राजरंग – राज चिंचणकर
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेसाठी १४ जून हा दिवस महत्त्वाचा असतो. नाट्याचार्य गो. ब. देवल यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून, नाट्य परिषद दरवर्षी रंगकर्मींना पुरस्कार देऊन, या दिवशी सन्मानित करत असते. यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात हा सोहळा रंगत असतो. गेल्या वर्षी नाट्य परिषदेच्या नवीन कार्यकारिणीने कार्यभार हाती घेतल्यानंतर, बराच काळ बंद असलेले यशवंत नाट्यमंदिर सुरू करून दाखवू, असे सांगत १४ जूनच्या आधी नाट्य परिषदेने ते खुले करून दाखवलेच. यंदाही यशवंत नाट्यमंदिराचे नूतनीकरण सुरू असल्याने, १४ जूनला हे नाट्यगृह पुरस्कार सोहळ्यासाठी उपलब्ध होणार की नाही, अशी चर्चा होती; परंतु नाट्य परिषदेने यंदाही ते करून दाखवले आणि मोठ्या दिमाखात १४ जूनचा सोहळा यशवंत नाट्यमंदिरात पार पडला. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन या सोहळ्यात त्यांचा उचित सन्मान करण्यात आला.
अशोक सराफ व रोहिणी हट्टंगडी या दोन ज्येष्ठ रंगकर्मींचे कौतुक करताना; तसेच नाट्य परिषदेच्या कार्याचा आढावा घेताना नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले म्हणाले, “ही दोन व्यक्तिमत्त्वे अशी आहेत की, त्यांना अतिशय वाईट स्क्रिप्ट दिली, तरी ते उत्तम काम करू शकतात. अनेक वर्षे सातत्याने ते काम करत आहेत. अशा या दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना जीवनगौरव पुरस्कार देण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलासाठी शासनाने दिलेल्या प्रत्येक पैशाचा विनियोग करून हे नाट्यगृह उभे करत, आम्ही उत्तम काम करून दाखवले आहे. महाराष्ट्रातली तमाम नाट्यगृहे नाट्य परिषदेच्या हातात दिली; तर ती आम्ही अशीच उत्तम प्रकारे उभी करून दाखवू.” आता प्रशांत दामले आणि त्यांच्या टीमच्या उत्साहाला किती पाठिंबा मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरवर्षी १४ जूनला यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात हा पुरस्कार सोहळा दिमाखात साजरा होत असतो; तसा तो यंदाही झाला. परंतु त्याचबरोबर वर्षानुवर्षे या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्यांना नाट्यसंकुलात आल्यावर, ‘त्या १४ जूनची’ आठवण हटकून येते. यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात प्रायोगिक नाट्यगृह व्हावे, यासाठी काही वर्षांपूर्वी नाट्यसृष्टीतल्या अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ रंगकर्मींनी भर पावसात नाट्यसंकुलाच्या प्रांगणात त्यासाठीची मागणी लावून धरली होती. आता नाट्यसंकुलातल्या तालीम हॉलच्या जागेत त्यासदृश जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण दरवर्षी १४ जूनला या नाट्यसंकुलात पाऊल ठेवल्यावर ‘ती आठवण’ मात्र ताजी झाल्याशिवाय राहत नाही.
मानसी सांगत्येय, ऐका…
मराठी मालिकांच्या विश्वात नवनवीन कलाकृती सातत्याने निर्माण होत असतात. आता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका सुरू झाली आहे. समीर परांजपे व शिवानी सुर्वे यांच्यासह मानसी कुलकर्णी हिची यात हटके भूमिका आहे. सध्या मानसी रंगभूमीवरही सक्रिय आहे. अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या जीवनावर आधारित ‘सांगत्ये ऐका’ हे नाट्य ती सध्या रंगभूमीवर साकारत आहे. त्यासोबतच ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेत ती वेगळ्या प्रकारची भूमिका रंगवत आहे.
मानसीच्या या दोन्ही भूमिकांमध्ये कुठल्या प्रकारचे नाते आहे का; यासंबंधी तिच्याशी संवाद साधला असता ती म्हणते, “हंसाबाई वाडकर यांची जीवनकहाणी असलेले ‘सांगत्ये ऐका’ हे नाटक मी करत आहे. हंसाबाई त्यांच्या आयुष्यात खूप आव्हानांना सामोऱ्या गेल्या आहेत आणि अतिशय भीषण परिस्थिती त्यांनी अनुभवली आहे. परंतु त्यांनी कधी आयुष्य वाऱ्यावर सोडून दिले नाही. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेतल्या गायत्रीचेही तसेच आहे. तिला जे हवे आहे, ते मिळवण्याचा तिचा हट्ट आहे. ती आयुष्य ‘गिव्ह अप’ करणारी नाही आणि हाच या दोघींमधला सामायिक दुवा असावा, असे मला वाटते”.
या मालिकेतले पात्र आणि वास्तवातली मानसी यांचे नाते स्पष्ट करताना ती म्हणते, “व्यक्तिगत आयुष्यात मी जशी आहे, त्याच्यापेक्षा मालिकेतले हे पात्र अतिशय वेगळे आहे. अशी व्यक्ती मी माझ्या आजूबाजूला कधीच बघितलेली नाही; त्यामुळे हे पात्र उभे करणे म्हणजे एक प्रकारचा टास्क होता. या पात्रासाठी कुठल्याही प्रकारचे रॉ मटेरियल माझ्याकडे नव्हते. आपल्या आजूबाजूला एक्स्ट्रीम मानसिकतेची माणसे असतात. पण आपला त्यावर विश्वास बसत नाही. कारण ती आपल्याला दिसलेली नसतात; पण अशी माणसे असतात. मग हे लोक कसे वागत असतील, त्यांची देहबोली कशी असेल, त्यांची वागण्या-बोलण्याची पद्धत कशी असेल; याचा अभ्यास करून, मी माझ्या डोळ्यांसमोर एक ‘गायत्री’ उभी केली. आमच्या मालिकेच्या प्रोमोमधून ती लोकांपर्यंत पोहोचली आणि या भूमिकेसाठी मला चांगला प्रतिसाद मिळत आहे.”