“आटेल इंद्रायणी, कोसळेल भिंत...”

  26

ऋतुराज - ऋतुजा केळकर


“आटेल इंद्रायणी...
कोसळेल भिंत ...
विझेल ज्योत जगण्याची...
जर वागलास बेधुंद... ”


लिहिता लिहिता माझे हात थांबले. समोर इंद्रायणीचं अथांग संथ पाणी, संध्याकाळची कातर वेळ आणि त्या पाण्यात पाय टाकून बसलेली मी. कधी कधी अशी अथांगता, अशी शांततासुद्धा अंगावर येते. मनात आलं आज कालानुरूप बदलेल. हे इंद्रायणीचं रूपडं आजही तितकंच देखणं आहे, जितकं तेव्हा होतं. जेव्हा कधी तरी याच नदीपात्राच्या काठी अशाच निरव शांततेत ज्ञानेश्वर माऊलींनी ध्यान लावलं असेल. संतशिरोमणी तुकोबांनी त्यांच्या खड्या आवाजात गोड अभंगांतून विठाईला साद घातली असेल. क्षणभर असं वाटलं, या केशरी सांजेला जरा मनापासून कान देऊन, वातावरणाचा थांग घेतला, तर माऊलींचा तो ॐकार वाऱ्याबरोबर हवेतून मनाच्या गाभाऱ्यावर अलवारपणे उमटत जाईल. या ओलसर हवेच्या शिरशिरत्या धुक्यातून या संधीकाली रांगोळीसमोर ठेवलेल्या पणत्यांसारखे पावन तुकोबांचे आर्त अभंग कुंडलिनी प्रसन्न करणाऱ्या झुळकेसारखे कानात गुंजत राहतील.


किती सुंदर, गोड आणि वेगळे क्षण असतील ना ते? आपल्या आंतरिक नेत्रांनी अनुभवलेले ते शिवतत्त्व. ज्याचा कधीही नाश होऊ शकत नाही, तो हा ‘अविनाशी अभ्यंकर!’ केवळ एक दिव्य प्रकाश शलाका! जेव्हा ती शलाका तेजाळते, तेव्हा “आभाळाचं आकाश होतं.” ‘आभाळ’ म्हणजे ज्यात ‘भय’ आहे ते आणि ‘आकाश’ म्हणजे ज्यात आशेचा सुखाचा उदय होतो, असे प्रकाशमय अंगण.


श्रद्धा, भक्ती आणि प्रेम यांचा त्रिवेणी संगम म्हणजे ‘ईश्वर.’ आज जोवर आपण सत्ताधीश आहोत म्हणजेच जोवर आपल्याकडे खुर्ची आहे, तोवर आपल्याप्रति साऱ्यांचीच ‘श्रद्धा’ असते; पण श्रद्धा म्हणजे अशी निरातीश, निरामय, अनावर भावना की जी जीवनाच्या बाजारात रतिमात्र बदलू नये.


तेच भक्तीचे आहे. बाह्य दृष्टीने केलेली स्तुती म्हणजेच ‘भक्ती’ होय. चेतनारुपी आत्म्याची एकसंधता जेथे होते, त्या कल्पनातीत परमात्म्याला शरण जाऊन शब्दांत बांधू पाहणं आणि त्यातूनच त्याला आपल्या हृदयाच्या कोंदणात जपू पाहणं म्हणजे ‘भक्ती’ होय आणि शेवटी येते, ते ‘प्रेम.’ प्रेम या शब्दाची व्याप्तीच इतकी मोठी आहे की, काय विचारता.


अगदी माझ्या शब्दात प्रेम म्हणजे...
“ढाई अक्षर प्रेम के ...
जान सका न कोई ...
मिरा भई सदा सुहागन...
और शबरी...
‌‍होकार रह गयी दासी...”
प्रेम ही एक अशी भावना आहे की, जी पाकळीसम नाजूक आहे. ‘परमेश्वराच्या पायांशी रत झालेले मन’ म्हणजे प... रे... म...‘प्रेम.’ ही माझी प्रेमाची व्याख्या बरं. आता तो परमेश्वर कुणाला कुठल्या रूपात दिसेल, ते मात्र नाही सांगता येणार. कारण कुणाला तो मात्या-पित्यात दिसतो, तर कुणाला प्रियकरात. म्हणूनच मी म्हणेन की, आपल्यातील आत्मज्ञानाचा अनुभव म्हणजेच ‘ईश्वरतत्त्व.’ या ओयासीसच्या प्राप्तीसाठी दशदिशांना भटकंती करून काय फायदा.


इथे मला आठवते ती, ‘म्हातारीच्या खुलभर दुधाची कथा.’ अखिल प्राणिमात्रांचा आत्मा तळमळत ठेवून, हंडेच्या हंडे शिवपिंडीवर अभिषेक झाला, पण गाभारा भरला नाही, पण तो भरला तो या म्हातारीच्या खुलभर दुधाने. कारण तिने कुणाचीही हाय घेतली नाही. आपली सारी कर्तव्य पूर्ण करून, मगच ती मंदिरी ते खुलभर दूध घेऊन गेली.
तसेच मानवाचा जन्म हा वारंवार मिळत नाही, त्यामुळे या जन्माचे सोने करा. कुणाच चांगलं करता नाही आलं, तरी हरकत नाही, पण कुणाच स्वप्नातही वाईट करू नका.


इवल्याशा घंटानादाने घनगर्जना होत ही नसेल, पण त्यातून निघणाऱ्या साऊल नादाने अखिल नादब्रह्मास भुरळ घालण्याची ताकद आहे. झालंच तर सौम्यपणे देव्हाऱ्यात तेवणाऱ्या निरांजनाने विजेच्या लखलखाटाप्रमाणे प्रकाश पडतही नसेल, पण त्यांच्या त्या प्रकाश शलाकेत कणाकणाला जागृती देण्याची, तसेच अशांत मनास शांत करण्याची ताकद आहे, हे नक्की.


घनगंभीर पावसात सप्तरंगी पिसारा फुलवून नाचणाऱ्या मयुरापुढे लुटुलुटु मान हलवीत, पानाआड दडून राहिलेला पारव्याचे रूपडे ही नयनरम्य असते नाही का?


म्हणूनच ऋतूचक्रातील आपल्याला नेमून दिलेलं काम चोख करून. निष्पाप, निर्धास्त भाबडेपणाने आपली कर्तव्ये पार पाडत राहा. मग पाहा हजारोंनी यज्ञांचे पुण्य तुमच्या पदरात सहजगत्या पडेल आणि युगे अठ्ठावीस विटेवर उभा राहणारा तो विठ्ठल ही तुमच्या भक्तीचा मळा फुलविण्यास तुमचा दास झाल्याशिवाय राहणार नाही.


अखेरीस इतकेच सांगेन की, ‘कर्म हाच ईश्वर आहे’ याची जाणीव ज्याला झाली ना, तो या जीवनयात्रेचा खरा वारकरी होऊन, या गहन आणि गूढ अशा षडरिपूच्या गुहेतून पार होऊ शकतो. तसेच लौकिक दुनियेत समज-गैरसमजाचे पेच त्याला तार्किकतेने सहजगत्या सोडवता येतील. मग अखेरीस जीवनाची ज्योत आपली ध्येयपूर्ती झाल्यावर विझता विझता आपल्या सौंदर्यसन्मुख, पुनर्निर्मितीच्या प्रभावी कार्य सिद्धीच्या पखाली पुढे नेण्यासाठी आपले अनेक अनुयायी सहज सज्ज होतील, यात संशय नाही, हेच खरे.

Comments
Add Comment

Horoscope: जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार या राशींचे अच्छे दिन, होणार प्रचंड धनलाभ

मुंबई: ३० जूनपासून नव्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. हा आठवडा ३० जून ते ६ जुलैपर्यंत असणार आहे. ज्योतिष

Vastu shastra: ही कामे तुम्हाला बनवू शकतात कंगाल, कधीच करू नका

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीच्या कर्मावर त्याला त्याचे फळ मिळत असते. काही कामे केल्याने नकारात्मक ऊर्जा

शरीर साक्षात परमेश्वर

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै अनंत कोटी ब्रह्मांड, अनंत रूपे अनंत वेषे अशी परमेश्वराची रूपे आहेत. अनंत कोटी

मंत्र वारीचा

ऋतुराज : ऋतुजा केळकर मंत्र वारीचा संतांच्या पायधूळीतून भिजतो मातीचा जीव... शब्दांच्या ओवाळणीतून गुंफतो भावाचा

स्वामी विवेकानंद : एक थोर युगपुरुष

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य ज्यांच्या विचारांनी सतत नवी ऊर्जा मिळते असे युवकांचे प्रेरणास्थान व आपल्या

ब्रह्मर्षी भृगू

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी महर्षींणा भृगुरहं गिरामस्येकमक्षरम्। गीता अ.१०,२५ भगवद्