राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई : सध्या देशभरात परीक्षांचा भलताच गोंधळ सुरु आहे. कधी पेपरफुटी तर कधी कॉपीचे भयंकर प्रकार उघडकीस येत आहेत. या प्रकरणांनी सर्वोच्च न्यायालय देखील गाठले आहे. त्यातच आता मृदा जलसंधारण विभागाच्या भरतीसंदर्भातही मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने या विभागात ६५० पदांसाठी फेरपरीक्षा घेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यात ही परीक्षा पार पडणार आहे.
मृदा जलसंधारण विभागात गट ‘ब’ संवर्गातील पदांसाठी ही फेरपरीक्षा होणार आहे. ही परीक्षा पारदर्शक व्हावी या अनुषंगाने सात शहरांतील १० टीसीएस आणि आयओएम कंपन्यांच्या अधिकृत केंद्रांवर ती घेतली जाणार आहे. या केंद्रांवर १४, १५ व १६ जुलै रोजी ही परीक्षा पार पडणार आहे. काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा फेरपरीक्षेचा निर्णय घेतला आहे.
परीक्षा केंद्रांवर घडला होता गैरप्रकार
अमरावतीच्या (Amravati News ) ड्रीमलँड परीक्षा केंद्रावर २० आणि २१ फेब्रुवारीला विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याच्या घटनेने एकच गोंधळ उडाला होता. या घटनेत परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्याकडूनच हा पेपर फोडला गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी लावून धरत आंदोलनाचा इशारा दिला होता. परिणामी ही परीक्षा रद्द करण्याचे आदेश राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी संबंधित विभागाला दिले व १५ मार्च रोजी ही भरती प्रक्रिया परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर आता राज्य सरकारने फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.