Monday, July 22, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीचोळप्पा सत्त्वपरीक्षा

चोळप्पा सत्त्वपरीक्षा

समर्थ कृपा – विलास खानोलकर

चोळप्पा हा महाराजांचा परमभक्त होता. त्याची महाराजांवर अपार भक्ती होती. घरातली भांडी-कुंडी विकून, तो भक्तिभावाने श्री स्वामींची सेवा करीत असे. त्यांना दोन्ही वेळेला जेवू घालीत असे. चोळप्पाची बायको वैतागायची; पण चोळप्पा आपल्या निर्धारावर ठाम होता. महाराजही त्याच्या घरीच राहत व तेथेच जेवत असत.

परमेश्वर भक्तीची कसोटी पाहत असतो. चोळप्पाच्या बाबतीतही अगदी तसेच झाले. स्वामी नानापरीने चोळप्पाला त्रास देऊन, त्याची परीक्षा पाहत असत. चोळप्पाच्या मुलांचे अंथरुण पळव, स्वयंपाकासाठी चोळप्पाच्या बायकोने चूल पेटवली की पाणी ओतून ती विझव, घरातल्या वस्तूंची नासधूस कर असे प्रकार स्वामी करत असत. पण याचा चोळप्पाच्या मनावर जराही परिणाम होत नसे. तो निष्ठावंत होता.

एकदा कुठला तरी सण होता. त्यासाठी चोळप्पाच्या पत्नीने पुरणपोळ्या करून, त्या परातीत झाकून ठेवल्या होत्या. काही वेळाने दाराशी कुणी तरी भिक्षुक आला. महाराजांनी पुरणपोळ्यांची परात उचलली आणि त्या भिक्षुकाला द्यायला निघाले. ते बघून चोळप्पाची पत्नी लगबगीने महाराजांच्या मागे धावली. तिने मुश्किलीने पुरणपोळ्यांची परात महाराजांच्या हातून परत मिळवली. दारी आलेल्या याचकाला एक पुरणपोळी देऊन, त्याची रवानगी केली.

एकदा महाराज काही कारणाने संतापले होते. रागाच्या भरात महाराजांनी घरातल्या लोकांना काठीचा धाक दाखवून घराबाहेर काढले. सारे जण घरासमोरच्या झाडाखाली पारावर बसले. परोपरीने समजावून देखील महाराजांचा राग जात नव्हता. चोळप्पाचा मुलगा कृष्णा हा देखील स्वामीभक्त होता. त्यानेही विनवणी केली, पण तरी महाराजांचा राग गेला नाही.

चोळप्पा काही कामानिमित्ताने बाहेर गेला होता. त्याला ही घटना माहीत नव्हती. दुपारी तो घरी परतला, तेव्हा त्याला ही घटना समजली. मध्यान्हाची वेळ झाली, तरी चोळप्पाचे कुटुंबीय घराबाहेरच होते. भुकेने सारे व्याकूळ झाले होते, पण स्वामी कुणाला घरात घुसू देत नव्हते.

चोळप्पा लगबगीने स्वामींकडे गेला, पण स्वामी त्यालाही जुमानत नव्हते. हात-पाय जोडून, विनवणी करून चोळप्पाने श्री स्वामींची समजूत काढली. तेव्हा कुठे स्वामींनी सर्वांना घरात येऊ दिले.
एकदा स्वामी आपल्या नादात झपझप चालत, अक्कलकोट नजीकच्या एक कोसावरील बसापूर नावाच्या गावाकडे निघाले होते.

चोळप्पाही त्यांच्या मागे मागे जात होता. काही अंतर चालून गेल्यानंतर स्वामींच्या ते लक्षात आले. त्यांनी चोळप्पाला हाकलून दिले, पण चोळप्पा परत त्यांच्या मागे मागे जाऊ लागला. चोळप्पाचे एक वैशिष्ट्य असे होते की, जिथे जिथे स्वामी जात असत, तिथे तिथे तो त्यांच्या मागे जात असे. चोळप्पा ऐकत नाही, हे पाहून स्वामी चिडून चोळप्पाला म्हणाले, “अरे आम्ही साधू-संन्यासी आहोत. आम्ही कुठेही जाऊ कुठेही राहू. तुला काय करायचे आहे? आमच्या मागे-मागे कशाला येतोस? चल, जा इथून चालता हो!” “नाही जाणार!” चोळप्पा निर्धाराने म्हणाला, “मी घरदार सोडीन, कुटुंबीयांचा त्याग करीन, पण तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही.”

ते ऐकून स्वामींना त्याची दया आली. त्यांच्या सत्त्वपरीक्षेत चोळप्पा उत्तीर्ण झाला होता. आपल्या पायातल्या खडावा काढून, चोळप्पाच्या अंगावर भिरकावून स्वामी म्हणाले, “या घे आमच्या खडावा! त्या घरी नेऊन, त्यांची पूजा कर! त्यातच तुझे कल्याण आहे!“ जा आता.”

महाराजांच्या पादुका घेऊन चोळप्पा घरी आला. देव्हाऱ्यात त्याने पादुकांची स्थापना करून भक्तिभावाने त्यांची पूजा करू लागला. गावभर ही वार्ता पसरली. अनेक सेवेकरी आपले दुःख दूर व्हावे म्हणून स्वामींच्या पादुकांच्या दर्शनाला येऊ लागले. त्यांची दुःखे दूर होऊ लागली. ते बघून चोळप्पाही समाधानी व्हायचा.

प्रदक्षिणा

ध्यन्य धन्य हो प्रदक्षिणा या सद्गुरूरायाची।
झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची।।१।।

गुरूभजनाचा महिमा न कळे अगमानिगमासी।
अनुभवि ते जाणती जे गुरूपदिंचे अभिलाषी।।२।।

पदोपदी अपार झाल्या पुण्यांच्या राशी।
सर्वहि तीर्थे घडली आम्हा आदि करूनी काशी।। ३।।

मृदंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती।
नामसंकिर्तने नित्यानंदे नाचताती।।४।।

कोटी ब्रह्महत्या हरती करिता दंडवत।
लोटांगण घालिता मोक्ष लागे हो पायासी।।५।।

प्रदक्षिणा करूनी देहभाव हरविला।
श्रीरंगात्मज स्वामी पुढे उभा राहिला।।६।।

vilaskhanolkarkardo@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -