समांतर-प्रायोगिक लखोट्यात बंदिस्त झालेली ‘पत्रापत्री’

Share

भालचंद्र कुबल – पाचवा वेद

१९८८ साली अमेरिकन नाटककार अल्बर्ट रॅम्सडेल गुर्नी ज्यु. उर्फ पीट गुर्नी यांचे लवलेटर्स हे पत्रनाट्य ब्रॉडवेवर बरेच गाजले आणि त्याची प्रेरणा घेऊन जावेद अख्तरनी हिंदी रंगभूमीवर ‘तुम्हारी अमृता’ नामक द्विपात्री प्रेमकथा पत्रनाट्यातून खुलवली. ते नाटक इतके गाजले की, पत्रनाट्य म्हटले की, ‘तुम्हारी अमृता’ हे समीकरण बनून गेले आहे. हे नमूद करण्यामागचे विशेष कारण म्हणजे या नाटकाच्याही आधी व. पु. काळे यांच्या पत्ररुपी कथेवरील एकांकिका आणि भालचंद्र सुळे (आणखी एक नारायण निकम फेम लेखक) यांचेही एक पत्ररुपी नाटक (साल १९७९/८०) मराठी रंगभूमीवर एक वेगळा प्रायोगिक फॉर्म म्हणून स्वतःचा ठसा उमटवून गेले होते. थोडक्यात मराठी रंगभूमीला पत्रनाट्याचा इतिहास आहे. या फॉर्मकडे आजवर अत्यंत भावनिक आणि गांभीर्याने पाहिले गेले. मात्र नुकतेच प्रकाशित झालेले पत्रापत्री हे द्विपात्री पत्रनाट्य या आधीच्या इतिहासाला छेद देणारे आहे. मिश्किली हा या पत्रापत्रीचा स्थायीभाव आहे. त्यामुळे स्वतःच्या मूळ स्वभावाप्रमाणेच दिलीप प्रभावळकर या नाटकाचे सादरीकरण विजय केंकरेंच्या सहाय्याने विनोदी ढंगात करतात आणि प्रयोगात जान आणतात.

दोन मित्रांनी एकमेकांना पत्राद्वारे कळविलेल्या दैनंदिन जीवनातील, टवाळक्या करत लिहिलेले वाचल्याचा परफॉर्मन्स म्हणजे पत्रापत्री होय. रंगमंचावर पत्र वाचणे, हे थोडे जिकिरीचे काम आहे. एक तर आजच्या नव्या पिढीला पत्रलेखन अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे काही काही जार्गन्स अथवा फंडे कळणे तसे कठीणच. ‘सनविवि’ ,‘शि. न.’ ,‘कलोअ’, ‘ताक’ ही सगळी पत्रातील सहजगत्या येणारी मराठी अॅब्रिव्हेशन्स होती. पत्र लिहिण्याला एक फॉरमॅट होता. पत्राच्या उजव्या बाजूस वर पत्ता व तारीख, नंतर डाव्या बाजूस मायना, मधल्या जागेत मजकूर अशा ठरलेल्या जागा भरल्या की पत्रलेखनात पैकीच्या पैकी मार्क्स मिळण्याचे चान्सेस मराठी विषयाच्या परीक्षेत असत. १९९२च्या जागतिकीकरणाचा झंझावात ई-मेल, एसएमएस, एमएमएस, इंस्टंट मेसेजिंगच्या काळात पत्रलेखन पार लयाला गेले. पत्र वाचायला सुद्धा एक पद्धत होती, लय होती, ज्यात कनेक्ट होता. पुलंच्या लिखाणात हमखास आढळणारे पत्र, हल्ली नाटकातच नाही, तर बाकी लिखाणातूनही बाद झाले आहे. वर्षोनुवर्षे सवयीचा झालेला पोस्टमन हल्ली क्वचितच डोरबेल वाजवतो.

पत्रसाहित्य इतर भारतीय भाषांमध्ये आहे, तेवढेच मराठीत आहे. साने गुरुजींच्या शामच्या पत्रानी आदर्शवत गदगदवले, पुलंच्या कोट्यानी सिस्मित केले एवढेच नव्हे, तर अगदी अलीकडे अभिराम भडकमकरांच्या प्रेमपत्राने रोमँटिक केले. माझा तर दावा आहे की, कुठल्याही पत्राच्या वाचनात वाचिक अभिनय हा ठासून भरलेला असतो. कारण पत्रवाचनाला विरामाचे तंत्र आत्मसात करणे भाग आहे. संवादरुपी वाक्यांना भावमुद्रांची गरज आहे. आंगिकतेचा समतोल वा मर्यादित वापर हे गुण तुमच्या पत्रवाचनात आले की, ते ऐकणाऱ्याच्या मनाला भिडतात. नेमका हाच अभ्यास ‘पत्रापत्री’ बघताना दिलीप प्रभावळकर आणि विजय केंकरे यांनी केलेला आढळतो. खरं तर हा अभ्यास कुठल्याही अभ्यासक्रमात किंवा पुस्तकात आढळणार नाही, तर नाट्यानुभवांच्या पानात तो दडलाय. वर म्हटल्याप्रमाणे पत्रवाचनातील आंगिक आणि सात्त्विक अभिनय हा संयमित असणे गरजेचे असते. उदा. पत्र वाचताना तुम्हाला धाय मोकलून रडता येत नाही. शिवाय जरी पाठांतर असले, तरी हातात पत्र असल्यावर ठरावीक वाक्यांनंतर पत्राकडे द्यायचा लूक अनिवार्य असतोच, तर अशा प्रकारच्या थिएट्रिकल एक्झरसाईजेस करता करता पत्रापत्री प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होते.

प्रभावळकरांचे लिखाण हे जुन्या विनोदी लेखकांच्या वळणाचे आहे. मधेच चि. वि. जोशी, अच्युतराव कोल्हटकर, बाळकराम आणि अलीकडच्या लेखकांपैकी पुलंच्या पठडीतले जाणवते. त्यात पुलंसारख्या कोट्या नाहीत, मात्र तौलनिक कोपरखळ्या आहेत. प्रभावळकरांचा विनोद अत्र्यांसारखा बेधडक नाही किंवा कोल्हटकरांसारखा सपासप वार करणाराही नाही. तो चि. विं. सारखा शालिन आणि बाळकरामांसारखा संयमित आहे. हसगत, चुक भूल द्यावी घ्यावी, हसवा हसवी किंवा कागदी बाण यांच्या लिखाणात बागडणारा विनोद अवखळ आहे, खोडकर आहे, तत्पर आहे. तो बावळट, वात्रट किंवा धसमुसळा अजिबात नाही. त्यामुळे बऱ्याचदा प्रभावळकरांचे लिखाण सादर करताना एक तर त्यांच्या स्टाईलने ( स्टाईल म्हणजे रीत, पद्धत आणि शैली या तीनही अर्थी ) तरी सादर करावे किंवा ते त्यांनीच सादर करावे. प्रभावळरांचे वाचन हे भावमुद्रांसहित असते, ते जमायला हवे. पत्रापत्रीत या सर्व विनोदाच्या जागा हे दोघेही अचूक काढतात. दोन-सव्वादोन तास हसत हसवत प्रेक्षकांच्या चेहऱ्याला व्यायाम करायला भाग पाडतात. एका मित्राने दुसऱ्या मित्राला पाठवलेल्या पत्रात “घ्यायला हवे” असे काही नाही, मात्र दोन तासांत मिळालेला आनंद तुम्हाला बरेच काही देऊन जातो.

एन. सी. पी. ए.च्या वतीने भरविण्यात आलेल्या ‘प्रतिबिंब’ या नाट्य महोत्सवात पत्रापत्री बघायचा योग आला आणि हे पत्रवाचन केवळ आणि केवळ एक्सपरिमेंटल थिएटरलाच बघितले जावे, असा माझा आग्रह असेल. नाटकाचे ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट नेपथ्य शीतल तळपदेची प्रकाश योजना सिंपल साधी मात्र अफलातून आहे. म्हटले तर अभिवाचन म्हटले, तर नाटक अशा समांतर-प्रायोगिक लखोट्यात बंद असलेला हा दृष्यानुभव प्रत्येक नाट्यकर्मीने पाहावा असाच आहे.

Recent Posts

Heavy rain in Konkan : कोकणात मुसळधार; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट!

पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत कोकणात, मध्य महाराष्ट्र,…

5 mins ago

Vidhanparishad Election : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा!

पंकजा मुंडेंची लागली वर्णी; आणखी कोणाकोणाला मिळाली संधी? मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) राज्यात…

6 mins ago

sleepwalking : झोपेत चालण्याच्या सवयीने १९ वर्षीय तरुणाने गमावला जीव!

झोपेत चालत थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला मुंबई : झोपेत चालण्याच्या सवयीमुळे (sleepwalking) भायखळा येथील…

47 mins ago

Nagpur Deekshabhoomi : दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगबाबत बौद्ध अनुयायी आक्रमक!

जाळपोळ आणि तोडफोड करत केले आंदोलन नागपूर : जगभरातील बौद्ध अनुयायांसह (Buddhist followers) तमाम भारतीयांचे…

1 hour ago

Tamhini Ghat : नसतं धाडस बेतलं जीवावर! तरुणाने धबधब्यात उडी मारली आणि थेट वाहून गेला…

ताह्मिणी घाटातील धक्कादायक प्रकार पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात.…

2 hours ago

AI voice scam : नोकरी शोधून देता देता छोकरीलाच पटवलं आणि घातला ७ लाखांचा गंडा!

AI च्या किमयेने कट रचला आणि मैत्रिणीने चुना लावला मुंबई : हल्ली एआय तंत्रज्ञानामुळे (AI…

3 hours ago