Saturday, October 5, 2024
Homeताज्या घडामोडीBus Ticket : महागाईचा भडका! आर्थिक कोंडीमुळे बेस्ट प्रवासही महागणार

Bus Ticket : महागाईचा भडका! आर्थिक कोंडीमुळे बेस्ट प्रवासही महागणार

‘इतक्या’ रुपयांनी वाढणार तिकीटांचे दर

मुंबई : रेल्वेसोबतच (Mumbai Railway) मुंबईकरांसाठी प्रवासाचे आणखी एक महत्त्वाचे साधन असणाऱ्या मुंबई बेस्ट बस (Best Bus) सेवेसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. येत्या काळात मुंबईकरांना आणखी एका गोष्टीमुळे अडचणींचा सामना करावा लागणार आहे. फळे, भाज्या, दूध, सोनं-चांदी अशा गोष्टींचे दर वाढत असल्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. अशातच आता बस प्रवासही महागणार असल्यामुळे नागरिकांना आणखी महागाईची झळ सोसावी लागणार आहे. (Best Bus Ticket Price Hike)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बस सेवा पुरवणाऱ्या बेस्टकडून तिकीट दरात वाढ केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. बीएमसीने (BMC) अर्थसहाय्य देण्यास नकार दिल्यामुळे ‘बेस्ट’ची आर्थिक कोंडी झाली आहे. ही आर्थिक तूट भरून काढण्यासाठी ‘बेस्ट’कडे इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने येत्या काळात बेस्टने तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बसचे सध्याचे किमान ५ रुपये भाड्यामध्ये येत्या काळात किमान २ रुपये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आर्थिक अडचणी असल्यामुळे सामान्यांवर याचा थेट परिणाम होणार आहे.

दरवाढ अटळ

२०१९ मध्ये बेस्टने किमान भाडे ७ रुपये न ठेवता ५ रुपयांवर आणले होते. तर एसी बससाठी किमान दर ६ ते १० रुपये ठेवण्यात आले होते. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता. त्यासोबत प्रवाशांनी बेस्टला उत्तम प्रतिसाद दिला होता. त्यावेळी बेस्टला होणाऱ्या नुकसानातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ६ महिन्यांच्या तत्त्वावर ६०० कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते.

मात्र आता पालिकेनेच बेस्टला आर्थिक हातभार लावण्यापासून माघार घेतल्यामुळे बेस्टच्या अडचणीत आणखी वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काळात बेस्टकडून भाडेवाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु सध्या निवडणुकीच्या दिवसांमध्ये या निर्णयाला मंजुरी मिळणे लांबणीवर पडण्याची शक्यता असल्यामुळे यावर नेमका तोडगा काय? असा प्रश्न बेस्ट प्रशासनाला पडला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -