊ लागले. १८ एप्रिल १९०१ रोजी त्यांनी ‘मराठा स्टुडंट्स इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली आणि शाळेच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी यथायोग्य निधीही उपलब्ध करून दिला.
कोल्हापूर व्यतिरिक्त त्यांनी ब्रिटिश प्रदेशातही वसतिगृहे आणि शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. अस्पृश्य आणि शूद्रांच्या शिक्षणाबाबत ते अत्यंत आग्रही होते. शिक्षणानंतर पात्रतेनुसार आपल्या राज्याच्या सेवांमध्ये महत्त्वाच्या पदांवर त्यांनी या वर्गाची नियुक्ती केली. महाराजांनी ब्राह्मणेतर समाजातील योग्य विद्यार्थ्यांना आपल्या दरबारात कायद्याचा अभ्यास करण्यासाठी सनद दिली. अशा सक्रिय दृष्टिकोनामुळे अस्पृश्य आणि इतर शूद्र समुदायांमध्ये आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली आणि या समुदायांना नवी उभारी मिळाली. अशाप्रकारे ब्राह्मणांची प्रशासनावरील मक्तेदारी कमी झाल्यामुळे, हा वर्ग आपल्या हाती असलेल्या वर्तमानपत्रांमधून महाराजांविरोधात मोहीम राबवू लागला. महाराजांच्या सर्व कल्याणकारी कामांचा चुकीचा अर्थ कुप्रसिद्ध करण्याचा धडाकाच सुरू झाला; पण शाहू महाराजांनी वर्तमानपत्रांमधील अशा टीकेकडे फारसे लक्ष न देता, प्रजेच्या शिक्षणासाठी सकारात्मक विवेकाचे कार्य सुरू ठेवले.
अर्थात हे सगळे करत असताना, त्यांनी कोणत्याही ब्राह्मणाला दुखावले नाही वा त्यांच्या कोणत्याही धार्मिक विधीकडे दुर्लक्षही केले नाही. उलट ते सर्वात धार्मिक हिंदू होते. त्यांनी सामान्य माणसाप्रमाणे सर्व विधी आणि चालिरीती पाळल्या. या राज्याने कधीही जमिनीशी असणारी आपली नाळ तुटू दिली नाही. त्यांनी कधीच आपल्या शाही स्थितीचा अहंगंड बाळगला नाही. मात्र त्यांच्या वृत्ती आणि प्रवृत्तीतील याच नम्रतेला ब्राह्मणांनी त्यांचा दुबळेपणा समजण्याची चूक केली आणि त्यांनी अप्रत्यक्षपणे राज्याचा महाराजा म्हणून त्यांचे स्थान डळमळीत करण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारे ब्राह्मणांनी मर्यादा ओलांडल्या, तेव्हा मात्र त्यांना धडा शिकवण्याची संधी महाराजांनी सोडली नाही. ही घटना महाराष्ट्रात ‘वेदोक्त वाद’ म्हणून गाजली.
शाहू महाराजांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात राजघराण्यातील ब्राह्मण पूजाऱ्याने शाहू महाराजांसाठी ‘वेदोक्त’ म्हणण्यास नकार दिला होता. वेदोक्त ही एक प्रथा असून, यामध्ये पुजारी पूजा करताना, वेद मंत्रांचा उच्चार करतात. १९०० मध्ये कार्तिक एकादशीच्या शुभ मुहूर्तावर शाहू महाराज कुटुंबासह पंचगंगा नदीत स्नानासाठी गेले होते. परंपरेप्रमाणे सूर्योदयापूर्वी ते पोहोचले होते. राजघराण्याच्या पूजाऱ्यांनी महाराजांच्या आधीच तिथे पोहोचून, मंत्रांचा जप करण्यास सुरुवात करणे अपेक्षित होते; पण पूजारी उशिरा आले आणि तिथेच उभे राहिले. शाहू महाराजांना ब्राह्मण पूजाऱ्याच्या या उद्दामपणाचा राग आला. पण त्यांनी नम्रपणे त्यांना कर्तव्याची आठवण करून दिली. मात्र ब्राह्मण पूजाऱ्याने उत्तर दिले, ‘महाराज, तुम्ही राजा असूनही शूद्र जातीचे आहात. त्यामुळे तुम्हाला वैदिक स्तोत्र ऐकण्याचा अधिकार नाही. तुम्ही फक्त पौराणिक भजन ऐकू शकता, जी मी आंघोळ न करताही गाऊ शकतो. स्नान न करता, पौराणिक स्तोत्रांचे पठण करण्यास शास्त्रात परवानगी आहे.’ वर ब्राह्मण पूजाऱ्याने इथे थंडी आहे, असे सांगून मंत्रोच्चाराच्या आधी आपल्या आंघोळ न करण्याचे समर्थनही केले. हा अपमान ऐकून महाराजांचे रक्षक आणि कुटुंबीय अतिशय संतप्त झाले. रक्षकांनी ब्राह्मण पूजाऱ्याला मारण्याचा निर्णय घेतला; पण महाराजांनी त्यांना शांत केले आणि कोणतेही वैदिक विधी न करता आपले पवित्र नदीस्नान पूर्ण करून, ते राजवाड्यात परतले.
इतके सगळे झाल्यानंतरही पुरोहिताची घमेंड उतरली नव्हती. त्याने सर्व कौटुंबिक विधींमध्ये वेदांचे उच्चारण करणे बंद केले. शाहू महाराजांच्या प्रत्येक विधीत केवळ पौराणिक स्तोत्रांचेच पठण करण्याचा त्यांचा आग्रह होता. पुरोहिताच्या वृत्तीतील हा अचानक झालेला बदल शाहू महाराजांना सतावत होता. ही स्पष्टपणे राज्यकर्त्याची अवज्ञा होते. म्हणूनच या पूजाऱ्याला राजघराण्यातील पूजारीपदावरून हटवून, त्यांच्या जागी दुसरा योग्य पुरोहित नेमण्याशिवाय शाहू महाराजांपुढे पर्याय उरला नव्हता. मग त्यांनी नारायण भट्ट सेवेकरी नावाचा दुसरा पूजारी नेमला. या कृतीद्वारे राजाने ब्राह्मणी वर्चस्वाच्या विरोधात बंड केले होते.
बरखास्त केलेल्या पूजाऱ्याने कोल्हापुरातील ब्राह्मणांची मक्तेदारी असणाऱ्या धार्मिक हिंदू संस्थेकडे तक्रार केली. त्यांनी जगद्गुरू शंकराचार्यांना आवाहन करून, शाहू महाराजांनी बरखास्त केलेल्या पूजाऱ्याची पुनर्नियुक्ती करावी आणि शूद्र असल्याने वेदांचा अधिकार नसलेल्या राजाने केवळ पौराणिक स्तोत्रे ऐकावीत, असे आदेश देण्यास सुचवले. कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील इतर भागांतील मुख्य प्रवाहातील सर्व वर्तमानपत्रे बडतर्फ पूजाऱ्याच्या बाजूने आक्रमकपणे उभी राहिली. शाहू महाराजांनी मात्र हा लढा हिमतीने लढवला आणि तार्किकाला नेला. छत्रपती शाहू महाराजांचे अतिशय नम्र आणि क्रियाशील, परिवर्तनवादी, ध्येयनिष्ठ आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व नजरेत भरते. अशा या क्रांतिकारक राजाचे स्मरण करत, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करू या. नवविचारांची कास धरत, त्यांची जयंती साजरी करू या.
(अद्वैत फीचर्स)