अपघातानंतर स्थानिकांनी पुतण्यावर केलेले आरोप दिलीप मोहिते पाटलांनी फेटाळले
पुणे : पुण्यातील पोर्शे अपघातामुळे (Pune Porsche Accident) राज्यभराचं वातावरण अजूनही तापलेलं आहे. यामध्ये मद्यधुंद अवस्थेत कार चालवून दोघांना चिरडणाऱ्या धनिकपुत्राला वाचवण्यासाठी अख्खी यंत्रणाच कशी कामाला लागली आहे, याची उदाहरणे वारंवार समोर येत असतात. त्यातच आता पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांच्या पुतण्या मयूर मोहिते पाटील (Mayur Mohite Patil) याच्याकडून अपघात झाला आहे. त्याने बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना गाडीखाली चिरडले. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. यामध्ये गाडी चालवणाऱ्या तरुणाने मद्यप्राशन केलं होतं, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. मात्र, स्वतः आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
अपघातानंतर मयूर मोहिते पाटील गाडीतच बसून राहिला, तो गाडीबाहेर आलाच नाही, असं स्थानिकांनी सांगितलं आहे. या सर्व चर्चांवर दिलीप मोहिते पाटलांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, “अपघातानंतर माझा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते हा कुठेही पळून गेला नाही. शिवाय त्याने मद्यपानही केलेलं नव्हतं. माझा पुतण्या नारायणगाव मार्गे कळंबवरुन खेडकडे येत होता. अपघात का झाला? कुठे झाला? त्यावेळी अंधार होता, त्यामुळे कसा झाला? याबाबत कुणालाच काहीच कल्पना नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. पोलीस सगळ्या प्रकारची चौकशी करत आहेत. झालेली गोष्ट १०० टक्के चुकीची आहे. मी मृत तरुणाच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. मी वातावरण शांत झालं की, स्वतः कुटुंबाची भेट घेणार आहे. मी कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही, करणार नाही.”
माझा पुतण्या दारू पित नाही
“माझा पुतण्या आयुष्यात कधीही दारू प्यायलेला नाही, तो दारू पित नाही. तो इंजिनिअर आहे, तो उद्योजकदेखील आहे. त्यामुळे असले प्रकार त्याने त्याच्या आयुष्यात केलेले नाहीत.”, असं मोहिते पाटील म्हणाले आहेत. “तसेच अपघात झाला त्या ठिकाणी कुणीच नव्हतं. त्यामुळे प्रथमदर्शनी चूक नेमकी कुणाची? हे अजून पोलिसांनी मला सांगितलेलं नाही. पोलीस ज्यावेळी माहिती देतील, त्यावेळी मी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेन”, असं मोहिते पाटील म्हणाले.
माझा पुतण्या अद्याप पोलिसांच्या ताब्यात, तो पळून गेलेला नाही
स्थानिकांच्या आरोपांवर उत्तर देताना दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, “माझा पुतण्या अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस अजूनही चौकशी करतील. पोलिसांनी माझ्या पुतण्याचे वैद्यकीय तपासणीसाठी सॅम्पल्स घेतलेले आहेत. अपघातग्रस्त तरुणाला माझ्या पुतण्याने अॅम्बुलन्समध्ये टाकलं आहे. त्यामुळे इतर आरोपांत मला तथ्य वाटत नाही. पण मी अपघातस्थळी नव्हतो. त्यामुळे या सर्व घडामोडींची मी नक्कीच शहानिशा करीन.”