Saturday, April 19, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीभक्त संकटी पडता झेलूनी घेसी वरचे वरी हो...

भक्त संकटी पडता झेलूनी घेसी वरचे वरी हो…

गजानन महाराज – प्रवीण पांडे, अकोला

वनीता कुलकर्णी नाशिक यांना आलेली श्री गजानन महाराजांची दिव्य अनुभूती. मलादेखील श्री गजानन महाराजांचे दोन अगदी लक्षात राहतील, असे अनुभव आले आहेत. त्यातील एक अनुभव सांगते. मी माझा भाऊ, वहिनी आणि तिची मुलगी व माझी मुलगी असे सर्व जण पुण्याला लग्नाला गेलो होतो. रात्री साधारण ८ वाजता चाकण सोडलं. रात्रीच्या १० ते ११ या वेळेत जेवण केलं व साधारण १२ वाजताच्या आसपास संगमनेरच्या पुढे अचानक काय झाले समजले नाही. आमची गाडी दोन-तीन पटल्या घेऊन, १० फूट खड्ड्यात पडली. मी आणि माझी भाची दोघीही गाडीच्या दरवाज्यातून बाहेर फेकलो गेलो व बेशुद्ध पडलो. वहिनी गाडीतच बेशुद्ध होती. भाऊ व माझी मुलगी फक्त शुद्धीत होती. भावाच्या माडींच्या हाडाचे दोन-तीन तुकडे झाले होते. मुलीला पण हाताला फ्रॅक्चर झाले होते, अशा परीस्थितीत मुलीने पाहिले मामा काही करू शकत नाही. आपल्यालाच काही तरी करायला पाहिजे. तिने गजानन महाराजांचा धावा सुरू केला.

एवढा खोल खड्यातून ती फक्त महारांजांचेच नाव घेत, त्या मोठ्या खड्ड्यातून वरती आली. खड्डा असा होता की, जो चांगल्या माणसाला सुद्धा चढून येणे अवघड होईल. ती वर येऊन येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांना मदतीकरिता हात दाखवित होती; पण कुणीच गाडी थांबवली नाही. कारण रस्त्यावर ती एकटीच दिसायची. तीदेखील रक्तबंबाळ झाली होती. शेवटी पहाटे ५ वाजता एक ट्रकवाला थांबला व त्याने मदत केली. पण अशा एकाकी अवस्थेत एवढ्या रात्री महाराजांनी माझ्या मुलीला काही होऊ दिले नाही. त्यानंतर महिनाभर ती हॉस्पिटलमध्ये होती. यथावकाश आम्ही चौघे बरे झालो; पण माझी लाडकी वहिनीचा अपघातात मृत्यू झाला. या प्रसंगातून सावरता येणे शक्यच नव्हते. पण माझी मुलगी म्हणते की, “मला तो प्रसंग संपूर्णपणे जसाच्या तसा आठवतो. पण मी त्या खोल खड्ड्यातून वरती कशी आले आठवत नाही. बाकी लोकांना रात्रभर मदत मागत होते. हे सर्व आठवतेय.’’ आम्हा सर्वांना हाॕॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हा सर्व प्रसंग अगदी तिच्यासमोर उभा आहे. फक्त एवढ्या मोठ्या खड्ड्यातून वरती कशी आले, तेच समजत नाही. हा एक मात्र चांगलं आठवतं की, ती महाराजांचा जप करत होती.

महाराजांच्या कृपेने आता १४ जुलैला तिचे लग्न आहे. जावई खूप छान मिळाले.
हा प्रसंग आठवला म्हणजे श्री महाराजांनी गणू जवऱ्याला सुरुंग असलेल्या विहिरीमधून कसे सुखरूप वाचविले तो प्रसंग व श्रींच्या मंदिराचे बांधकाम सुरू असताना एक मजूर झोक जाऊन शिखरावरून पडला असता, श्री महाराजांनी त्याला हात देऊन, अलगद खाली ठेवले. तसेच श्री माधव मार्तंड जोशी जमिनीची मोजणी करण्याकरिता कळंब कसूर ग्रामात आले असताना, शेगावी दर्शनाला जात असताना, नदीच्या महापुरातून रक्षण केले, हे सर्व प्रसंग डोळ्यांसमोर तरळून जातात. हे झाले पोथीत उल्लेख असलेले प्रसंग; पण भक्तांना श्रींमहाराजांच्या अनुभूती नित्य अनुभवला येत असतात. मी शक्य होईल, तेव्हा श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करून, महराजांच्या भक्तीचा आनंद घेत असते.

जय श्री गजानन माऊली

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -