फिरता फिरता – मेघना साने
अमेरिकेच्या ‘मराठी विश्व न्यू जर्सी’ या महाराष्ट्र मंडळाचे नाव अमेरिकेतच काय, पण महाराष्ट्रातील मराठी रसिकांनाही माहीत झाले आहे, ते या मंडळाच्या भव्य उपक्रमांमुळे. २०२२ साली या मंडळाने बी. एम. एम. अधिवेशनाच्या आयोजनाची जबाबदारी घेऊन, ती यशस्वीही करून दाखवली होती. तसेच विश्व मराठी नाट्यसंमेलन, अखिल अमेरिका एकांकिका स्पर्धा, वसंतोत्सव असे मोठमोठे कार्यक्रमही करून दाखविले आहेत. त्याचबरोबर वर्षभरात काही अभिनव कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते.
२०२२ मध्ये ‘मराठी विश्व न्यू जर्सी’च्या ट्रस्टी असलेल्या स्नेहल वझे यांनी माझ्याशी नुकताच संवाद साधला, “मेघना, आमच्या संस्थेच्या कम्युनिटी सेंटरसाठी पैसे जमवायचे होते, तेव्हा मी चक्क बोहारीण झाले होते!”
“म्हणजे? बोहारणीसारखे तुम्ही दारोदार जाऊन साड्या व जुने कपडे मागितले की काय?” मी थोड्याशा अविश्वासाने विचारले.
“एकप्रकारे तसंच.” स्नेहलने मग या उपक्रमाचे सविस्तर वर्णन सांगितले. ‘मराठी विश्व न्यू जर्सी’ तर्फे सभासदांना ऑनलाइन निरोप पाठवला गेला की, कोणाला आपल्या चांगल्या स्थितीतल्या साड्या मंडळाला डोनेट करायच्या असतील, तर त्यांनी खालील पत्त्यावर आणून द्याव्यात. नंतर त्या विकून त्याचे पैसे मंडळाला डोनेट केले जातील. ‘लोक वापरलेल्या साड्या देतील, तर त्या कोण घेणार?’ असा नकारात्मक सूरही काही स्त्रियांनी सुरुवातीला लावला. पण जसजशा सुंदर साड्या येऊ लागल्या आणि स्नेहल वझे व तिची टीम यांनी त्या साड्यांचे ऑनलाइन डेमॉन्स्ट्रेशन सुरू केले. तसतशी साड्यांना मागणीही येऊ लागली. सर्व साड्या वापरलेल्या नव्हत्या. काही तर अगदीच कोऱ्या होत्या, लेबलसकट सुद्धा होत्या. काहींनी तर मॅचिंग पेटीकोटसहित साड्या पाठवल्या. प्रत्येक साडीची किंमत २० डॉलर अशी नेमकी ठेवली होती आणि या साड्यांच्या खरेदीचा चेक ‘मराठी विश्व न्यू जर्सी’च्या कम्युनिटी सेंटरसाठी डोनेशन म्हणून जाणार होता. ज्या साड्या विकल्या गेल्या नाहीत, त्या Texas मधील Saree Strong या संस्थेला FedEx ने ३० मोठे बॉक्स भरून पाठवल्या. हा उपक्रम दोन वर्षे केला.
कशासाठी? मराठीसाठी!
अमेरिकेतील ‘मराठी वैभव’ या रेडिओ स्टेशनवरून मला स्नेहल वझे यांचा फोन आला. कोरोनाच्या काळात श्रोत्यांसाठी एक हलका फुलका विडंबन गीतांचा कार्यक्रम त्यांना तयार करायचा होता. त्यावेळी अविनाश चिंचवडकर लिखित हेमंत साने यांनी गायलेले ‘दिवस घरी हे बसायचे’ (कविवर्य पाडगावकरांच्या गाण्याचे विडंबन) हे गाणे खूप गाजत होते. ‘ABP माझा’ ने ही त्याची दखल घेतली होती. अमेरिकेतील ‘मराठी वैभव’ ने ते नेमके हेरले आणि कार्यक्रमासाठी आम्हाला मागितले. आम्ही त्या गाण्याचा ऑडिओ त्यांना ई-मेल केला. त्यानंतर वझे यांनी आम्हाला लिंक पाठवली आणि खुसखुशीत निवेदनाने नटलेला हा विडंबन गीतांचा ‘मराठी वैभव’चा कार्यक्रम आम्ही ठाण्यात आमच्या घरी बसून मोबाइलवर ऐकू शकलो. अमेरिकेत मराठी कार्यक्रम प्रसारित करणारा एक रेडिओ आहे, हे पाहून आम्हाला खूप आनंद झाला.
२०२३ साली न्यू जर्सीमध्ये स्नेहल वझे यांच्याकडे ते रेडिओ स्टेशन बघायला जाण्याचा योग आला. प्रदीप वझे आणि स्नेहल वझे हे दोघे पती पत्नी न्यू जर्सीमधून ‘मराठी वैभव’ हे रेडिओ स्टेशन चालवतात. यावर प्रसारित होणारे कार्यक्रमही त्यांनी तयार केलेले असतात. एक विषय घेऊन स्नेहल कार्यक्रमाची संहिता तयार करते. त्याला नव्या-जुन्या गाण्यांची जोड देऊन कार्यक्रम सजविला जातो. नभोवाणी तंत्रज्ञ म्हणून प्रदीप काम पाहतात. गाण्यांच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त कधी सामाजिक संस्थांची ओळख करून देणारे कार्यक्रमही असतात. तसेच मराठी साहित्य, संगीत, इतर कला इत्यादी क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींच्या स्मृती अनेकदा कार्यक्रमातून आवर्जून जागविल्या जातात. आपले सण, इतिहासातील महत्त्वाचे दिवस हे गाणी आणि आठवणींच्या द्वारे साजरे होतात. या कार्यक्रमांच्या माध्यमातून यांनी खरोखरच मराठीचे वैभव जपलेले आहे. रसिकांच्या पसंतीची गाणी वाजविता यावीत म्हणून स्नेहल आणि प्रदीप यांनी ‘मराठी वैभव रसिक’ असा व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. त्यावर श्रोते विषय आणि त्याला अनुरूप गाणी सुचवितात. अर्थातच अंतिम निवड व अनुरूप असे निवेदन स्नेहल वझे यांचे असते. हे दोघेही आपापल्या नोकऱ्या सांभाळून छंद म्हणून हे रेडिओ स्टेशन चालवत आहेत.
हा कार्यक्रम आता जरी हे दोघेच सांभाळत असले, तरी सुरुवातीच्या काळात त्यांना खूप जणांची मदत झाली आहे. त्यात विशेष उल्लेख करावा लागेल रवी गाडगीळ आणि वर्षा गाडगीळ यांचा. सुरुवातीची सहा वर्षे, वर्षा गाडगीळ (निवेदन) आणि अशोक देशपांडे (नभोवाणी तंत्रज्ञ) यांनी अर्ध्या कार्यक्रमांची जबाबदारी उचलली होती. कार्यक्रमाच्या सिग्नेचर ट्यूनचे गीत रवी गाडगीळ यांनी लिहिले आहे आणि किशोर रानडे यांनी संगीत दिले आहे. यातील आवाज महेश लाड, ऋचा जांभेकर आणि प्रशांत गिजरे यांचे आहेत.
हे रेडिओ स्टेशन घरातच कसे तयार केले याची मला उत्सुकता होती. शनिवार, रविवार प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमांचे ध्वनिमुद्रण हे दोघे घरीच करतात. त्यासाठी इन्फ्रा स्ट्रक्चर घरातच उभारले आहे. रेडिओसाठी लागणारी सामग्री म्हणजे सॉफ्टवेअर, कॉम्पुटर, मायक्रोफोन्स, स्टोरेज डिव्हायसेस, साऊंड मिक्सर आणि अद्ययावत साऊंड सिस्टीम त्यांनी स्वखर्चाने विकत घेतली आहे. आपल्या घरातला हा स्टुडिओ पूर्ण साऊंडप्रूफ करून घेतला आहे. गेली पंधरा वर्षे ते हा उपक्रम चालवीत आहेत आणि हे सर्व विनाशुल्क! कशासाठी? मराठीसाठी!