ठाणे : ठाण्यात फुटबॉल खेळणाऱ्या मुलांच्या अंगावर टीनशेड कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली. यात सात मुलं गंभीर जखमी झाले आहेत.
शुक्रवारी रात्री ठाण्यातील एका टर्फमध्ये काही मुलं फुटबॉल खेळत होती. यावेळी अचानक पाऊस आणि वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. या वाऱ्यामुळे शेजारच्या इमारतीवरील टीनशेड थेट या मुलांच्या अंगावर येऊन कोसळले. या घटनेत सात मुलं गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनंतर आज शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी रुग्णालयात जाऊन जखमी मुलांची भेट घेतली. तसेच त्यांना सरकारकडून मदतीचे आश्वासन दिले.
यासंदर्भात बोलताना, ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी याठिकाणी १७-१८ जण फुटबॉल खेळत होते. जोरदार हवेमुळे शेजारच्या इमारतीवरून एक टीनशेड या मुलांच्या अंगावर येऊन कोसळले. यात ७ जण गंभीर जखमी झाले. यापैकी ४ जण बरे असून तिघांची प्रकृती नाजूक आहे, अशी माहिती त्यांनी दिली.