जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै
शरीरात जाणीव आहे, असे म्हणणे म्हणजे पायांत जोडे घातले, असे म्हणणे होय. आपण काय म्हणतो, मी पायांत जोडे घातले; पण खरे तर आपण पायांत जोडे घालत नाही, तर जोड्यांत पाय घालतो. कळले की नाही. जाणिवेत शरीर आहे म्हणून शरीरात जाणीव आहे, हे लक्षात आले पाहिजे. आता बघा सर्व ठिकाणी जाणीव भरलेली आहे. तुम्ही ऐकता कारण तुमच्या ठिकाणी जाणीव आहे. हजारो लोक ऐकतात, त्यांच्या ठिकाणी जाणीव आहे. वाघ, सिंह, लांडगा, कोल्हा या सर्वांच्या ठिकाणी जाणीव आहे. मासे जलचर यांच्या ठिकाणी जाणीव आहे म्हणजे ही जाणीव सर्व ठिकाणी भरलेली आहे.
अगदी जड वस्तूंच्या ठिकाणीसुद्धा हे सच्चिदानंद स्वरूप आहे. ही जाणीव सर्व ठिकाणी भरलेली आहे. जाणिवेत शरीर म्हणून शरीरात जाणीव आहे. उदाहरण द्यायचे झाले, तर पाण्यांत घागर आहे म्हणून घागरीत पाणी आहे. एक घागर पाण्यात सोडली व ते पाणी घागरीत गेले याचा अर्थ घागरीत पाणी कारण पाण्यात घागर म्हणून. हे उदाहरण दिले की तुम्हाला बरोबर कळेल. शरीर आहे म्हणून मजा आहे. नाही तर जीवनाला काही अर्थ आहे का? असे धरून चला की, जगात सर्व लोकांना मोक्ष मिळाला म्हणजेच जगातील सर्व लोकांची जन्म-मरणातून सुटका झाली म्हणजेच जगात माणूसच नाही, तर जीवनाला काही अर्थ आहे का? सगळे प्राणी आहेत, जलचर आहेत, पर्वत डोंगर आहेत, वृक्ष वेली आहेत, हे सर्व आहेत; पण या सर्वांना शोभा कोणामुळे आली? माणसामुळे. माणूस नाही तर या सर्वाला शोभा आहे, हे कोण बोलणार ? वाघाला बोलता येत नाही, सिंहाला बोलता येत नाही, पशूला बोलता येत नाही, मग हे जीवन किती सुंदर आहे, हे जग किती सुंदर आहे, हे विश्व किती अद्भुत आहे, हे कोण बोलू शकतो? तर हे माणूसच बोलू शकतो. याचा आस्वाद कोण घेऊ शकतो? माणूस. माणूसच जर नाही, तर या जगाला काही अर्थ आहे का? जगाला शोभा आली ती माणसामुळे. जन्म-मरणातून सुटका म्हणजे मोक्ष हे आम्हाला मान्य नाही. आमचे म्हणणे असे की, मोक्ष नावाचा प्रकारच नाही.
मोक्ष हा असूच शकत नाही, का? याचे कारण एकच. ते म्हणजे आपले स्वरूप जे आहे, ते सच्चिदानंद स्वरूप आहे. देवाचे स्वरूप काय? सच्चिदानंद स्वरूप. जगाचे स्वरूप काय? सच्चिदानंद स्वरूप. भूतमात्रांचे स्वरूप काय? सच्चिदानंद स्वरूप. इथे हे लक्षात घ्या. ‘एकोहं बहुस्याम.’ परमेश्वर एक होता, तो अनेक झाला. हे संबंध अफाट विश्व त्यातून निर्माण झाले. त्याने निर्माण केले नाही, तर त्याच्याकडून हे विश्व निर्माण झाले. हा आमचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. परमेश्वराने काही निर्माण केले नाही. त्याच्याकडून हे विश्व निर्माण झाले, अनंतकोटी ब्रह्मांडे निर्माण झाली. माणूस, डास, मासे, पशुपक्षी निर्माण झाले. आपण जर सारखं बोलत राहिलो, देवा तू हे कशाला निर्माण केलंस? ते कशाला निर्माण केलंस, तर देव म्हणेल, मी काही निर्माण केलेलं नाही, ते सर्व निर्माण झाले आहे. सांगायचा मुद्दा मोक्ष नावाचा प्रकार हा जसा समजला जातो, तसा मुळातच नाही.