Wednesday, July 3, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखमुस्लीम मतांच्या कुबड्यांवर उबाठा सेनेची कसरत

मुस्लीम मतांच्या कुबड्यांवर उबाठा सेनेची कसरत

शिवसेना या नावाभोवताली फिरणाऱ्या एकनाथ शिंदेंची शिवसेना व उबाठांची शिवसेना या दोन पक्षांचे वर्धापन दिन मंगळवारी साजरे झाले. दोन्ही मेळाव्यांवर नजर टाकली असता कमालीचा परस्परविरोधाभास पाहावयास मिळाला. एकीकडे उबाठा सेनेचे सेनापतीच सैरभैर झाल्याचे स्पष्टपणे पाहावयास मिळाले, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर व ध्येयधोरणांवर आजही ठाम असल्याचे पाहावयास मिळाले. मेळाव्यामध्ये उबाठा पूर्णपणे दिशाहिन व सैरभैर झाल्याचे पावलापावलावर पाहावयास मिळाले. केवळ वल्गना व स्वत:चीच शेखी मिरविणाऱ्या गोष्टी याशिवाय उबाठांच्या मेळाव्यात फारसे काही दिसूनच आले नाही.

लोकसभा निवडणुकीत उबाठा सेनेचा महाराष्ट्रातील जनतेने दणदणीत पराभव केला आहे. १८ जागांवरून जेमतेम ९ जागांवर विजय मिळविण्यात उबाठा सेनेला यश मिळाले आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पहिल्याच निवडणुकीत ८ खासदार निवडून आणले आहेत. निवडणुकीत झालेल्या पराभवाचे आत्मचिंतन करण्याइतपत परिपक्वपणा उबाठामध्ये नसल्याने मेळाव्यात कुठेही पराभवाच्या आत्मचिंतनाचे सूर कोणाकडूनही आळविण्यात आले नाहीत. केवळ पंतप्रधान मोदी, अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकाटिप्पणी करण्यात उबाठांनी मेळाव्यामध्ये धन्यता मानली.

पक्षाचा वर्धापन दिन म्हटल्यावर पक्षाची वाटचाल, बळकट स्थाने, कमकुवत दुवे, पक्षाचे यशापयश, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणे, मरगळ झटकणे, नवी दिशा देणे, धोरण ठरविणे हे कार्यकर्त्यांना अभिप्रेत असते. पण येथे तर भलताच प्रकार घडला. मोदी व शहांवर टीका करण्याच्या प्रयत्नांत ‘मला जावू द्या की हो घरी, आता वाजले की बारा’ अशा गाण्याचे बोल पक्षप्रमुखांच्या भाषणात येणे हे शोभनीय नाही. अर्थात राजकीय संतुलन गमविलेल्या, पारंपरिक हिंदुत्वाशी बांधिल असलेल्या विचारांशी फारकत घेतलेल्या, मुस्लिमांशी जवळीक साधण्यात धन्यता मानणाऱ्या उबाठांकडून आता काही वेगळी अपेक्षा धरणे व्यर्थ असल्याचे पुन्हा एकवार मेळाव्यातून स्पष्ट झाले आहे.

छगन भुजबळांबाबत बोलताना उबाठांनी आपण छगन भुजबळांना भेटलो नसल्याचे तसेच दोन्हींकडून तसा कोणताही प्रयत्न झाला नसल्याचे स्पष्ट केले. मात्र त्यावेळी त्यांनी आपण एनडीएमध्ये कदापि जाणार नसल्याची वल्गना त्यांनी केली. अर्थात त्यांचीही वल्गना केवळ काँग्रेसच्या सोनिया गांधींना तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवारांना खूश करण्याचा एक प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुळातच त्यांना एनडीएमध्ये कोणी बोलविलेच नाही अथवा एनडीएमध्ये त्यांनी यावे यासाठी लोकसभा निवडणुकीनंतर कोणीही त्यांची भेट घेतलेली नसताना त्यांनी अशा प्रकारची वल्गना करणे केवळ राजकीय स्टंटबाजीचा एक प्रकार आहे. ते २०१९ पासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत. एनडीएशी त्यांचा गेल्या पाच वर्षांत कोणताही संबंध राहिलेला नाही. त्यांना कोणी एनडीए बोलविले नसतानाही त्यांनी मी एनडीए जाणार नाही, अशा घोषणा करणे म्हणजे ‘नको येऊ तर कोणत्या एसटीत बसू’ अशातला हा एक प्रकार झाला आहे.

मविआमध्ये जाऊन उबाठा सर्वसामान्य मराठी घटकांच्या तसेच हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या भारवासीयांच्या मनातून कधीच उतरले आहेत. उबाठा सेनेच्या मेळाव्यात उबाठांनी आम्हाला मुस्लिमांनी मतदान केल्याची जाहीर कबुलीच दिलेली आहे. आम्हाला देशभक्तांनी मतदान केले असे सांगताना उबाठांनी धर्मांध मुस्लिमानांही देशभक्त असल्याचे प्रमाणपत्र देऊन ते मोकळेही झाले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या उभ्या हयातीत धर्मांध मुस्लिमांच्या विरोधात सातत्याने आग ओकली आहे. त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये ‘हिरव्या सापांना ठेचून काढा’ अशीच भाषा असायची. धर्मांध मुस्लिमांच्या मतांवर यश मिळविण्याचा आनंदोत्सव आज उबाठा साजरा करत असतील आणि अभिमानाने हे जाहीरपणे सांगत असतील, तर आज बाळासाहेबांच्या आत्म्याला नक्कीच सहन करण्यापलीकडील वेदना होत असणार.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ खासदार आणि ४० आमदार निघून गेले. त्यातील एकही खासदार व आमदार पुन्हा उबाठाकडे आले नाहीत. याचा अर्थ या घटकांचा आजही उबाठावर विश्वास नाही. त्यांनी या लोकांचा कायमस्वरूपी विश्वास गमविला आहे. शिंदेंसोबत गेलेले उबाठांच्या संपर्कात नसतानाही आम्ही कोणालाही परत घेणार नाही, अशा घोषणा करताना उबाठा कोणाची दिशाभूल करत आहे, तेच समजत नाही. उबाठा गटामध्ये घराणेशाहीला प्राधान्य दिले जात आहे, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कोणताही घराणेशाहीचा वारसा नाही. केवळ बाळासाहेबांचे विचार व हिंदुत्वाचा वारसा जोपासण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वडिलांचे विचार, धोरण, दिशा सांभाळण्यात उबाठाला अपयश आले असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी बाळासाहेबांच्या विचारांची कास धरून आजही हिंदुत्वाच्या भूमिकेशी प्रामाणिक आहेत. उबाठांनी तर सत्तास्वार्थासाठी तसेच खुर्चीसाठी बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार, ध्येयधोरणे खुंटीला टांगून ठेवल्याचे अलीकडच्या काळात महाराष्ट्राने वारंवार जवळून पाहिले आहे आणि अनुभवलेही आहे. ज्या मोदींवर देशाने विश्वास व्यक्त करत पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा सोपविली आहे. तर सत्ता हेच या उबाठा सेनेचे ध्येय असल्याने मुस्लिम मतांच्या कुबड्यांवर उबाठा सेना सैरभैर झाल्याचे दिसून येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -