
रत्नागिरीत पावसाचा धुमाकूळ; नागरिकांचे जनजीवन विस्कळीत
रत्नागिरी : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. तर काही ठिकाणी मात्र नागरिकांना अजूनही दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यातच रत्नागिरीमध्ये (Ratnagiri News) गेले दोन दिवस सतत पडत असलेल्या पावसाने चांगलेच रौद्र रुप दाखवले आहे. जिल्ह्यातील खेड तालुक्यात जगबुडी नदीने धोकादायक पातळी ओलांडली आहे. तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मुख्य रस्त्याची संरक्षक भिंत कोसळल्याने याठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीसह खेड परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदीपात्रात कमालीची वाढ होऊ लागली आहे. जगबुडी नदीची पाणीपातळी ५.२५ मीटर इतकी वाढली आहे. कोकणातील या पट्ट्यातील पावसाचा पूर्वानुभव लक्षात घेता प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर खेड व चिपळूण परिसरात एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे.
भोईवाडीत घरावर संरक्षक भिंत कोसळली
खेड तालुक्यातील सोनगाव मधल्या भोईवाडीत घरावर संरक्षक भिंत कोसळून घराचे नुकसान झाले आहे. या भागात मुसळधार पाऊस सुरू असून जमीन खचून संरक्षक भिंत थेट पुष्पा पारधी यांच्या घरावर कोसळली. त्यामुळे पारधी यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गुरुवारपासून अजूनही जोरदार पाऊस सुरू असल्याने ग्रामीण भागात जमीन खचण्याचे प्रकार देखील सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
परशुराम घाट रस्ता धोकादायक बनला
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील मुख्य रस्त्याची संरक्षक भिंत कोसळल्याने मुख्य रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. सुमारे दीड किलोमीटर लांबीची ही संरक्षक भिंत कोसळल्याने मातीचे ढिगारे गटारात वाहू लागले आहेत.