Friday, July 19, 2024

वियोग

इंद्रियांना होणारं शरीरसुखाच्या वियोगाचं दुःख! आपली अनेक इंद्रियं असंख्य प्रकारच्या सुखांचा अनुभव घेत असतात, विषयांच्या मागे धावत असतात; पण जर ‘सात्त्विक सुख’ मिळवायचं असेल, तर इंद्रियांना या सुखापासून, विषयापासून तोडावं लागतं. हे आचरण कठीण आहे; पण ते गरजेचं आहे.

ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

चक्रवाक पक्ष्यांच्या जोड्याची ताटातूट केली असता अथवा गायीला पान्हा फुटल्यावर कासेपासून माघारी ओढले असता किंवा क्षुधितास पानावरून उठवून लाविले असता..’ (ओवी क्र. ७८५)
‘अथवा आईपुढून एकुलते एक लेकरू काळाने ओढून नेले असता किंवा माशास पाण्यातून काढले असता जसे दुःख होते…’
ही ओवी अशी –

‘पैं मायेपुढौनि बाळक।
काळें नेतां एकुलतें एक।
होय कां उदक।
तुटतां मीना॥’ ओवी क्र. ७८६

‘तसे विषयांचे घर सोडते वेळेस इंद्रियांना युगान्त ओढवल्याप्रमाणे दुःख होते; परंतु वैराग्यसंपन्न शूर तेही दुःख सहन करतात.’

‘ज्ञानेश्वरी’मधील अठराव्या अध्यायात आलेल्या या अतिशय अर्थपूर्ण ओव्या आहेत. इथे सांगण्याचा विषय़ आहे ‘सात्त्विक सुख.’ ते सांगताना सुरुवातीलाच माऊली सांगतात की, दिवा लावायचा तर आधी विस्तव पेटवण्यासाठी धुराचा त्रास सोसावा लागतो. त्याप्रमाणे आत्मसुखाची प्राप्ती करून घ्यायची तर यम, दम
(मनावर नियंत्रण) आदी साधनांचे दुःख सोसावे लागते.

No pain no gain हे आपण ऐकलं आहे.
इथे कोणतं दुःख सहन करावं लागतं? वियोगाचं. इंद्रियांना विषयांपासून (शरीरसुखापासून) दूर व्हावं लागतं. ही ताटातूट स्पष्ट करण्यासाठी माऊलींनी दिलेली ही दृष्टांतमाला! किती नेमकी! किती सार्थ!

यातील पहिला दाखला चक्रवाक पक्ष्यांच्या जोडीचा. हे पक्षी म्हणजे जणू प्रेमीयुगुल होय. ते एकमेकांसोबत असतात; परंतु त्यांची ताटातूट केली तर! तर त्यांना जे दुःख होईल, ते भयंकर असेल. दुसरा दृष्टांत गाय आणि वासरू यांचा आहे. आता पाहा, पहिल्या दाखल्यात प्रेमभावना आहे, तर या दृष्टांतात गाय आणि वासरू यांच्यातील वात्सल्यभाव आहे. खरं तर वात्सल्याचा कळस आहे. की गाय कशी? तर पान्हा फुटलेली. म्हणजे जेव्हा त्या गायीत वासराच्या प्रेमाने तुडुंब भरलेलं दूध आहे. अशावेळी गाय आणि वासरू यांना वेगळं केलं तर? म्हणजे ही उत्कटता आहे या नात्यातील, या प्रसंगातील! ती इथे चित्रित केली आहे.

पशुपक्षी यानंतरचा दाखला मानवी संबंधातील आहे. त्यातही दोन वेगवेगळ्या छटा आहेत. भुकेलेल्याला पानावरून उठवणं किंवा आईचं एकुलतं एक मूल काळाने हिरावून नेणं! दोन्हींतही दुःख आहे; पण मृत्यूच्या दुःखामध्ये परिसीमा आहे. पुढे ज्ञानदेव आपल्याला जलचर सृष्टीकडे नेतात. माशाला पाण्यातून बाहेर काढलं की दुःख होतं. किती? की तो क्षणभरदेखील जिवंत राहू शकत नाही.

या सर्व दृष्टांत-सृष्टीत किती विविधता आहे! पशुपक्षी, माणूस आणि मासा! या साऱ्या दाखल्यांतून समजावण्याचं तत्त्व आहे-‘वियोगाचं दुःख.’ इंद्रियांना होणारं शरीरसुखाच्या वियोगाचं दुःख! आपली अनेक इंद्रियं असंख्य प्रकारच्या सुखांचा अनुभव घेत असतात, विषयांच्या मागे धावत असतात; पण जर ‘सात्त्विक सुख’ मिळवायचं असेल, तर इंद्रियांना या सुखापासून, विषयापासून तोडावं लागतं. हे आचरण कठीण आहे; पण ते गरजेचं आहे. हे तत्त्व अर्जुनाच्या निमित्ताने ज्ञानदेव आपल्याला समजावतात, या दृष्टांतमालेतून. ते तत्त्व आपल्या मनावर ठसवतात. म्हणून आपला मार्ग उजळ होतो. यासाठी ज्ञानदेवांना विनम्र वंदन!

manisharaorane196@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -