Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीArvind kejriwal : केजरीवालांच्या मागची साडेसाती संपेना! दिल्ली हायकोर्टाने जामिनाला दिली स्थगिती

Arvind kejriwal : केजरीवालांच्या मागची साडेसाती संपेना! दिल्ली हायकोर्टाने जामिनाला दिली स्थगिती

नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात अडकलेले दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या मागील संकटे संपायचे नाव घेत नाहीत. दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवालांना पुन्हा एक मोठा धक्का दिला आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत जामिनावर स्थगिती (Bail Order) राहील, असं दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टानं काल म्हणजेच, गुरुवारी केजरीवाल यांना नियमित जामीन मंजूर केला होता, मात्र आज ईडीने केजरीवाल यांच्या जामीनाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली व त्यावर आता स्थगिती देण्यात आली आहे.

अरविंद केजरीवाल यांना काल एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला होता. राऊज एव्हेन्यू कोर्टाने म्हटले की या जातमुचलक्यावर आज केजरीवाल तिहार तुरूंगातून बाहेर येऊ शकतात. मात्र, ईडीने या जामीनाविरोधात ४८ तासांचा अवधी मागितला आणि दिल्ली उच्च न्यायालयात या जामिनाला आव्हान दिलं.

न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन आणि रविंदर दुडेजा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. मद्य धोरण घोटाळा प्रकरणाच्या तपासाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर अरविंद केजरीवाल यांना सोडल्यास तपासावर परिणाम होईल. कारण केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, असं ईडीने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. त्यानंतर या जामिनाला स्थगिती देण्यात आली.

दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरण नेमका काय?

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी २२ मार्च २०२१ रोजी दिल्लीसाठी नवीन मद्य धोरण जाहीर केलं होतं. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी नवं मद्य धोरण म्हणजेच उत्पादन शुल्क धोरण २०२१-२२ लागू करण्यात आलं. नवं मद्य धोरण आल्यानंतर सरकार दारू व्यवसायातून बाहेर पडलं आणि संपूर्ण दारूची दुकानं खाजगी व्यक्तींच्या हातात गेली.

नवं धोरण आणण्यामागे सरकारचा तर्क होता की त्यामुळे माफिया राजवट संपेल आणि सरकारचा महसूल वाढेल. मात्र नवं धोरण सुरुवातीपासूनच वादात सापडलं. या प्रकरणाचा गोंधळ वाढल्यावर २८ जुलै २०२२ रोजी सरकारने नवीन मद्य धोरण रद्द करून जुनं धोरण पुन्हा लागू केलं.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी बनवण्यात आले होते. ईडीने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली होती. याच प्रकरणात मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली असून ते अजूनही तुरुंगात आहेत. तर संजय सिंह यांना जामीन मिळाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -