अर्ज कुठे अन् कसा कराल? जाणून घ्या सविस्तर
मुंबई : सध्या अनेक तरुण भरघोस पगारासह सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असतात. अशाच तरुणांसाठी एक आनंदाची बातमी मिळत आहे. बिहार लोकसेवा आयोगाने (BPSC) आरोग्य विभागाच्या अंतर्गत मेगाभरती जाहीर केली आहे. वैद्यकीय रुग्णालये आणि विद्यापीठात असिस्टंट प्राध्यापक पदांसाठी एकूण १३९९ पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवार बीपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करु शकणार आहेत. ही अर्जप्रक्रिया २५ जून ते २६ जुलै या कालावधीपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा असे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
वयोमर्यादा
BPSC च्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी सामान्य प्रवर्गातील लोकांसाठी वयोमर्यादा ४५ वर्ष आहे. मागासवर्गीय गटातील (पुरुष आणि महिला) साठी ४८ वर्ष वयोमर्यादा आहे. तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांसाठी आणि बिहारच्या राज्य आरोग्य सेवा अंतर्गत कार्यरत डॉक्टरांसाठी ५० वर्ष वयोमर्यादा असणार आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य प्रवर्ग, OBC आणि EWS श्रेणीसाठी ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर SC/ST/PWD/ महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क २२५ रुपये आहे.
वेतन
BPSC अंतर्गत पदांसाठी निवडलेल्या उमेदवाराला १५,६०० ते ३९,१०० रुपये पगार दिला जाईल, असे विभागाकडून सांगण्यात आले आहे.