पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्रीनगरमध्ये योगासने
श्रीनगर : आज जगभरात योग करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. योगबद्दलचे आकर्षण वाढत आहे. आज जग एक नवीन योग अर्थव्यवस्था वाढत असल्याचे पाहत आहे. ऋषिकेश आणि काशीपासून ते केरळपर्यंत, भारतात योग पर्यटनाचा एक नवीन ट्रेंड उदयास येत आहे. जगभरातून लोक योग शिकण्यासाठी भारतात येत आहेत. यामुळे आदरातिथ्य, पर्यटन आदी क्षेत्रांची भरभराट होत आहेत. यामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
शुक्रवारी देशभरात १०वा योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये योगा केला. यापूर्वी हा कार्यक्रम साडेसहा वाजता दल तलावाच्या काठावर होणार होता, मात्र पावसामुळे तो कार्यक्रम हलवण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर येथे योगासने केली.साधारण आठच्या सुमारास सुरुवात झाली. त्यात ७ हजार लोक सहभागी होणार होते, मात्र सभागृह बदलल्यामुळे केवळ ५० जण सहभागी झाले.
जगातील वरिष्ठ नेत्यांचीही योगावर चर्चा
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, योगाचा प्रवास सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा १० वर्षांचा ऐतिहासिक प्रवास पूर्ण झाला आहे. २०१४ मध्ये, मी यूएनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता. भारताच्या या प्रस्तावाला १७७ देशांनी पाठिंबा दिला होता आणि हा एक विक्रम होता. तेव्हापासून योग दिन सातत्याने नवनवीन विक्रम नोंदवत आहे. गेल्या १० वर्षांत, योगाच्या विस्तारामुळे योगाशी संबंधित धारणा बदलली आहे. आज जगात योगा करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. योगा हे केवळ ज्ञानच नाही तर शास्त्रही आहे. आज माहिती संसाधनांचा पूर आला आहे. अशा परिस्थितीत एका विषयावर लक्ष केंद्रित करणे कठीण होत आहे. त्याचे समाधानही योगामध्ये आहे. जगातील सर्व वरिष्ठ नेते जेव्हाही संधी मिळते, तेव्हा माझ्याशी योगाची चर्चा करतात. योगा जगातील लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनत आहे. सौदी अरेबियाने त्याचा शिक्षण व्यवस्थेत समावेश केला आहे. जर्मनीमध्ये १.५ कोटी लोकांनी योगाभ्यासाचा अवलंब केला असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.
योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचे आवाहन
१० वर्षांपूर्वी २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला होता. तेव्हापासून तो वेगवेगळ्या थीमवर साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनी मला योग आणि साधनेची भूमी असलेल्या काश्मीरला येण्याचे सौभाग्य मिळाले. योगातून जी आम्हाला जी शक्ती मिळत आहे; त्याचा अनुभव आम्ही श्रीनगरमध्ये घेत आहोत. काश्मीरच्या भूमीतून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मी देशातील सर्व जनतेला आणि जगाच्या कानाकोपऱ्यात योग करत असलेल्या लोकांना शुभेच्छा देतो,२०२४ च्या योग दिनाची थीम ‘स्व आणि समाजासाठी योग’ आहे. जगभरात १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील जनतेला योगाला त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचे आवाहन केले.
मोदींकडून फ्रान्समधील १०१ वर्षीय महिला योग शिक्षिकेचा उल्लेख
यंदा फ्रान्समधील १०१ वर्षीय महिला योग शिक्षिकेला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या कधीच भारतात आल्या नाहीत. पण त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य योगाच्या प्रचारासाठी समर्पित केले आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.