
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सुपर ८मधील सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजवर ८ विकेट राखून विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ४ बाद १८० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने हे आव्हान ८ विकेट राखत पूर्ण केले.
सलामीवीर फिल सॉल्टच्या नाबाद ८७ धावा तसेच जॉनी बेअरस्ट्रॉच्या नाबाद ४८ धावांच्या जोरावर इंग्लंडने हे आव्हान १७.३ षटकांत पूर्ण केले. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने २५ धावा केल्या. तर मोईन अलीला १३ धावा करता आल्या.
सॉल्ट आणि बेअरस्ट्रॉने जबरदस्त फटकेबाजी करताना इंग्लंडला हा विजय साकारून दिला. वेस्ट इंडिजचे गोलंदाज मात्र विकेट मिळवण्यात अयशस्वी ठरले.
वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचा संघ सुपर ८ मध्ये दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत. या ग्रुपमध्ये बुधवारी दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेला १८ धावांनी हरवले. प्रत्येक ग्रुपमध्ये ४ संघ आहेत. या ग्रुपमधील दोन अव्वल संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.
१० षटकांत ठोकल्या ८२ धावा
इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध सुपर ८च्या सामन्यात पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय चुकीचा ठरतोय की काय असे वाटत होते. कारण त्यावेळेस वेस्ट इंडिजने १० षटकांत विकेट न गमावता ८२ धावा ठोकल्या होत्या.
वेस्ट इंडिज ज्या वेगाने धावा करत होता त्यामुळे ते २००चा आकडा पार करतील असे वाटत होते. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी खेळाच्या दुसऱ्या हाफमध्ये कॅरेबियन फलंदाजांवर लगाम लावला. यामुळे त्यांना २० षटकांत १८० धावा करता आल्या.