नितीन सप्रे
तांबेकुलवीरश्री ती
नेवाळकरांची कीर्ति
हिंदुभूध्वजा जणु जळती ।
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ।
रे हिंदबांधवा ।।१।।
देश-परदेशातल्या भारतीयांनी उरी सार्थ अभिमान बाळगावा अशा महाराष्ट्र कन्यांमध्ये लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर म्हणजेच पूर्वाश्रमीच्या मणिकर्णिका मोरोपंत तांबे म्हणजेच ‘झाशीची राणी’ यांचे नाव अग्रक्रमाने येते. या राणीचा जीवनपट उलगडला तर लक्षात येईल की, या भूलोकी अवघी २३ वर्षे ही शलाका तळपली आणि अचंबित करणारा देदीप्यमान महापराक्रम नोंदवून गेली.
घोड्यावर खंद्या स्वार
हातात नंगी तलवार खणखणा करित ती वार
गोऱ्यांची कोंडी फोडित पाडित वीर इथे आली
रे हिंद बांधवा ।।२।।
कडकडा कडाडे बिजली
इंग्रजी लष्करे थिजली
मग कीर्तिरूप ती उरली
ती हिंदभूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली
रे हिंद बांधवा ।।३।।
बालपण
केवळ रणांगणच नाही, तर कौटुंबिक जीवनही राणीसाठी समरांगणा प्रमाणेच होतं. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग ही उक्ती ती शब्दशः जगली. पेशव्यांचे कारभारी मोरोपंत तांबे आणि भागीरथी तांबे सप्रे या दांपत्याची मनू ही सुस्वरूप, तेजस्वी मुलगी. तिचा जन्म काशी इथे झाला. मनूवर वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी मातृवियोगाचं आभाळ कोसळलं. त्यामुळे तिचा बहुतेक वेळ वडिलांबरोबर पेशवे दरबारात व्यतीत होऊ लागला. ब्रह्मावर्त येथील वाड्यात नानासाहेब पेशवे, बंधू रावसाहेब यांच्यासह तलवार, दांडपट्टा, बंदूक चालवणं तसंच घोडेस्वारीचं शिक्षण तिनं घेतलं. त्यातील पेच आत्मसात केले. मोडी अक्षर ओळख आणि लेखन-वाचनही मनुताई त्यांच्यासमवेत शिकल्या.
झाशीची राणी
पुढील तीन वर्षांत वयाच्या सातव्या वर्षी झाशीचे संस्थानिक गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी पाणिग्रहण होऊन मनुताई, ‘राणी लक्ष्मीबाई’ झाल्या. १८४२ ते १८५१ हा नऊ वर्षांचा काळ काहीसा स्थैर्याचा म्हणता येईल. १८५१ ला पुत्ररत्न प्राप्त होऊन गादीला वारस मिळाला, मात्र हा आनंद राजपुत्राप्रमाणेच अल्पजीवी ठरला. तीन महिन्यांचा क्षणिक जीवनकाळ बाळराजेंना मिळाला. पुत्र वियोगाचं दुःख असह्य होऊन गंगाधरराव अंथरुणाला खिळले. त्यांच्याच इच्छेनुसार वासुदेव नेवाळकर यांचा पुत्र आनंदराव यांना दत्तक घेण्यात आलं (१८ नोव्हेंबर, १८५३) आणि असं सांगतात की, दत्तक विधानानंतर काही तासांतच गंगाधरपंतांची प्राणज्योत मालवली. उण्यापुऱ्या दोन वर्षांच्या कालावधीत राणी लक्ष्मीबाईंवर, पुत्र आणि पती वियोगाची कुऱ्हाड कोसळली. झालं ते सर्व कमी की काय म्हणून पती निधनानंतर जेमतेम तीन महिन्यातच इंग्रजांनी झाशी संस्थान खालसा केल्याचं राजपत्र काढलं (७ मार्च १८५४). मेजर एलिस यानं राजपत्र राणीला दरबारात वाचून दाखवलं आणि परतीची अनुज्ञा मागितली. “मेरी झांशी नही दुंगी” या अमरत्व प्राप्त झालेल्या ओजस्वी प्रखर निर्धाराची हीच जन्म घटिका.
अग्रणी स्वातंत्र्य सेनानी
पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धाने १८५७ साली नवीन वर्षाच्या प्रारंभी जानेवारी महिन्यात पेट घेतला. वर्षाच्या मध्यावर (मे १८५७) त्याची धग मेरठपर्यंत पोहोचली. मेरठ, दिल्ली, बरेली आणि झाशीमध्ये इंग्रजी सत्तेचा लोप झाला. यानंतर सुमारे तीन वर्षांनी राणी लक्ष्मीबाई यांनी झाशीत सत्ता सांभाळली. राणी लक्ष्मीबाईंना जिवंत पकडण्याची कामगिरी इंग्रजी राज्यसत्तेने सर ह्यू रोज यांच्यावर सोपवली. त्यांच्या सैन्याने मार्च १८५८ ला झांशीनजिीक तळ ठोकला आणि शरणागती पत्करावी असा निरोप लक्ष्मीबाईंना धाडला. लक्ष्मीबाईंनी मात्र त्याची वासलात लावत मोठ्या धैर्याने झाशीच्या बचावासाठी लढाई पुकारली आणि तीन दिवस सर ह्यू रोजच्या फौजेला खडे चारले. मात्र दगाफटका झाला आणि अखेरीस सुमारे दहा दिवसांनी इंग्रजी सैन्याला झाशीत प्रवेश मिळवता आला. त्यांनी लुटालूट सुरू केली. शत्रूच्या हाती तुरी देऊन पेशव्यांना जाऊन मिळण्याची धाडसी योजना लक्ष्मीबाईंनी आखली. इंग्रजी सैन्याचा पहारा चुकवत लहान दामोदरला पाठीशी बांधून निवडक स्वारांसह शंभर मैल दूर असलेल्या काल्पीकडे रातोरात कूच केलं. पेशव्यांनी राणीला आवश्यक सैन्यबळ पुरवलं. ह्यू रोज ने मे महिन्यात काल्पीवर हल्ला बोलला. राणीनं दोन दिवस मोठ्या शौर्यानं काल्पी लढवली मात्र अखेरीस हार पत्करावी लागली.
वीरमरण
काल्पीच्या पराभवानंतर बाजीराव पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी, बांद्याचे नबाब आणि प्रमुख सरदार गोपाळपूरला एकत्रित आले. लक्ष्मीबाईंनी ग्वाल्हेर जिंकण्याची सूचना केली. स्वतः पुढाकार घेतला आणि ग्वाल्हेर जिंकून पेशव्यांकडे सुपूर्द केलं. १६ जूनला ह्यु रोज ने ग्वाल्हेरवर चढाई केली. लक्ष्मीबाईंनी पूर्व भागाची जबाबदारी स्वत:वर घेतली. लक्ष्मीबाईंनी दाखवलेलं अतुलनीय धैर्य सैन्यासाठी प्रेरणा स्रोत ठरलं. पहिल्याच दिवशी इंग्रज सेनेवर माघार घेण्याची नामुष्की ओढवली. मात्र चवताळून गेलेल्या इंग्रजांनी नंतर ग्वाल्हेरवर चोहो बाजूंनी हल्ला केला. खमकेपणाचा परिचय देत राणीनं शरणागती न पत्करता शत्रूच्या हातावर तुरी देऊन तेथून निसटण्याची तयारी केली. मात्र दुर्दैव आडवं आलं आणि मार्गात आलेल्या ओढ्यावर घोडा बिथरला. चाल करून आलेल्या शत्रूवर त्यांनी हल्ला चढवला मात्र त्यात त्या जखमी झाल्या आणि घोड्यावरून कोसळल्या. पुरुषी वेशात असलेल्या राणीला इंग्रज स्वार ओळखू शकले नाहीत आणि ते तिथून निघून गेले. असं वाचनात आलं की, राणीचा नेहमीचा राजरत्न घोडा त्यावेळी नव्हता. ग्वाल्हेरच्या फुलबाग परिसरातल्या या ओढ्यानजीक गंगादास यांचा मठ होता. निष्ठावान सेवकांनी राणीला तिथे नेऊन गंगाजल दिलं आणि अभूतपूर्व साहसी जीवन जगून देशाला ललामभूत ठरलेल्या झाशीच्या या लढवय्या राणीनं अवघ्या तेविसाव्या वर्षी वीरमरण प्राप्त केलं.
‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’
शहीद भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह जगभरातल्या क्रांतिकारकांसाठी राणी लक्ष्मीबाईंची ही शौर्यगाथा नि:संशय स्फूर्तिदायी आहे. ग्वाल्हेरचे प्रसिद्ध वकील रामचंद्र जी करकरे यांनी डॉक्टर पुस्तके यांच्या मदतीनं खूप अभ्यास आणि संशोधन करून राणीचं बलिदान स्थळ शोधून काढलं आणि त्या ठिकाणी राणीची समाधी बांधली. तोपर्यंत लक्ष्मीबाईंवर अंत्यसंस्कार कुठे करण्यात आले ते कुणालाही माहीत नव्हतं. त्यांनी १८ जून १९३८ साली ग्वाल्हेर इथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ग्वाल्हेरला निमंत्रित करून त्यांचा सार्वजनिक सन्मान या समाधीस्थळी केला होता. राणी लक्ष्मीबाई बलिदान दिवस समारोहात उपस्थित राहून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राणीच्या वीरश्री प्रती आपली आदरांजली अर्पिली होती.
आपल्या पुत्राला (दत्तक) पाठीशी बांधून घोड्यावर स्वार होऊन तुंबळ युद्ध लढणारी रणरागिणी म्हणून तिची कीर्ती दिगंत आहे. अख्ख्या जगाच्या इतिहासात, अशी मर्दानी कामगिरी बजावणारी लढवय्या नारी, कदाचित दुसरी कुणी नसेल. अशा या विरांगनेच्या १६४व्या बलिदान दिनी तिच्या समाधीस्थळी उपस्थित राहून श्रद्धा सुमन अर्पण करताना कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितेच्या ओळी सार्थक झाल्या होत्या… –
“रे, हिंद बांधवा ! थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशीवाली”
[email protected]
(लेखक हे भारतीय माहिती सेवेतील अधिकारी असून सध्या भारत सरकारच्या डी.डी.न्यूज (दूरदर्शन) नवी दिल्ली येथे उपसंचालक या पदावर कार्यरत आहेत.)