रायगडावरील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना जबरदस्त टोला
खुर्च्या येतील जातील, पण आम्ही खुर्च्यांसाठी लाचार होणार नाही : मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : दुर्गे दुर्गेश्वर रायगडावर (Raigad) ३५१ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तिथीनुसार झालेल्या या राज्याभिषेक सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) देखील हजर होते. यावेळी शिवभक्तांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जिजाऊ मासाहेब की जय असा जयघोष यावेळी सुरू होता. त्याचवेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर तोफ डागली. विरोधकांना एकावर एक जबरदस्त टोले लगावत त्यांनी केलेलं भाषण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, आषाढी एकादशी जवळ आली आहे. यानिमित्ताने हजारो वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरीकडे येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारही सज्ज झालं आहे. राज्य सरकारने प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये देण्याचा निर्णय दिला आहे. वारकऱ्यांसाठी ट्रोल फ्री केला आहे. सगळं केलं आहे. समोरच्यांना पोटदुखी झाली, उलट्या झाला, तर त्यांना बाळासाहेब ठाकरे दवाखाना आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.
पुढे ते म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्य शिव छत्रपती यांच्या आदेशावरून चालणारे आहे. त्यांच्याच आशिर्वादाने राज्य पुढे जात आहे. तसेच काम सरकार करते. स्वराज्य शब्दामुळे मराठ्यांना ताकद आली. लोकमान्य टिळकांनी पण हाच शब्द वापरला. रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागू नये, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश होता. आम्ही देव, देश, धर्म आणि रक्षण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेत आहे. सुधीरभाऊ वाघ नखे आणणार आहेत. मोदीजी पण मदत करत आहेत’, अशी माहिती त्यांनी दिली.
आम्ही खुर्च्यांसाठी लाचार होणार नाही
‘मंदिर वही बनायेंगे, पर तारीख नही बतायेंगे, म्हणणाऱ्यांची थोबाडं बंद करण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं. युनेस्कोच्या जागतिक वारसामध्ये सातासमुद्रापार आपल्या १८ किल्ल्यांचा इतिहास गेला आहे. गड किल्ल्यांच्या रक्षणाचं काम सरकार करेल. मी कमी बोलतो आणि काम अधिक करतो. तुमच्या मनात जे आहे, तेच माझं पण स्वप्न आहे. पण योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम करणार आहे. खुर्च्या येतील आणि जातील, पण आम्ही खुर्च्यांसाठी लाचार होणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. हे सरकार तुमचं आहे. सर्वसामान्यांचं आहे. सर्वांना न्याय देण्याचं काम करत आहे, असं शिंदे पुढे म्हणाले.
विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा शिवभक्तांनी उचलून धरला
रायगडावर विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा शिवभक्तांनी उचलून धरला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या भाषणावेळी उत्तर दिले. सध्या विशाळगड प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, पण करेक्ट कार्यक्रम केला जाणार आहे. शिवभक्तांच्या भावनांची दखल घेतली जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी रायगडावर केलेल्या भाषणात दिले.
तसेच रायगडच्या विकासासाठी आणि शिवसृष्टी उभारण्यासाठी सरकार देत असलेला निधी याचा उल्लेख देखील यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणादरम्यान केला. आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे ही घोषणा संपूर्ण राज्याभिषेक सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिली जात होती. तसेच रायगडमधील महाड येथील गोहत्या वरील फलक देखील झळकवले जात होते.