चार राज्यांमध्ये होत आहेत विधानसभा निवडणुका
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) पार पडल्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission Of India) विधानसभा निवडणुकांच्या (Vidhansabha Election 2024) तयारीला लागले आहे. यावर्षी हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी विधानसभा निवडणूक घेतली जाणार आहे. त्या दृष्टीने आता निवडणूक आयोगाने काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.
निवडणूक आयोगाने निवडणूक याद्या अद्ययावत करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. घरोघरी जाऊन मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राच्या काही अडचणी असतील, त्या दूर केल्या जाणार आहेत. या निवडणुकांची तयारी म्हणून नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. तुम्ही जर आत्तापर्यंत मतदार म्हणून तुमची नोंदणी केली नसेल तर ती तातडीने करुन घ्या असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
२५ जूनपासून म्हणजेच येत्या चार दिवसांपासून महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मीर या ठिकाणी निवडणुकीच्या आधीची तयारी सुरु होणार आहे. पोलींग स्टेशन्स, मतदारांचे समूह यांची चाचपणी केली जाणार आहे. असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबर, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ ला संपणार आहे. त्यादृष्टीने आता राज्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत.