Monday, July 1, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखजय-पराजय अन् जो जीता वही सिकंदर...!

जय-पराजय अन् जो जीता वही सिकंदर…!

माझे कोकण : संतोष वायंगणकर

देशातील लोकसभा निवडणुका पार पडल्या. जनतेच्या अपेक्षेप्रमाणे देशात सत्तेवर एनडीए सरकार स्थापन झाले. मात्र, तरीही महाराष्ट्रातील निवडणुकीतील कवित्व काही थांबायला तयार नाही. मुंबईत रवींद्र वायकर ४८ मतांनी विजयी झाले. पोस्टल मतं यावेळी सर्वात शेवटी मोजली गेली. अर्थात पोस्टलची मोजणी देशभरात सर्वात शेवटी मोजण्यात आली. या मोजणीमध्ये रवींद्र वायकर यांना ४९ मतं मिळाली. यामुळे ईव्हीएम मतांमध्ये एकमताने आलेले अमोल कीर्तीकर साहजिकच ४८ मतांनी पराभूत झाले. हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या दस्तुरखुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वांना चांगलंच ठाऊक आहे; परंतु सतत अफवा पसरविणे आणि असत्यावर आधारित सातत्याने बोलत राहून खोटं रेटून नेण्याचा एक नवा फंडा महाराष्ट्राच्या राजकारणात उबाठा सेनेचे प्रवक्ते खा. संजय राजाराम राऊत यांच्या माध्यमातून रुजू पाहत आहे. निवडणूक काळात भारतीय संविधान धोक्यात आहे. म्हणून जनजागृतीच्या नावाखाली काँग्रेसी प्रचार करणारे निवडणुका झाल्यावर कुठे दिसेनासे झाले आहेत. भारतीय संविधान बदलण्याचं धाडस कोणीच करू शकत नाही. ज्या घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय घटना तयार करण्यात आली ती कोणीही सहजतेने बदलू शकेल याची सुतराम शक्यता नाही; परंतु निवडणुकीसाठी मतं मिळवण्यासाठी आणि मतं वळवण्यासाठी काही मुद्दे लागतात. त्यातलाच हा प्रकार होता हे सहजतेने लक्षात येत होते.

कोकणातील निवडणुका तशा नेहमीच महाराष्ट्रात फार वेगळ्या पद्धतीने चर्चिल्या जातात. कोकणातील निवडणुकांमध्ये नारायण राणे निवडणूक लढवत असले किंवा निवडणूक लढवत नसले तरीही केंद्रस्थानी राणेच असतात. राणे विरोधक सारे एकजुटीने निवडणुकीत उतरतात. जमेल तितकं राणेंना बदनाम करणारा, अफवा पसरविणारा प्रचार करतात. कोकणात अशा काही राणे कुटुंबीयांवर पुड्या सोडल्या जातात की, त्याचा विचार कोणीही करू शकत नाही. कोकणातील जनता ऐकते आणि सोडून देते. ७ मे रोजी कोकणातील लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले आणि ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. तेव्हा पहिल्या चार-पाच दिवसांत महाविकास आघाडीतील कोणत्याही कोकणातील आणि महाराष्ट्रातील कोणाही नेत्याने कोणतीही प्रतिक्रियाही दिली नव्हती. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने ठरवूनच नारायण राणे यांना विजयी केले होते. सिंधुदुर्गातील जनतेला दादांचा उत्साही आणि आनंदी चेहरा डोळ्यांत साठवून ठेवायचा होता. ही वस्तुस्थिती आहे. नारायण राणे यांच्या विजयात ज्येष्ठ शिवसैनिकांचाही वाटा आहे. १९९० च्या काळातील शिवसैनिक जो शिवसेनेशी प्रामाणिक आणि कट्टरही आहे. जो राणेंसोबत काँग्रेस, भाजपात गेला नाही; परंतु वैयक्तिकरीत्या नारायण राणे यांच्यावर प्रेम करणारा शिवसैनिक यावेळी बोलून दाखविणारा दिसला. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण या मतदारसंघात मायनस राहूनही राणेंचा विजय सोपा झाला.

राजकारणात जय-पराजय स्वीकारायचे असतात. बऱ्याच वेळा यश मिळालं की, त्याला बाप हजार असतात. श्रेय घ्यायला ज्यांनी काहीच केलेलं नसतं तो देखील हार घालायला सर्वात पुढे असतो हे राजकारण, समाजकारणात अनेकवेळा घडत असते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात खा. नारायण राणे निवडून आल्यानंतर माजी खा. विनायक राऊत, खा. संजय राऊत कोकणात मतदारांना पैसे दिल्याचा आरोप करत आहेत. खरंतर निवडणुका पार पडल्या की, ‘धनशक्ती’च्या नावाने गळे काढले जातात. यावेळी तेच घडतंय. बरं यातली खरी गंमत अशी आहे आज ज्या जनतेवर माजी. खा. विनायक राऊत, खा. संजय राऊत, आ. आदित्य ठाकरे कोकणातील जनतेने पैसे घेऊन मतदान केल्याचा आरोप करतात. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत माजी खासदार विनायक राऊत यांना निवडून देणारी जनता म्हणजे हेच मतदार होते. त्यावेळी माजी खा. विनायक राऊत पैसे वाटून निवडून आले असे समजायचे काय? या सगळ्यांमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे विजयाचा आनंद घेता यायला हवा आणि पराभव देखील स्वीकारता आला पाहिजे. पचवता यायला हवा. जय-पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जनतेच्या दरबारात राहून जेव्हा मत मागता तेव्हा जनता त्यांना योग्य वाटणाऱ्या उमेदवाराच्या बाजूने मतदान करते. पैसे दिले म्हणून लोक मत देतील असं घडत नाही. जर तसं घडलं असतं तर या देशातील श्रीमंत उद्योगपती निवडणुकीत उभे राहिले असते.

कोकणातील पालघर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या चारही लोकसभा मतदारसंघांत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची हार झाली आहे. महायुतीच्या उमेदवारांना या निवडणुकीत कोकणाने निवडून दिले आहे. पाच लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा झेंडा कुठेही लागू शकला नाही. हा महायुतीलाच यश मिळाले. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे उमेदवार कोकणात विजयी झाले. याचा अर्थ कोकणाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला नाकारले हे तर सत्यच आहे ना! अखंड कोकणातून एकही शिवसेनेचा उमेदवार निवडून येऊ शकला नाही. उबाठा सेनेला कोकणाने का नाकारले या कारणांचा शोध घेणे आवश्यक ठरते. आजवर कोकणाने खरंतर शिवसेनेचीच पाठराखण केली. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचं कोकणचं एक वेगळं नातं होतं. जेव्हा जेव्हा काही कोकणासाठी द्यायची वेळ यायची तेव्हा शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच वेगळा विचार केला नाही, तर प्राधान्यक्रमाने कोकणचा विचार केला म्हणूनच कोकणानेही शिवसेनेला भरभरून दिले; परंतु दुर्दैवाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होऊनही कोकणाला देताना हात आखडता घेतला. काही केलं नाही. काही दिलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. माजी खासदार विनायक राऊत यांनीही मागील १० वर्षांत कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला फक्त विरोध करण्याचे काम केले. विरोधाची भूमिका घेतल्यावर मतांचं राजकारण करता येतं. त्यासाठी प्रत्येक प्रकल्पासाठी विरोधाचीच भूमिका माजी खा. विनायक राऊत यांनी घेतलेली दिसेल. ज्या जनतेने दोन वेळा माजी खासदार विनायक राऊत यांना निवडून देते तीच जनता २०२४ मध्ये नारायण राणे यांना निवडून देते. यामुळे निवडणुकीत जय-पराजय असतोच. एक मात्र निवडणूक निकालात ‘जो जीता वही सिकंदर’ हे अंतिम सत्य सर्वांना मान्य करावंच लागतं. स्वीकारावं लागतं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -