रत्नागिरी : समुद्रातील मासेमारी बंद असल्यामुळे, सध्या खाडीच्या माशांना मागणी वाढली आहे; पण अपेक्षित मासे नसल्याने दर वधारले आहेत. दोनशे ते तीनशे रुपयांना मिळणारे खेकडे सहाशेवर तर पावसात मिळणारे काकई, तिसरे, लेपी, सुळे, कांटा, ताऊज यांसारखी मासळीही पाचशे ते सहाशे रुपये किलोने विकली जात आहे. मासे खवय्यांची पंचाईत झाली असून, अनेक जण चिकनकडे वळू लागले आहेत. तिथेही किलोचा दर नेट २८० ते २९० रुपयांवर पोहोचला आहे.
१ जूनपासून समुद्रातील मासेमारी बंद करण्यात आली. त्यानंतर खाडीमध्ये मासेमारीला सुरुवात झाली. पावसाला किनारी भागात येणारे मासेही सापडू लागले आहेत. या माशांचे प्रमाणे कमी असल्याने, खवय्यांची पंचाईत झाली आहे. रत्नागिरी शहराजवळील राजीवडा आणि मिरकरवाडा बंदरावर माशांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. हंगामामध्ये ताजे मासे खरेदीसाठी अनेक जण सकाळी व सायंकाळी तिथे हजेरी लावतात.
रविवारी या ठिकाणी मासे खरेदीसाठी गेलेल्या खवय्यांना माशांचे दर चांगलेच वधारलेले पाहायला मिळाले. मासे खरेदी करताना, अनेकांच्या खिशाला चाट बसली. मोठा खेकडा ६०० रुपयाला एक या प्रमाणे विकला जात होता. तिसरे किंवा मुळे १५० रुपये शेर होते. ते शंभर रुपयांनी विकले जातात. पावसाळ्यात मिळणारा ताऊज मासा खरेदीसाठी अनेकांची झुंबड उडते. याला २५० ते ३०० रुपये अर्धा किलो दर आहे. किलोला ५०० ते ६०० रुपये आकारले जात आहेत.
बोयरं, रेणवी हे मासेही याच दराने विकण्यात येत आहेत. लेपी, सुळे, कांटा, खाडीची कोळंबी यांसारखी मासळी विक्रीला ठेवण्यात आली होती. त्याचेही दर वधारलेले आहेत. त्यामुळे सध्या चिकन, मटणाला मोठी मागणी आहे. काही जण मासे आणून, त्यावर इच्छा भागवून घेतात. पण माशांचे दर पाहून काहींचा कल चिकन खरेदीकडेच वाढला आहे. मात्र चिकनचे दरही तीनशे रुपयांचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहेत.