Tuesday, May 13, 2025

महामुंबईताज्या घडामोडीठाणे

Mumbai Rain : मुंबईकरांची तारांबळ! मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेला फटका

Mumbai Rain : मुंबईकरांची तारांबळ! मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेला फटका

मुंबई : अनेक दिवसांपासून लपंडाव खेळणाऱ्या पावसाने राज्यासह मुंबईत (Mumbai Rain) दमदार आगमन केले आहे. आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांतही पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे संपूर्ण परिसरात गारवा पसरला आहे. त्यामुळे मुंबईकर सुखावले आहेत, मात्र याच पावसाचा फटका मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या रेल्वेलाही (Mumbai Railway) बसला आहे. सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य (Central Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे जिल्हा परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यासोबत सकाळपासून पडणाऱ्या पावसाचा रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मुंबईत पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे या दोन्ही मार्गांना फटका बसला आहे. एकीकडे पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली आहे. तर दुसरीकडे मध्य रेल्वेवर ठाण्याहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे सकाळी ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने कामाला जाणाऱ्या नोकरदारांना उशिरा ऑफिस गाठावे लागले.



पश्चिम रेल्वेची वाहतूकही उशिराने


मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेलाही फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. विरारसहित पालघरमध्येही मुसळधार बरसणाऱ्या पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे.


पावसामुळे डहाणू-विरार लोकल सेवा २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. ट्रॅकजवळ पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंतची लोकल सेवा धीम्या गतीने सुरु आहे. तर पावसाचा जोर अजूनही कायम असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.



कल्याण, बदलापुरात तुफान पाऊस


उल्हासनगर, अंबरनाथ ,बदलापूर आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये अनेक दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कल्याणमध्ये मागील अर्ध्या तासापासून जोरदार पाऊस सुरू असल्याने काही रस्त्यांवर पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. कल्याण पूर्व परिसरात रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस ही कोंडी काढण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment