नारळाच्या करवंटीतून कोटी रुपये कमावणारी केरळची कन्या

Share

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे

आपल्या कोकणात नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. कारण नारळाच्या शेंड्यापासून ते मुळापर्यंत या झाडाच्या प्रत्येक भागाचा सदुपयोग होतो. या सदुपयोगाचा खरा लाभ तिने घेतला. मुंबईतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून तिने व्यवसाय निवडला, तो वाढवला. आज नारळाचा हा व्यवसाय काही कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. ही गोष्ट आहे थेंगा कंपनीच्या मारिया कुरियाकोसेची.

केरळमधील पलक्कड येथे मारिया कुरियाकोसेचा जन्म झाला. केरळमध्ये जन्मलेली आणि वाढलेली मारिया शालेय शिक्षणानंतर मुंबईत आली आणि सेंट झेवियर्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी मिळवली. तिने शिष्यवृत्तीवर स्पेनमधील आईसीएडीई स्कूल ऑफ बिझनेस अॅण्ड इकॉनॉमिक्समधून एमबीए केले. त्यानंतर ती मुंबईतील एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करू लागली. २०१८ मध्ये एओन येथील तिच्या कॉर्पोरेट नोकरीला तिने अलविदा केले आणि मुंबईतील मैना महिला फाऊंडेशनमध्ये सामील झाली. ही संस्था महिलांच्या समस्या आणि मासिक पाळी संदर्भात कार्य करते. मुंबईतील एऑन कन्सल्टिंगमध्ये विश्लेषक म्हणून चांगली नोकरी असूनही, मारियाला केरळमध्ये स्वतःचे काम करण्याची नेहमीच उत्सुकता असायची. शालेय दिवसांपासून नेहमीच उद्योजक होण्याचे स्वप्न ती पाहत असे. सामाजिक उद्योजकता समजून घेणे हा तिच्या कामाचा एक भाग होता. सामाजिक संस्थेतील तिच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात तिच्या स्वतःच्या व्यवसायाची ब्लू प्रिंट आकार घेऊ लागली.

मारिया नेहमी स्वयंपाकघरातील वापरासाठी टिकाऊ पर्याय शोधत असे. नैसर्गिक उत्पादनांनी तिला नेहमीच भुरळ घातली. सुरुवातीला ऑइल मिल्समधून वारंवार टाकून दिलेले नारळाचे पाणी वापरण्याचा विचार केला. पण प्रक्रिया उपकरणासाठी २ कोटींची गुंतवणूक करण्यास ती असमर्थ होती. स्वत:चे लक्ष दुसरीकडे वळवत तिने फ्लॉवर पॉट्स तयार करण्यासाठी नारळाच्या फायबरचा प्रयोग केला आणि मुंबईच्या नर्सरीमध्ये विकण्याचा प्रयत्न केला. तथापि तिला लवकरच कळले की नर्सरी पोल्लाची, तामिळनाडू येथून स्वस्त दरात यासारखे उत्पादने मिळवत आहेत. नारळाच्या शेंड्यापासून बनवलेल्या उत्पादनांची मागणी लक्षात घेऊन या व्यवसायात उतरण्याचे तिने निश्चित केले.

फेब्रुवारी २०२० मध्ये मारियाने थेंगा कंपनी सुरू केली. एक महिला कर्मचारी आणि नारळाच्या करवंटीपासून बनवलेले सलाड बाऊल हे एक उत्पादन यांच्यासह तिने सुरुवात केली. सुरुवातीच्या दिवसांमध्ये, मारियाने तिच्या घरात नारळाच्या करवंटांची भांडी बनवण्याचे काम हाती घेतले. यामध्ये मारियाला तिची आई, जॉली कुरियाकोस यांनी करवंट्या गोळा करण्यात मदत केली आणि तिचे वडील वरू कुरियाकोसे जे टेक महिंद्राचे माजी अभियंता होते त्यांनी पाठिंबा दिला. मारियाने पहिले १५० किचन बाऊल, सॅलड बाऊलसारखे बनवले आणि ते प्रत्येकी ६० रुपयांना स्थानिक जत्रेत आणि मित्रांना विकले. त्यातून ९००० रुपये उत्पन्न मिळाले. तिने हे पैसे परत तिच्या व्यवसायात लावले. ड्रिलिंग मशीन १,५०० रु.ला विकत घेतली. वडिलांच्या मदतीने सँडिंग मशीनमध्ये बदल केले. एकूणच, स्टार्ट अप करण्यासाठी मारियाने रु. ४,००० पेक्षा जास्त खर्च केला नाही. प्रति वर्ष ८ लाख रुपयांची नोकरी सोडणाऱ्या मारियावर सगळेच टीका करायचे. अनेकांनी मारियाला नोकरी सोडण्याऐवजी एक छंद म्हणून व्यवसाय हाताळण्यास सांगितले; परंतु मारियाच्या पालकांनी तिच्या निर्णयाला खूप पाठिंबा दिला. चहाचे कप, साबण डिशेस, लाडू, मसाला होल्डर आणि चमचे यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू आहेत. वाटी, मेणबत्ती होल्डर, बेस्पोक शॉट ग्लासेस, तसेच घर आणि दिया सेट आणि प्लांट हँगर्स यासारख्या बागेचे सामान अशी अनेक उत्पादने मारिया तयार करायची.

ही उत्पादने बनवणे सोपे वाटू शकते कारण शेवटी त्या “नारळाच्या करवंट्या” आहेत. मात्र मारियासाठी हा प्रवास खडतर होता. जेव्हा थेंगाला ३०० मिली कपसाठी ऑर्डर मिळते, तेव्हा मागवलेल्या सर्व करवंट्या एकाच आकाराच्या नसतात हे लक्षात घेऊन समान आकाराच्या करवंट्या मिळणे आवश्यक होते. कधी कधी नारळाच्या करवंटाच्या ट्रकमधून वापरता येण्याजोगे १०० करवंट्या मिळतात. मारिया हिने कारागीर जिथून आले त्या प्रदेशातील तेल गिरण्या ओळखण्याचे ठरवले. मारियाने या गिरण्यांशी संबंध जोडला आणि विविध आकारांच्या करवंट्या मिळवल्या.

नारळाच्या करवंट्याची ही उत्पादने बनवण्यासाठी कारागीर शोधत असताना, मारियाला बहुतेक ते लोक भेटले ज्यांनी ग्रामीण ग्राहकांसाठी अर्धवेळ ही उत्पादने बनवली कारण ते उपजीविकेसाठी बांधकाम साइट्सवर काम करायचे. त्यांच्यासोबत भागीदारी करून आणि त्यांना काम देऊन, मारिया आता या कारागिरांसाठी एक स्थिर उदरनिर्वाहाचा पर्याय देत आहे. हे कारागीर केरळमध्ये पलक्कड, त्रिशूर, अलापुझा, कोझिकोड आणि वायनाड सारख्या ठिकाणी राहतात. अशा प्रकारे काम करताना लेबल लावण्यापासून ते पॅकेजिंगपर्यंत पाठवण्यापर्यंतचे काम करण्यासाठी तिने एका महिलेला कामावर ठेवण्याचा निर्णय घेतला. कोविड-१९ दरम्यान तिने तिचा व्यवसाय ऑनलाइन केला. ऑनलाइन मार्केटिंगमध्ये प्रवेश केला तेव्हाच थेंगा ब्रँडला ओळख मिळाली. कोरोना काळात मारियाच्या उत्पादनांना ओळख मिळण्यास मदत झाली. कंपनीच्या वेबसाइट आणि इंस्टाग्राम पेज व्यतिरिक्त, उत्पादने आता Amazon, Jio Mart आणि Flipkart सारख्या पारंपरिक ई-कॉमर्स साइटवर देखील उपलब्ध आहेत. मारियाच्या थेंगामध्ये २० कारागीर आहेत, तर ११ जणांची महिलांची ऑपरेशन्स टीम वेबसाइटपासून ग्राहक सेवा, विपणन, सोशल मीडिया आणि फायनान्सपर्यंत सर्वकाही व्यवस्थापित करतात. थेंगाने पहिल्या वर्षी २० लाख, पुढील वर्षात ५० लाख आणि काही कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.

ती आता पलक्कड येथे दागिन्यांचा व्यवसाय असलेले पती सचिन आणि तिच्या एक वर्षाच्या मुलासोबत राहते. “माझ्या उत्पादनाचा प्रत्येक भाग इको-फ्रेंडली आहे. वाट्या पॉलिश करण्यासाठी मी पारंपरिक पेंट आणि वार्निशऐवजी खोबरेल तेल वापरले आहे. नारळाची करवंटी हे प्लास्टिक आणि मेटल कुकवेअरसाठी एक टिकाऊ पर्याय आहे कारण ते १०० % बायोडिग्रेडेबल आहे,” मारिया म्हणते.तिचे बहुसंख्य ग्राहक केरळच्या बाहेरचे आहेत, विशेषत: बंगळूरु, दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरांतून आहेत जेथे पर्यावरणपूरक उत्पादनांबद्दल अधिक जागरूकता आहे, असे ती म्हणते. मारिया तिची उत्पादने युरोप आणि अमेरिकेत निर्यात करते. वार्षिक कमाईच्या ६०% निर्यातीचा समावेश होतो. तिच्या उत्पादनांची वाजवी किंमत आहे. चमचा, काटा आणि चाकूच्या कटलरी सेटसाठी ३०० रु.पासून सुरू होते. समाजातील सर्व घटकांसाठी ते परवडणारे आहे. ती लवकरच खेळणी आणि ज्वेलरी क्षेत्रात उतरण्याची योजना आखत आहे. एप्रिलमध्ये कोवलम येथे झालेल्या G20 एम्पॉवरच्या बैठकीत मारियाच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळाली.
घरात नेहमी वापरल्या जाणाऱ्या एका वस्तूचा वापर करून एक तरुणी कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा व्यवसाय अवघ्या चार वर्षांत उभारते हे विलक्षण आहे. हे सर्वार्थाने लेडी बॉसचंच लक्षण आहे.
theladybosspower@gmail.com

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

3 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

3 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

4 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

4 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

4 hours ago