
नाटकातून भगवान राम-सीता यांचा अपमान केल्याचा आरोप
मुंबई : आयआयटी मुंबईच्या आठ विद्यार्थ्यांना (IIT Bombay Student) दंड ठोठावण्यात आला आहे. संस्थेच्या वार्षिक कला महोत्सवात रामायणावर (Ramayan) आधारित नाटकातील मुख्य पात्राला अपमानित पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यासंदर्भात काही विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती. हा प्रकार संस्थेच्या वार्षिक कला महोत्सवात घडला होता. या प्रकरणी आता शिस्तभंग कृती समितीच्या शिफारशीनंतर नाटक सादर केलेल्या विद्यार्थ्यांमधील पदवीचं शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला १ लाख २० हजार रुपयांचा दंड तर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
या वर्षी ३१ मार्च रोजी हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला होता. 'राहोवन' नावाचं नाटक या विद्यार्थ्यांनी सादर केलं होतं. रामायणावर (Ramayana) कथितरित्या आक्षेपार्ह नाटकाचं सादरीकरण केल्याप्रकरणी आयआयटी मुंबईने विद्यार्थ्यांना दंड ठोठावला (Students Were Fined). हा दंड थोडा थोडका नसून तब्बल १.२० लाखांचा आहे.
नेमकं काय घडलं?
परफॉर्मिंग आर्ट्स फेस्टिव्हल किंवा पीएएफ हा आयआयटी-बॉम्बेचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. यावर्षी मार्चमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ३१ मार्च रोजी कॅम्पसच्या ओपन-एअर थिएटरमध्ये हे नाटक सादर करण्यात आलं होतं. पुढील काही दिवसांत, एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये रामायणातील तथ्यांसह नाटकातील क्लिपिंग्ज दर्शविल्या गेल्या, कलात्मक स्वातंत्र्यावर वादविवाद झाला आणि या नाटकातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, नाटकाला पाठिंबा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की, हे नाटक प्रगतीशील होतं, त्याचे सर्वांनी कौतुक केलं.
विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांच्या दंडाची वसुली
नाटकात विद्यार्थ्यांनी राम आणि सीता यांची पात्रं आक्षेपार्ह पद्धतीने मांडल्याचा आरोप करण्यात आला होता. या नाटकाबाबत केलेल्या तक्रारींमध्ये या नाटकामुळे आपली संस्कृती आणि धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचं म्हटलं आहे. या तक्रारींनंतर शिस्तपालन समितीची बैठक बोलावण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांविरोधात तक्रारी करण्यात आल्या आहेत, त्यांनाही या बैठकीत बोलावण्यात आलं. या कालावधीत बराच विचारविनिमय केल्यानंतर समितीने कठोर कारवाईचा निर्णय घेतला. या अंतर्गत वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून १.२० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ज्युनियर विद्यार्थ्यांना ४० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. शिवाय वसतिगृहाच्या सुविधांपासूनही त्यांना वंचित ठेवण्यात आलं. दरम्यान, याप्रकरणी आयआयटी मुंबईकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.