आला पाऊस… अवतरला हिरवा बहर

Share

स्वाती पेशवे

वर्षभर पडणारा बेहिशेबी पाऊस ही हवामानबदलाच्या परिणामामुळे दिसणारी समस्या असली तरी सर्जनाचे मळे फुलवण्यासाठी येणारा मोसमी पाऊस मात्र एक वरदानच आहे. तो येतो आणि हिरवा बहर देऊन जातो. हा बहर जीवनप्रवाहाचा मुख्य सूत्रधार आहे. त्यामुळे केवळ मनुष्यच नव्हे तर चराचरातील प्रत्येक जीव आपापल्या पद्धतीने पर्जन्यसुक्त आळवताना दिसतो. त्याच्या फलिताचा हा काळ आहे. हा रम्य पाऊसकाळ आहे…!

नभ उतरू लागले आहे. एक आगळे झिम्माडपण अंगी घुमू लागले आहे. निसर्गातील हा बदल आपल्याला हिरव्या बहराकडे घेऊन जाणारा आहे. म्हणूनच तो उभारी देणारा आहे. हा बहर संपूर्ण चराचरामध्ये चैतन्य खेळवणारा आहे. शुष्कतेला हिरवाईमध्ये बदलवून टाकणारा आहे. त्यामुळेच या ऋतूपालटाला निसर्गचक्रात अपरंपार महत्त्व आहे. कदाचित त्यामुळेच असेल की, आपल्याकडे सण-समारंभांच्या पर्वाची सुरुवातच या ओलेत्या आणि गर्द मंडपाखाली होते.

आताही पाऊस सुरू झाला आहे. मत्त मेघांच्या झुंडी वेशीवर आदळू लागल्या आहेत. गर्जत, ललकारी देत, नाद करत हा चैतन्यरथ हळूहळू पुढे सरकेल आणि बघता बघता अवघा देश पादाक्रांत करेल. तो पुढे जाताना मागील प्रांत सुजलाम सुफलाम होत जाईल. ही समृद्धी सजीवांमधील जीवन प्रवाहित करणारी आहे. मातीआड लोटल्या गेलेल्या बीजांना फलनाचे दान देणारी आहे. तीव्र झळांनी भाजून, करपून गेलेल्या गवतकाड्यांमध्ये प्राण परतवणारी आहे. संपू पाहणाऱ्या, त्रासलेल्या, कष्टलेल्या आणि श्रांत-क्लांत झालेल्या कोणत्याही जीवाला त्याच्या जगण्याला आशेचा एक थेंबही पुरेसा असतो. पाऊस ही आशा घेऊन येतो. पाण्याचे दोन-चार घोट तहानलेल्या जीवांना आधार देतात. ओंजळभर पाण्याचा हबका शिणलेल्या आणि थकलेल्या चेहऱ्यावर टवटवी आणतो. पाण्याचा तो झुळझुळता स्पर्श तनामनाची रखरख कमी करतो. ती स्नेहल सलगी आपल्या वृत्तींनाही तरल बनवते. असे असताना पावसाळ्यात तर आपण धारांची अविरत बरसात अनुभवतो. कुंद वातावरण, मधूनच अंधाराची माया दाटून आल्यानंतर सुटणारा बेभान वारा, त्या लयीत झोके घेणारे डेरेदार वृक्ष आणि अशा भारलेल्या वातावरणात मोठ्या दिमाखात बरसरणारा तो वरुणराज… गेले कित्येक दिवस आपण या वातावरणाची, ऋतुचक्रातील या बदलाची वाट बघत होतो. प्रत्येकाला समृद्धीचा सांगावा घेऊन घेणारा पाऊस हवा होता. तो आता आला आहे. त्याचे सहर्ष स्वागत करायला हवे!

पावसाची स्वत:ची अशी एक भाषा असते आणि ही भाषा कळणे हेच माणूसपणाचे लक्षणही असते. या भाषेत शब्द नसले तरी नाद आहे. लिपी नसली तरी दृश्यमानता आहे. शब्दांच्या त्या सुरेल ओळी जमिनीच्या धुळपाटीवर स्पष्ट वाचता येतात. ते नाचरे शब्दांतून समोर येणारे गीत हृदयाच्या तारा छेडून जाते. त्यातील गेयता आणि सुरेलता थेट काळजाला भिडते. त्या शब्दांचा स्पर्श सर्वांगाला जाणवतो. म्हणूनच पावसाचे सुंदर गाणे होऊन जाते. कुणासाठी ते बडबडगीत असते, तर कुणासाठी छानसे प्रणयगीत, कुणासाठी विरहगीत असते तर कुणासाठी भावगीत… भावनेप्रमाणेच संगीताच्या प्रत्येक शाखेमध्ये पाऊस आहे. कलेच्या प्रत्येक दालनात त्याचा मुक्त वावर आहे. तो स्वरात आहे, शब्दांत आहे, पदन्यासात आहे, वाद्यांमधल्या तारांमधून निघणाऱ्या झंकारात आहे आणि नर्तिकेच्या भावमुद्रा तसेच हस्तमुद्रांमध्येही आहे.

पावसाच्या एक थेंबाने प्रफुल्लित झालेला कोणी चित्रकार त्याच्या समोरील कॅन्व्हासवरही अथांग सागर रेखू शकतो, तर अशाच जलधारा पंखांवर नाचवणारा चिमुकला पक्षी एखाद्या निष्णांत नर्तकाला लाजवेल असे नाचू शकतो. कारण पावसाच्या धारांमुळे मिळणारी संजीवनी, नवचैतन्य आणि उन्माद आत्मीक आहे. त्यात कुठलीही कृत्रिमता नाही, परकेपणा नाही. तो स्वानंद आहे आणि स्वानुभूतीही आहे. ही अनुभूती घेण्यासाठी रानावनात फिरायलाच हवे, स्वच्छंद ढगांसवे बागडायला हवे, त्याच्यात मिसळून जायलाच हवे असे काही नाही. याचे आहे तसे रूप आपल्या अव्यक्त भावनांशी अगदी सहजतेने एकरूप होते. म्हणूनच शरीर कामात असले तरी तो येताच दबक्या पावलांनी बाजूला जात मन त्याच्या हातात हात मिसळून केव्हा येते हे आपल्यालाही समजत नाही. दूर असलो तरी त्याचा स्निग्ध स्पर्श सतत जाणवत राहतो. त्याची स्निग्ध सोबत सुखावत राहते. हलकेच त्याच्याशी कानगोष्टी सुरू होतात. पाहुण्यांच्या येण्यामुळे दिनक्रम बदलत नसला तरी वातावरण बदलते. एक प्रकारचा मोकळेपणा जाणवतो आणि साचलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली जाते. या लाडक्या पाहुण्याच्या आगमनानेही अगदी तसेच होते.

आजचा समाज पर्जन्यसुक्त गाणारा नाही. कुठलासा राग आळवल्यानंतर मेघांची गर्दी व्हायची आणि पाऊस कोसळू लागायचा या कल्पना त्याला भ्रामक आणि काव्यात्मक वाटतात. बेधुंद होऊन कोसळणाऱ्या पावसात समोरचा ‘धबाबा कोसळणारा तोय’ बघत समाधीस्त होणे त्याला शक्य नाही. वेगाने पळणाऱ्या कालचक्राशी स्पर्धा करण्यासाठी त्याला धावण्याचा वेग कायम राखणे गरजेचे आहे, नव्हे ते अपरिहार्यच आहे. म्हणूनच पावसाची संततधार त्याला सतावू शकते. जल ग्रहण करण्याची जमिनीची क्षमता अडवलेल्या या समाजाला मग काँक्रीटच्या रस्त्यांवर साठणाऱ्या तळ्यांचा त्रास होतो. सडपातळ होण्याच्या हट्टहासापायी शस्त्रक्रिया करून घेताना एखाद्याचे आतडे शिवून टाकावे तसेच काहीसे आहे हे! पण काँक्रीट ओतून आतडे शिवल्यानंतर हा जीवनरस वाट फुटेल त्या दिशेने जाणार नाही, तर काय करणार? तो तर आनंदाचे मळे फुलवण्यासाठी बरसला आहे. पण आपल्या करंटेपणाने सध्या तो बरसला की मळे नव्हे तर गटारे फुलतात. रंगीबेरंगी कमळ फुलवण्यासाठी पडलेल्या या पावसाच्या पाण्यात प्लास्टिक तरंगायला लागते. जागोजागी साठलेला कचरा पाण्यासवे वाहत जाऊन ठिकठिकाणी अडकतो आणि वेगाने धावणाऱ्या समाजाचे चक्र त्यात फसायला लागते. खरे तर हा गाळ त्याने स्वत:च निर्माण केला आहे. पण नाकातोंडात पाणी जायला लागले की, आपण पावसाच्या नावाने खडे फोडून मोकळे होतो. थोडक्यात, वर्षानुवर्षाच्या अनुभवावरूनही माणूस काही शिकलेला नाही आणि कदाचित शिकणारही नाही.

एकेकाळी सार्वत्रिक असणारी कृषीप्रधानता आता मर्यादित झाली आहे. अनेकांची पाळेमुळे अगदी नावापुरती जमिनीमध्ये आहेत. अन्यथा, अनेकांनी कुंड्यामधल्या मातीतच बोन्साय होऊन जगणे पसंत केले आहे. बहरललेला, आखीव-रेखीव आकार असणारा, मर्यादित, शोभेपुरती पाने-फुले असणारा आणि खाण्यायोग्य नसणारी फळे मिरवणारा हा बोन्सायरुपी खुंटित समाज एक प्रकारे अलिप्ततावादी आहे, स्थितप्रज्ञ आहे. पाऊस पडला नाही तर कृत्रिम पावसाची तजवीज करण्याच्या तयारीत असणारा आहे. कमी पावसाच्या प्रदेशातही हिरवाई बहरते आणि उरात पेट्रोलची धग बाळगणाऱ्या जमिनीवरही समृध्दीचे मळे फुलतात, अशी उदाहरणे देणारा आहे. अशांना ढासळणाऱ्या पर्यावरण संतुलनाशी आणि कमी होणाऱ्या पाऊस काळाशी काहीही घेणे देणे नाही. जंगलांचा गळा आवळताना, नदीनाल्यांच्या माना मुरगाळताना, डेरेदार वृक्षांवरुन यांत्रिक करवती चालवताना आणि इंच इंच जमिनीवर बांधकाम करुन काँक्रिटची जंगले उभारताना त्यांना अजिबात वैषम्य वाटत नाही. उगवलेला दिवस ओरबाडून जगण्याच्या वृत्तीने झपाटलेली ही माणसे भविष्याचा विचार करण्यास तयार नाहीत. त्यामुळेच आजचे पावसाचे गाणे कधी कधी केविलवाणे होऊन जाते.

सर्जनशीलतेचे दान घेऊन आलेल्या या बहराच्या काळातच अनेकांवर काळाची झडप पडते. पोखरुन पोकळ केलेल्या डोंगराचे कडे ढपल्या पडाव्या तसे कोसळतात, भराव घालून आत दाबलेल्या पाण्यात वाहने वाहून जातात. धोकादायक परिस्थितीत असूनही वर्षानुवर्षे दुर्लक्षित झालेल्या इमारती पावसाच्या तडाख्यात भुईसपाट होतात. नियमांचे पालन न करता उभारलेली अजस्त्र होर्डिंग कोसळून सांगाड्याखाली काहींचे जीव जातात तर काही जन्मासाठी जायबंदी होतात. उघड्या गटारातून वाहून गेलेल्यांचे मृतदेह दूरवर कुठे तरी सापडतात, तेव्हा त्या दुर्घटनेची चर्चा होते. साचलेल्या पाण्यात विजेचा प्रवाह उतरतो, एखाद्या खांबावर स्थिरावतो आणि काहींचे जीव घेऊनच थांबतो. पावसाला अशा अपघातांची आता सवय झाली असावी, कारण हे वर्षानुवर्ष घडत आहे. मात्र ही परिस्थिती तात्काळ बदलण्याची भाबडी आशा बाळगण्याचेही काही कारण नाही. अर्थातच या सगळ्यात ऋतूराजाची काहीही चूक नाही. हजार हातांनी दिले जाणारे दान घेताना एखाद्याची झोळीच तोकडी असेल तर तिथे दात्याचा दोष नाही तर तो अशा करंट्या माणसांचा आहे. तो नेहमीच्या उन्मादात येणार, छतावर ताडताड बरसणार, शेताशिवारात बेभान कोसळणार आणि सृजनाचे मळे फुलवणार. त्यासवे आपण फुलायचे की उन्मळून पडायचे हा ज्याचे त्याने ठरवावे.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

1 hour ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago