विचित्र अपघातात दोन ठार तर दोन जखमी
अहमदनगर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये (Accident news) प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच अहमदनगरमधून एक भीषण अपघाताची (Ahmednagar Accident) घटना समोर आली आहे. या ठिकाणी तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. नगर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपासवर ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर-पुणे-कल्याण बायपासवर (Solapur-Pune-Kalyan Bypass) तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. सुरुवातीला बायपासवर ट्रेलर (Trailer) आणि ट्रकची (Truck) समोरासमोर धडक झाली. यानंतर अपघातग्रस्त ट्रेलरला एका कारने (Car) मागून धडक दिली.
या भीषण अपघातात ट्रेलर आणि ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अहमदनगर जिल्हा रुग्णालयात (Ahmednagar Civil Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे बायपास रोडवर काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.